वैद्यकीय व्यवसायात दिवसाची सुरूवातच संवादानं होते… “काय होतंय? कधीपासून होतंय?”
थोड्या वेळापूर्वी समोर एक तरुण त्याच्या आईसोबत येऊन बसला होता एकदम चिडीचूप… कदाचित तो विचारात असावा किंवा आजारपणामुळं गप्प असावा, असा माझा समज झाला अन् त्याचा मरगळलेला मूड बदलावा आणि त्यानं मनमोकळं बोलावं, या हेतूनं मी थोड्या हक्कानं आणि उत्साहानं म्हणालो, “अहो… बोला की!”
पुढच्याच क्षणी त्याच्या आईनं खाली मान घालून अत्यंत क्षीण आवाजात उत्तर दिलं, “त्याला बोलता येत नाही डॉक्टर…”
तो क्षण… आणि त्या ठिकाणी पसरलेली ती नीरव शांतता काळजाचा ठोका चुकवून गेली… माझ्या उत्साही स्वराचा प्रतिध्वनी मलाच अपराधी वाटू लागला… मी ज्याला ‘मूड’ समजत होतो, ते तर त्याचं ‘विश्व’ होतं… निसर्गानं हिरावून घेतलेली त्याची वाचा आणि त्याच्या आईच्या डोळ्यांतील तो हतबलपणा हे सगळं एका क्षणात समोर आलं.
एक डॉक्टर म्हणून रोज शारीरिक व्याधींवर उपचार करताना अशा प्रसंगी जाणीव होते की, ’उपचारा’आधी ‘समजून घेणं’ हे अधिक महत्त्वाचं आहे. समोरचा रुग्ण जेव्हा शांत असतो, तेव्हा त्या शांततेचे अनेक अर्थ असू शकतात. तो कदाचित वेदनेनं ग्रासलेला असेल, कुणाशी तरी भांडून आलेला असेल किंवा या तरुणासारखा जन्मत:च नि:शब्दही असू शकेल!
हेही वाचा – जगायला नेमका किती मेंदू लागतो?
आज मी एक नवीन गोष्ट शिकलो, एखाद्याला बोलतं करण्याच्या घाईपूर्वी त्याच्या डोळ्यांतील भाषा वाचायला शिकणं… कामाच्या व्यापात आपण अनेकदा समोरच्याला गृहीत धरतो पण प्रत्येक रुग्ण ही एक वेगळी कथा असते… समोरच्याच्या स्थितीत स्वतःला ठेवून पाहिलं की कळतं!
त्यानंतर मी त्या मुलाच्या हातावर हात ठेवला. आता आमच्यात संवाद होणार होता, पण शब्दांशिवाय. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित सांगून गेलं की, त्याला माझी विचारपूस समजली होती…
कधी कधी “बोला की…” म्हणण्यापेक्षा फक्त शांतपणं सोबत बसणं किंवा मायेचा स्पर्श करणं, हे कोणत्याही औषधापेक्षा जास्त गुणकारी असतं…
हेही वाचा – बीपी आणि शुगरच्या गोळ्या सुरू आहेत…
वैद्यकीय क्षेत्रात पदव्या मिळवणं सोपं आहे, पण माणसाच्या मनातल्या ‘न बोललेल्या’ वेदना वाचायला शिकणं, ही एक अखंड साधना आहे. या घटनेनं मला पुन्हा एकदा शिकवलं की, कान फक्त शब्द ऐकण्यासाठी नसतात तर, समोरच्याची शांतता ऐकण्यासाठीही असतात!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


