अध्याय तेरावा
आणि मातलिया सागरीं । मोकलिलिया तरी । लाटांचां येरझारीं । आंदोळे जेवीं ॥804॥ तेवीं प्रिय वस्तु पावे । आणि सुखें जो उंचावे । तैसाचि अप्रियासवें । तळवटु घे ॥805॥ ऐसेनि जयाचां चित्तीं । वैषम्यसाम्याची वोखती । वाहे तो महामती । अज्ञान गा ॥806॥ आणि माझां ठायीं भक्ती । फळालागीं जया आर्ती । धनोद्देशें विरक्ती । नटणें जेवीं ॥807॥ कां कांताचां मानसी । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटे जारेंसीं । जावयालागीं ॥808॥ तैसा मातें किरीटी । भजती गा पाउटी । करूनि जो दिठी । विषो सूये ॥809॥ आणि भजिन्नलियासवें । तो विषो जरी न पवे । तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें ॥810॥ कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलाची परवडी । करी तया ॥811॥ तया गुरुमार्गा टेंकें । जयाचा सुगरवा देखे । तरी तयाचा मंत्र शिके । येरु नेघे ॥812॥ प्राणिजातेंसीं निष्ठुरु । स्थावरीं बहु भरु । तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया ॥813॥ माझी मूर्ति निफजवी । ते घराचां कोनीं बैसवी । आपण देवो देवी । यात्रे जाय ॥814॥ नित्य आराधन माझें । काजीं कुळदेवता भजे । पर्वविशेषें कीजे । पूजा आना ॥815॥ माझें अधिष्ठान घरीं । आणि वोवसे आनाचे करी । पितृकार्यावसरीं । पितरांचा होय ॥816॥ एकादशीचां दिवशीं । जेतुला पाडु आम्हांसी । तेतुलाचि नागांसी । पंचमीचां दिवशीं ॥817॥ चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदसी म्हणे माये । तुझाच वो दुर्गे ॥818॥ नित्य नैमित्तिकें कर्में सांडी । मग बैसे नवचंडी । आदित्यवारीं वाढी । भैरवां पात्रीं ॥819॥ पाठीं सोमवार पावे । आणि बेलेंसी लिंगा धांवे । ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥820॥ ऐसा अखंड भजन करी । उगा नसे क्षणभरी । आघवेनि गांवद्वारीं । अहेव जैसी ॥821॥ तैसेनि जो गा भक्तु । सैरा देखसी धांवतु । जाण अज्ञानाचा मूर्तु । अवतार तो ॥822॥ आणि एकांतें चोखटें । तपोवनें तीर्थे तटें । देखोनि जो गा विटे । तोहि तोचि ॥823॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : न धरावा तो संगु, न लागावें तेथ लागु
अर्थ
आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या-जाण्याने झोके खात असते ॥804॥ त्याप्रमाणे आवडती वस्तु प्राप्त झाली असता जो सुखाने फुगतो व त्याचप्रमाणे नावडती वस्तु प्राप्त झाल्याबरोबर जो संकोच पावतो ॥805॥ याप्रमाणे ज्याच्या अंत:करणात (अप्रियवस्तुप्राप्तीने) दु:ख व (प्रियवस्तुप्राप्तीने) सुख याची चिंता असते, तो हे महामति अर्जुना, अज्ञान आहे. ॥806॥ आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते पण फलाच्या उत्कट इच्छेने असते, ती कशी तर, जसे धनाच्या हेतूने वैराग्याचे सोंग आणावे, ॥807॥ अथवा जाराकडे जाण्याकरता जारिणी स्त्री जशी नवर्याच्या अंत:करणात शिरून वागते ॥808॥ अर्जुना, त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमधे विषय ठेवतो (म्हणजे जो विषयप्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो) ॥809॥ आणि मला भजल्याबरोबर तो (इच्छित) विषय जर मिळाला नाही, तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे, असे म्हणतो, ॥810॥ अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो, त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व जेवढ्या उत्सुकतेने पहिल्याची पूजा करतो, तितक्याच जोराने पुन्हा दुसर्याचीही करतो. ॥811॥ ज्या गुरूचा जास्त थाटमाट पाहतो, त्या गुरूच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसर्याचा घेत नाही. ॥812॥ सर्व प्राण्यांशी तो निर्दयपणे वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो. त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते, ॥813॥ माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपर्यात बसवतो व आपण देवदेवतांच्या यात्रेला जातो. ॥814॥ दररोज माझे भजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो व काही विशेष पर्वकाली तिसर्याच देवतांची पूजा करतो. ॥815॥ घरात माझी स्थापना असतांनाच दुसर्या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्यावेळी (श्राद्ध, पक्ष वगैरे काळी) पितरांचा (भक्त) होतो. ॥816॥ एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान (देतो) तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो. ॥817॥ चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच (उपासक) होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे (देवी) मी तुझा (भक्त) आहे असे म्हणतो. ॥818॥ नित्यनैमित्तिक कर्मे टाकतो आणि मग नवचंडीच्या (नवरात्रातील देवीच्या) अनुष्ठानास बसतो व रविवारी बहिरोबाला त्याच्या पत्तरात नैवेद्य वाढतो. ॥819॥ नंतर सोमवार आला की बेल घेऊन शिवलिंगाकडे धावतो, याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो. ॥820॥ वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या, गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते, त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा रहात नाही ॥821॥ त्याप्रमाणे तो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पाहाशील, तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे, असे समज. ॥822॥ आणि पवित्र एकांत स्थाने, तपोवन, तीर्थांची स्थाने व पवित्र नद्यांचे किनारे ह्यास पाहून ज्याला कंटाळा येतो, तो देखील अज्ञानीच आहे. ॥823॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्रेमाथिलेनि भक्तें, जैसेनि भजिजे कुळदैवतें


