अध्याय तेरावा
यालागीं अर्जुना पाहीं । अध्यात्मज्ञानाच्या ठायीं । जया नित्यबोधु नाहीं । शास्त्रमूढा ॥839॥ तया शरीर जें जालें । तें अज्ञानाचें बीं विरुढलें । तयाचें व्युत्पत्तित्व गेलें । अज्ञानवेलीं ॥840॥ तो जें जें बोले । तें अज्ञानचि फुललें । तयाचें पुण्य जें फळलें । तें अज्ञानचि गा ॥841॥ आणि अध्यात्मज्ञान कहीं । जेणें मानिलेंचि नाहीं । तो ज्ञानार्थु न देखे काई । हें बोलावें असें ॥842॥ ऐलीचि थडी न पवतां । पळे जो माघौता । तया पैलद्वीपीची वार्ता । काय होय ॥843॥ कां दारवंठांचि जयाचें । शीर रोंविलें खांचे । तो केवीं परिवरींचें । ठेविलें देखे ॥844॥ तेवीं अध्यात्मज्ञानीं जया । अनोळख धनंजया । तया ज्ञानार्थु देखावया । विषो काई ॥845॥ म्हणोनि आतां विशेषें । तो ज्ञानाचें तत्त्व न देखे । हें सांगावें आंखेंलेखें । न लगे तुज ॥846॥ जेव्हां सगर्भे वाढिलें । तेव्हांचि पोटींचें धालें । तैसें मागिलें पदें बोलिलें । तेंचि होय ॥847॥ वांचूनियां वेगळें । रूप करणें हें न मिळे । जेवीं अवंतिलें आंधळें । तें दुजेनसीं ये ॥848॥ एवं इये उपरतीं । ज्ञानचिन्हें मागुतीं । अमानित्वादि प्रभृती । वाखाणिलीं ॥849॥ जे ज्ञानपदें अठरा । केलियां येरी मोहरां । अज्ञान या आकारा । सहजें येती ॥850॥ मागां श्लोकाचेनि अर्धार्धें । ऐसें सांगितलें मुकुंदें । ना उफराटीं इयें ज्ञानपदें । तेंचि अज्ञान ॥851॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु
अर्थ
याकरता अर्जुना, असे पहा की, ज्या शास्त्रमूढाला अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी नित्य जागृति नाही ॥839॥ त्याला शरीर जे प्राप्त झाले, ते अज्ञानाच्या बीजाचा अंकुर होय. आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल होय. ॥840॥ तो जे जे बोलतो, ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे आणि अरे, त्याची जी पुण्यकर्मे आहेत, ते अज्ञानच फळास आलेले आहे. ॥841॥ आणि ज्याने अध्यात्मज्ञानाला कधीच मानले नाही, तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पाहात नाही, हे सांगावयास पाहिजे काय? ॥842॥ नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही, तोच जो माघारी पळून जातो, त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार? ॥843॥ अथवा घराच्या दाराच्या उंबर्यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत पुरले आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहील? ॥844॥ त्याप्रमाणे अर्जुना, अध्यात्मज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही, त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते जाणण्याला विषय होईल काय? ॥845॥ म्हणून आता तो ज्ञानाचे तत्त्व पाहात नाही, हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयास नको. ॥846॥ जेव्हा गरोदर स्त्रीला जेवावयास वाढावे, तेव्हाच तिच्या पोटातले मूल तृप्त होते. त्याप्रमाणे वरती ज्ञानाचे जे वर्णन केले, त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे. ॥847॥ वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे स्पष्टीकरण कराण्यास नको. आंधळा मनुष्य जेवावयाला बोलाविला असता तो दुसर्या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यावयाचा, तसेच हेही आहे, असे समज. ॥848॥ याप्रमाणे ही ‘अमानित्वादि’ ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितली. ॥849॥ कारण की, ज्ञानाची अठरा पदे उलट फिरविली (उदाहरणार्थ, अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे) असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात. ॥850॥ मागे (या अध्यायाच्या) अकराव्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसर्या अर्ध्यामधे श्रीमुकुंदाने असे संगितले की, ही ज्ञानपदे उलट केली की तेच अज्ञान होय! ॥851॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे


