सुधीर करंदीकर
फ्रेंडशिप डे निमित्त गेल्या रविवारी भरपूर मित्रांबरोबर शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. काही मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा पण झाल्या. तुमचे पण मेसेजेस आणि गप्पा नक्कीच झाले असतील. त्या दिवशी सकाळी नात तन्वी हिचा फोन आला –
“हॅपी फ्रेंडशिप डे!”
मी पण तिला ‘हॅपी फ्रेंडशिप डे’ म्हणालो.
मी : अगं, आज फ्रेंडशिप डे आहे, ग्रँड फादर डे नाही!
तन्वी : आबा माहिती आहे. ग्रँड फादरच्या आधी यु आर माय बेस्ट फ्रेंड… तुम्ही माझ्याशी नेहमी मस्त गप्पा मारता. समजावून सांगता. म्हणून यु आर माय फ्रेंड.
हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!
या संवादावर मी सहज विचार केला आणि लक्षात आलं की, आजोबा आणि नात या नात्याला ‘मित्र मित्र’ ही सुद्धा जोड दिली तर जास्तच मजा येईल.
मागे अनेक विशेषणे लावून, स्टेटस लावून आपण घराबाहेर पडतो आणि वावरत असतो. माझा धर्म, माझी जात, पोटजात वगैरे वगैरे ओळख लावून आपण आपसामध्ये दुरावा निर्माण करत असतो. घराबाहेर खरंतर फक्त स्वतःचे नाव आणि सगळ्यांचा मित्र एवढीच आपली ओळख असावी.
घरामध्ये असताना नवरा, बायको, आई, वडील वगैरे विशेषणे आपल्या मागे असतात, त्यामुळे आपला अधिकार जागृत होतो. ‘असं करू नका’, ‘तसं करू नका’, असे आपले उपदेश सुरू होतात.
असं करू नका, तसं करू नका, असे वयस्कर आई-वडिलांना मुलं बजावत असतात. वडीलधारी मंडळी मुलांना, नातवंडांना सारखे सल्ले देत असतात. नवरा, बायको यांच्यामध्ये सुद्धा हीच भाषा असते. पुढे त्याचे रूपांतर वादावादी आणि घरामध्ये ताण तणाव यामध्ये होते. घरातले संवाद, हसणं खिदळणं हे सगळचं लोप पावतं. आणि सगळे फेसबुक आणि व्हॉट्सॲपला आपला कृत्रिम मित्र करतात आणि याचा अतिरेक तब्येती करता कसा त्रासदायक ठरतो, हे आपण बघतोच.
हेही वाचा – रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…
म्हणून ‘नातं’ या विशेषणातून बाहेर काढणारा सोपा मार्ग म्हणजे, आपल्या नात्याच्या बरोबर ‘मित्र’ हा शब्द जोडायचा.
नवरा मित्र, बायको मित्र, सासू मित्र वगैरे…
घरची जबाबदारी पार पडताना मी बायकोकरिता नवरा असणार आणि इतर वेळी मित्र असणार! घरामध्ये वयस्कर वडील आहेत, त्यांची जबाबदारी पार पाडताना मी त्यांचा मुलगा असणार, इतर वेळेला त्यांचा मित्र असणार!
आपण सगळ्यांनीच जर हा विचार अमलात आणला, तर “आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” असेच छान वातावरण घरात आणि बाहेर नेहमीच राहणार हे नक्की.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


