भाग – 1
सकाळी लवकर येऊन बाप्पाने कंपनीच्या स्टोअररूमच्या समोर टेम्पो लावला. आज सामानाची डिलिव्हरी होती. आज चतुर्थी होती. बाप्पाचा कडकडीत उपास असतो. पण त्याच्या उपासाचा त्याच्या कामावर कधीच परिणाम होत नाही. व्यवस्थित पॅक केलेली खोकी त्याने क्रमवार लावून घेतली. सगळ्यात शेवटी असणारी, लांबच्या डिलिव्हरीची खोकी आधी रचून, त्याच्यापुढे एकेक खोकं रचत, त्याने चटाचट काम उरकलं. सर्व व्यवस्थित आहे ना? याची त्याने एका नजरेत खात्री करून घेतली. योग्य ती कागदपत्रं घेतली. एखादा कलाकार जसा रंगभूमीला वंदन करून त्यावर पाय ठेवतो, त्याप्रमाणे गाडीत चढण्याच्या आधी त्याने गाडीला नमस्कार करून, उजवा पाय प्रथम आत टाकला. डॅश बोर्डवर चिकटवलेल्या गणपतीच्या छोट्या संगमरवरी मूर्तीला, कंपनीच्याच आवारातून आणलेलं लाल जास्वंदीचं फूल वाहिलं. हात जोडून पुटपुटला…
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
स्टीअरिंग व्हीलला नमस्कार करून त्याने गाडी सुरू केली. आवाराबाहेर गाडी येऊन रस्त्याला लागल्यावर त्याने रेडिओ सुरू केला… कुठचं तरी स्टेशन सुरू झालं.
हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
मैं रंग शरबतों का
तू मीठे घाट का पानी…
त्याच्या आवडीचं गाणं… तो तल्लीन होऊन ऐकत होता. डोळे रस्त्यावर खिळले होते. अतिशय सतर्क राहून तो गाडी चालवायचा. गाणं संपलं. दुसरं गाणं सुरू झालं…
चार बोतल वोडका…
त्याने वैतागून स्टेशन बदललं. अशीच कोणती कोणती ट्रकर्सची, ठेक्याची, उडत्या चालीची, ज्याने झोप उडेल, डुलकी लागणार नाही, अशी छछोर गाणी सुरू होती. रस्त्यावर डोळे ठामपणे भिडवून… एका हाताने व्हील सांभाळत… दुसऱ्या हाताने तो स्टेशन बदलत होता आणि सटकन त्याच्या कानांनी एक गाणं पकडलं…
गजानना तू गणराया; आधी वंदू तुज मोरया!!
तो खूश झाला. त्याचा गाण्यांचा शोध थांबला. तो तल्लीनतेने गाणं ऐकू लागला. फक्त बाप्पाच नाही तर, त्याचं संपूर्ण कुटुंब गणपती बाप्पाचे भक्त होते. त्याचं नावसुद्धा, गणपतीचाच प्रसाद म्हणून ‘गणेश’ ठेवलं होतं. लहानपणी खेळताना सर्व पोरं त्याला गण्या म्हणायचे. खरं म्हणजे, त्यात विशेष काहीच नव्हतं. नावांचे अपभ्रंश करणं पोरांमध्ये चालतंच. सगळीच मुलं पक्या, पम्या, बाळ्या अशाच नावाची होती. त्यांची खरी नावं पण कुणाला आठवत नव्हती. फक्त रवींद्र नावाच्या मुलाला रव्या न म्हणता, ‘रवळनाथ’ म्हटलं जायचं. पोरंच ती, काहीही चालायचं!
हेही वाचा – …असाही विचार करता येतो!
पण गणेशला मात्र आपल्या नावाचं ‘गण्या’ रूप केलेलं चालायचं नाही. “अरे, देवबाप्पाचं चांगलं नाव आहे, असं तोडूमोडू नका रे!” तो नेहमी सांगायचा. एकदा पोरं म्हणाली, “मग काय तुला गणपतीबाप्पा म्हणू का?” काही दिवस गण्याच्या ऐवजी गणपतीबाप्पा हाक मारली जाऊ लागली. त्याचंच संक्षिप्त रूप बाप्पा केलं गेलं आणि मग गणेश सर्वांसाठी बाप्पाच झाला .


