अध्याय तेरावा
पैं गा जो ययापरी । जन्मेंचि जन्म निवारी । मरणें मृत्यु मारी । आपण उरे ॥552॥ तया घरीं ज्ञानाचें । सांकडें नाहीं साचें । जया जन्ममृत्यूचें । हृदयी शल्य ॥553॥ आणि तयाचिपरी जरा । न टेंकतां शरीरा । तारुण्याचिया भरा- । माजीं देखे ॥554॥ म्हणे आजिचां अवसरीं । पुष्टि जे शरीरीं । ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥555॥ निदैव्याचे व्यवसाय । तैसे ठाकती हातपाय । अमंत्रिया राज्याची परी आहे । बळा यया ॥556॥ फुलांचिया भोगा- । लागीं प्रेम टांगा । तें करेयाचा गुडघा । तैसें होईल ॥557॥ वोढाळाचां खुरीं । आखरु आतें बुरी । ते दशा माझां शिरीं । पावेल गा ॥558॥ पद्मदळेंसी इसाळे । भांडताति जे हे डोळे । ते होती पडवळें । पिकलीं जैसीं ॥559॥ भंवईचीं पडळें । वोमथती सिनसाळे । उरु कुहिजैल जळें । आंसुवांचेनि ॥560॥ जैसें बाभुळीचें खोड । गिरबडूनि जाती सरड । तैसें पिचडीं तोंड । सरकटिजेल ॥561॥ रांधवणी वोलीपुढें । पऱ्हे उन्मादती खातवडे । तैसींचि यें नाकाडें । बिडबिडती ॥562॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : मद्यपाआंगींचें वस्त्र, लेपाहातींचें शस्त्र
अर्थ
अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्यजन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्यदेहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यु नाहीसा करतो व आपण (जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने) उरतो ॥552॥ अशा रीतीने ज्याच्या अंत:करणात जन्ममृत्यु हे काट्यासारखे सलत राहतात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते. ॥553॥ आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच, ऐन उमेदीत असतांनाच जो पुढे येणार्या म्हातारपणाबद्दल विचार करतो. ॥554॥ तो म्हणतो, पाहा, आजच्या वेळी (भर तारुण्यात) ही जी शरीरात पुष्टी आहे, ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल ॥555॥ दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात, तसे हातपायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती, प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे. ॥556॥ फुलांच्या (सुवासाच्या) भोगाकरता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते (नाक) उंटाचा गुडघा जसा असतो, तसे विद्रूप व वास घेण्याला असमर्थ असे होईल. ॥557॥ ओढाळ गुरांच्या खुरांनी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते, त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल. ॥558॥ कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात, तसे होतील. ॥559॥ भुवयांचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल. ॥560॥ ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरड गिरबिडून टाकतात, त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल. ॥561॥ स्वयंपाकाच्या चुलीपुढे खाचेत अगर चरात (उष्टे पाणी वगैरे साचून) जसे दुर्गंधियुक्त बुडबुडे उसळतात, त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील. ॥562॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला


