मला तो पहिल्यांदा भेटला मोरगावला. आलिशान मोटारीतून आला होता… बहुतेक आपल्या आजीला घेऊन. मला का कोण जाणे पण बघता क्षणी तो खूप वेगळा वाटला. साधारणपणे तिशीच्या आसपासचा असावा तो. आम्ही जवळपास एकत्रच मंदिरात प्रवेश केला होता. दर्शन छान झालं. मी ठरविल्याप्रमाणे तिथे बसून एक अथर्वशीर्ष पठण केले. ते पूर्ण झाल्यावर मी तिथून उठून उभा राहिलो, तितक्याच मागून कोण्या बाईंचा आवाज आला – “खूप छान म्हटलं तुम्ही. मी अगदी तल्लीन होऊन ऐकत होते.” मी वळून बघितले तर, एक आजी उभ्या होत्या माझ्या मागे. मी वाकून त्यांना नमस्कार केला. त्या मंद हसल्या आणि मला त्यांनी विचारले, “एकटेच आलात का?” मी “हो” म्हणालो. बोलत बोलत आम्ही मंदिराच्या आवारात आलो. मग त्यांनी त्यांच्यासोबत आलेल्या मुलाची ओळख करून दिली, हा माझा नातू अमेय. त्याने पुढे होऊन माझ्याशी हस्तांदोलन केले. थोडं जुजबी बोलणं होऊन आम्ही तिथून निघालो. योगायोगाने अमेय आणि आजी मला पुढच्या सगळ्या गणपती मंदिरात भेटल्या. सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव असं एकेक करत मी अष्टविनायक यात्रा पूर्ण करत होतो.
रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन झाल्यावर आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहिलेला नव्हता. एव्हाना माझी आणि त्यांची छानपैकी ओळख झाली होती. अमेयने देखील काका म्हणून केव्हा मला हाक मारायला सुरुवात केली ते माझं मलाच आठवत नव्हतं.
हेही वाचा – वेटिंग लिस्ट
पुढे परत मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घेतले आम्ही आणि निरोपाची वेळ आली. आम्ही मग एके ठिकाणी जेवायला म्हणून थांबलो. तिथेच अमेय बोलता झाला…
“लहानपणापासून मी आजी-आजोबांजवळच रहायचो, कारण आईबाबांना नोकरीनिमित्त सतत मुंबई बाहेर जावं लागे. खूप वेगळ्या संस्कारात मी वाढलो. आमच्या घरी माझ्या हट्टापायी आजोबा गणपती आणायला लागले. अगदी लहानपणापासून बाप्पा माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र होता. शाळा संपली आणि कॉलेजच्या विश्वात मी प्रवेश केला. आई-बाबांपेक्षा आजी-आजोबांना फार कौतुक होते माझ्या शैक्षणिक कारकीर्दीतील नेत्रदीपक यशाचे. माझी आणि आजोबांची इच्छा होती, त्याप्रमाणे मी डॉक्टर झालो. मुंबईमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये रूजू झालो. पण आजोबा फार काळ राहिले नाहीत, माझी वैद्यकीय कारकीर्द बघण्यासाठी… हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे झोपेतच निधन झाले. माझ्यासाठी आणि आजीसाठी तो मोठा धक्का होता. आजोबांच्या जाण्याने आजी जरी वरून दाखवत नव्हती, पण आतल्या आत ती खचत चालली होती.
दोन-तीन महिन्यांपासून आजी अष्टविनायक यात्रा करण्याची इच्छा व्यक्त करत होती. पण हॉस्पिटलमधून मला डोकं वर काढायला वेळ नव्हता. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तिचे आसूसलेले डोळे मला सतत सांगत होते, वेळ काढण्यासाठी! शेवटी वरिष्ठांना विश्वासात घेऊन मी तिला घेऊन ही यात्रा सुरू केली. आज तिच्या चेहऱ्यावरचे समाधान फार लाख मोलाचे आहे माझ्यासाठी.”
अमेय आणि त्याच्या आजीवर एखादा लेख लिहावा, असं तेव्हाच माझ्या मनात आलं आणि नकळत मला खांद्यावरच्या कावडीतून आपल्या अंध आईबाबांना यात्रेला घेऊन जाणारा श्रावणबाळ आठवला. लहानपणी त्याची गोष्ट ऐकून मला रडायला आलेलं देखील चटकन आठवलं. अमेय देखील कलियुगातील श्रावणबाळच आहे. आपल्या आजीच्या इच्छेखातर तिला अष्टविनायकाची यात्रा घडवून आणली होती त्याने.
हेही वाचा – कलियुगातील एकलव्य
मी माझी ओळख करून दिली. ती ऐकून आजी मला म्हणाल्या की, “ज्या पद्धतीने सतत 30 वर्षं तुम्ही आई-वडिलांच्या आजारपणात त्यांची दिवसरात्र सेवा केली, तशी सेवा करण्याचे भाग्य फार कमी जणांच्या नशिबात असतं.” घर आणि ऑफिस या पलीकडे माझं जग नव्हतं त्या कालखंडात. जेमतेम पाच तास झोप मिळायची मला तेव्हा… “त्यांची पुण्याई सतत तुम्हाला सोबत करेल आयुष्यभर,” असा आशीर्वाद आजींनी मला दिला आणि तो खरा होता. कारण त्याच पुण्याईवर माझ्या हातून इतकी वर्षे स्वतःची तब्येत सांभाळून मला त्यांची सेवा करायला मिळाली आणि त्याच पुण्याईच्या आधाराने मी सध्या एकटा असूनही आनंदाने जगत आहे.
माझी इच्छा होती, त्या दोघांसोबत फोटो काढण्याची. पण का कोण जाणे आजींनी नाही म्हटलं. त्या म्हणाल्या, “तुम्ही जरूर लिहा आमच्यावर पण त्यासोबत आमचे फोटो नका टाकू.”
अमेय आणि मी दोन पिढ्यांचे प्रतिनिधी. आपापल्या आयुष्याचा विचार केला तर आम्ही खरंच श्रावणबाळ होतो, एवढं मात्र खरं होतं.


