ऑफिसमध्ये होते, आम्ही सगळ्याजणी मिळून डबे खाण्यात गुंग होतो, तोच फोन वाजला. लेकाचा होता. साधारण किती वाजता फोन केला की, मी पटकन फोन उचलते, हे ठाऊक असतं त्याला, इतक्या वर्षांच्या सरावाने. तोंडात घास असतानाच फोन घेतला त्याचा…
“काय रे?”
आम्ही थेट मुद्दयाचं बोलतो. उगाच ‘हॅलो’ वगैरे म्हणण्याच्या भानगडीत वेळ नाही घालवत बसत.
“आई, आबांनी अश्वगंधा पावडर आणायला सांगितली आहे.”
“काय आणायला सांगितलं आहे?”
“अगं, अश्वगंधा पावडर म्हणाले ते…”
ऐकलं आणि मला जोरदार ठसका लागला. लालबुंद झाला चेहरा नुसता.
‘पाणी द्या, पाणी द्या तिला,‘चा आक्रोश झाला आणि तब्बल ग्लासभर पाणी रिचवून मी जरा शांत झाले.
तसे या अश्वगंधाचे उपयोग ऐकून ठाऊक होते, वाचले होते आणि एक प्रतिमा फिट्ट बसली होती डोक्यात. वय वर्षे 78चे आमचे आबा आणि अश्वगंधा?
मनात म्हणाले, “कुछ तो गडबड है दया!”
हल्ली आबांचं आणि माझं बिनसलंय जरा, म्हणून मला द्यायचे निरोप, थेट न येता नातवाकरवी पोहोचते होतायत. रुसायचं कारण काय, तर बाहेरून वडापाव खाऊन आले आणि जेवले नाहीत, म्हणून मी केलेली बडबड!
चालेल चार दिवस, नंतर येतील वळणावर. जातील कुठे?
तडक नवऱ्याला फोन लावला… “तुमचे तीर्थरूप तुला सावत्र आई आणि मला सावत्र सासू आणायच्या विचारात आहेत का रे?”
“काय बोलतेयस? सकाळपर्यंत ठीक होतीस. तब्बेत बरी आहे ना तुझी?” नवऱ्याची काळजीयुक्त स्वरात चौकशी.
“मी ठीक आहे, आबांची सटकलीये, असं वाटतंय!”
“का, आता काय झालं?”
हेही वाचा – आमचे आबा आणि त्यांची कुंभकर्णी झोप…
आमची नेहमीची जुगलबंदी नवऱ्याच्या अंगवळणी पडली होती आता. सासूचा मक्ता आबांनी घेतलाय, हेही ठाऊक होतं त्याला.
“काही नाही, नातवाकरवी निरोप आलाय. अश्वगंधा पावडर आणायला सांगितली आहे!”
नवरा पण बेजार! म्हणाला, “अगं, सांगितलं असेल कोणी मित्राने वापरायला… का सूतावरून स्वर्ग गाठतेयस उगाच? घेऊन जा घरी जाताना. एवढा काय बाऊ करतेयस?”
संध्याकाळी गेले जडीबुटीच्या दुकानात आणि अश्वगंधा पावडर मागितली. दुकानदाराचा चेहरा पाहून, अश्वगंधा मागायला आलेली बाई तो प्रथमच पहात होता, असं वाटलं मला, पण दिली त्याने बांधून 50 ग्रॅम.
घरी गेल्यावर, लेकाला सांगितलं, “हे घ्या आणि द्या नेऊन आबासाहेबांना!”
आबासाहेब म्हटलं की, आमच्यात काहीतरी बिनसलंय, हे लेकाला बरोब्बर कळतं.
गेला घेऊन तो आबांकडे आणि त्याच पावली परत आला, पिशवी तशीच घेऊन!
“काय रे, काय झालं? दे की आबांना.”
“अगं, आबा म्हणाले, हे नाही चालत देवाला लावायला!”
“देवाला लावायला? आबांनी नक्की काय आणायला सांगितलं होतं?”
“त्यांनी मला जे सांगितलं ते मी तुला सांगितलं, मला काय ओरडतेस उगाच?”
“बोलाव बघू आबांना, त्यांनाच विचारते!”
रूसलेले आबा आले, आणि मी त्यांना विचारलं, “आबा नक्की काय आणायला सांगितलं होतंत तुम्ही?”
रागातच आबा म्हणाले, “अष्टगंध संपलंय. ते आणायला सांगितलं होतं, हे काय घेऊन आलीस?”
आता माझ्या टाळक्यात प्रकाश पडला. लेकाने ‘ध चा मा’ केला होता. ‘अष्टगंधा’ची ‘अश्वगंधा’ झाली आणि त्यामुळे सगळा घोळ झाला.
खाऊ का गिळू नजरेनं आता लेकाकडे मोर्चा वळवला आणि म्हणाले, “कार्ट्या, गधड्या, प्राण कंठाशी आणलेस माझे. नीट ऐकायला काय होतं तुला?”
तेवढ्यात नवरा आला घरी आणि त्याला कळली ही रामकहाणी. आबा पण निवळले, नातवाचे प्रताप ऐकून आणि त्यांचा सगळा रुसवा, आमच्या हास्यकल्लोळात विरून गेला. नातवाच्या पाठीत धपाटा घालून म्हणाले, “तुझी आज्जी बघत असेल वरून. नीट ऐकायला शिक बाबा…” आणि मान हलवत त्यांच्या खोलीत निघून गेले.
हेही वाचा – आबा आणि मित्रमंडळींची पार्टी
लेकाला कळेच ना, सगळे नक्की का हसतायत ते. काय सांगायचं त्याला? काहीतरी सांगून वेळ मारून नेली आपली. या सगळ्यात, माझी आणि आबांची परत दिलजमाई झाली, ही मोठीच जमेची बाब. आता सगळे निरोप परत थेट माझ्याकडेच येतील, काही दिवस तरी…
टीप : अश्वगंधा ही बहुगुणी औषधी आहे यात शंका नाही, वाद नाही. या औषधाची बदनामी करण्याचा कोणताही हेतू यात नाही, याची कृपया नोंद घ्यावी, ही विनंती.


