“डॉक्टर, ही गोळी घेतली तरच झोप लागते, घेतली नाही तर झोप लागत नाही,” पेशंटनं गोळ्यांचं रिकामं पाकीट दाखवलं. आजच्या अतिरिक्त मानसिक ताणतणावाच्या जगात ही आणि अशी औषधं अनेकांसाठी तारणहार झाली आहेत; पण हाच तारणहार डोस चुकला, औषधांची संख्या वाढली किंवा सल्ल्याशिवाय औषधं एकत्र घेतली तर, तीच जीवघेणी ठरू शकतात!
असे पेशंट आले की, मला मेथड ॲक्टिंगचा राजकुमार अभिनेता ‘हिथ लिजर’ आठवतो… जोकरची भूमिका करून जगभरात खळबळ उडवणारा हा अभिनेता वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी अकाली गेला… ना ड्रग्सचा अतिरेक, ना आत्महत्येचा स्पष्ट हेतू… फक्त अफवांचा बाजार!
मग नेमकं घडलं तरी काय?
हिथ लिजरच्या मृत्यूमागे एक शब्द वारंवार वापरला जातो, तो म्हणजे पॉलिफार्मसी! म्हणजेच अनेक औषधं एकत्र घेणं…
हेही वाचा – आरोग्य… औषधं खाण्याचा आजार!
झोप न येणं, चिंता, वेदना यासाठी तो वेगवेगळी औषधं घेत होता. झोपेच्या गोळ्या, वेदनाशामक, अँटी-अॅन्झायटी असे प्रत्येक औषध स्वतंत्रपणे घेतले असते, तेही योग्य मात्रेत, तर कदाचित ही औषधं सुरक्षित ठरली असती. पण, एकत्र घेतल्यावर ती एकमेकांचा परिणाम वाढवतात. परिणामी श्वसन मंदावतं, मेंदूवरचा दाब वाढतो झोप हळूहळू बेशुद्धीत बदलते… आणि मग कायमची लागते!
ही आत्महत्या नव्हती. हा होता अनवधानाने झालेला औषधांचा ओव्हरडोस!
हिथच काय आपल्याकडं तर गल्लीबोळातली लोकं “मला डॉक्टरपेक्षा माझ्या शरीराची जास्त माहिती आहे,” असा दावा करतात… पण हा गैरसमज असतो.
“मी आधीही घेतली आहे ही गोळी…”
“माझ्या मित्राला चालली, मला पण चालेल.”
“आज जरा जास्त त्रास आहे, दोन घेतो…”
असे एक ना अनेक दावे लोकं करत असतात. हिथ लिजरसारखा सजग, शिक्षित असा जागतिक कीर्तीचा अभिनेता, अतिशय उत्तम वैद्यकीय सुविधा असूनही या जाळ्यात अडकला तिथं सर्वसामान्य माणसाची काय कथा?
हेही वाचा – फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?
औषध म्हणजे एखाद्या चाकूसारखं असतं, योग्य हातानं योग्यपणे वापरलं, तर जीव वाचवते… पण चुकीच्या हातात पडल्यास आणि चुकीच्या पद्धतीनं वापरल्यास जीव जाऊही शकतो! डोस थोडासा जास्त झाला, वेगवेगळी औषधं एकत्र घेतली, डॉक्टरांना न सांगता औषध बदललं तर तेच औषध औषध न राहता विष बनू शकतं.
हिथ लिजरची केस आपल्याला काय शिकवते?
प्रत्येक औषध डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात आणि वेळेतच घ्यावं. एकाहून अधिक डॉक्टरांकडे उपचार सुरू असतील तर, सगळ्यांना सर्व औषधांची माहिती द्यावी. “झोप येत नाही”, “जास्त दुखतंय” म्हणून स्वतःहून डोस वाढवू नये.
…आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे OTC (ओव्हर-द-काऊंटर) औषधं घेऊ नयेत. ती सुरक्षित नसतात.
हिथ लिजरचा मृत्यू हा फक्त एका संवेदनशील आणि गुणी अभिनेत्याचा अंत नव्हता, तर तो होता औषधांच्या चुकीच्या वापराबद्दल दिलेला इशारा! औषधं आपल्याला जगवण्यासाठी आहेत, पण अज्ञान, निष्काळजीपणा आणि अति-आत्मविश्वास यामुळं तीच औषधं आपला श्वास कायमचा थांबवू शकतात!


