अध्याय तेरावा
म्हणे शुचित्व गा ऐसें । जयापाशीं दिसे । आंग मन जैसें । कापुराचें ॥461॥ कां रत्नाचें दळवाडें । तैसें सबाह्य चोखडें । आंत बाहेरि एकें पाडें । सूर्यु जैसा ॥462॥ बाहेरीं कर्में क्षाळला । भितरीं ज्ञानें उजळला । इहीं दोहीं परीं आला । पाखाळा एका ॥463॥ मृत्तिका आणि जळें । बाह्य येणें मेळें । निर्मळु होय बोलें । वेदाचेनी ॥464॥ भलतेथ बुद्धी बळी । रजे आरिसा उजळी । सौंदणी फेडी थिगळी । वस्त्रांचिया ॥465॥ किंबहुना इयापरी । बाह्य चोख अवधारीं । आणि ज्ञानदीपु अंतरीं । म्हणौनि शुद्ध ॥466॥ एऱ्हवीं तरी पांडुसुता । आंत शुद्ध नसतां । बाहेरि कर्म तो तत्त्वतां । विटंबु गा ॥467॥ मृत जैसा शृंगारिला । गाढव तीर्थीं न्हाणिला । कटुदुधिया माखिला । गुळें जैसा ॥468॥ वोस गृहीं तोरण बांधिलें । कां उपवासी अन्नें लिंपिलें । कुंकुमसेंदुर केलें । कांतहीने ॥469॥ कळस ढिमाचे पोकळ । जळो वरीले झळाळ । काय करूं चित्रींव फळ । आंतु शेण ॥470॥ तैसें कर्मवरिचिलेंकडां । न सरे थोर मोलें कुडा । नव्हे मदिरेचा घडा । पवित्र गंगे ॥471॥ म्हणोनि अंतरीं ज्ञान व्हावें । मग बाह्य लाभेल स्वभावें । वरि ज्ञानकर्में संभवे । ऐसें कें जोडे ॥472॥ यालागी बाह्य विभागु । कर्में धुतला चांगु । आणि ज्ञानें फेडिला वंगु । अंतरींचा ॥473॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता
अर्थ
श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे कापूर हा आत व बाहेर दोन्ही बाजूंनी स्वच्छ असतो, त्याप्रमाणे ज्याचे शरीर आणि अंत:करण ही शुद्ध असतात, अर्जुना, तशा प्रकारचे शुचित्व ज्याच्या ठिकाणी असते ॥461॥ जसे रत्नाचे स्वरूप आतबाहेर चोख असते; अथवा सूर्य जसा आतबाहेर एकसारखा (प्रकाशमय) असतो ॥462॥ (तसा) बाहेरचा भाग कर्माने धुवून काढला व आतलाही ज्ञानाने स्वच्छ केला, अशा रीतीने जो या दोन्ही प्रकारांनी शुद्धत्वाला प्राप्त झाला आहे. ॥463॥ वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती आणि पाणी, ह्यांच्या योगाने बाह्य जे शरीर ते निर्मळ होते. ॥464॥ बुद्धीच्या बळाने वाटेल तेथे आरसा धुळीने (मातीने हवा तसा) स्वच्छ करता येतो व परिटाच्या भट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसे करते. ॥465॥ फार काय सांगावे! ऐक. याप्रमाणे त्याचे शरीर शुद्ध असते व मनात ज्ञानरूपी दिवा असतो. म्हणून अंतर शुद्ध असते असे समज. ॥466॥ अर्जुना सहज विचार करून पाहिले तर आत मन शुद्ध नसतांना बाहेर केवळ शरीराने कर्म करणे, ही विटंबना होय. ॥467॥ प्रेतास जसे अलंकार घालून सजविले किंवा गाढवाला जसे तीर्थात स्नान घातले अथवा कडू असलेला दुध्या भोपळा जसा गुळाने चोपडला ॥468॥ ओसाड घराला जसे तोरण बांधले किंवा उपाशी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले अथवा विधवा स्त्रीने कुंकू व शेंदूर लावला ॥469॥ आतून पोकळ व बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जे असतात, त्यांच्या वरील नुसत्या दिखाऊ चकाकीला आग लागो. शेणाची फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन, जरी ती हुबेहूब फळांसारखी दिसणारी केली तरी त्यांना घेऊन काय करावयाचे आहे ? कारण त्यांच्या आत शेण आहे ॥470॥ आत शुद्ध नसून केवल बाह्यात्कारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे. वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तर तो खपत नाही. जशी दारूने भरलेली घागर गंगोदकात बुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र होत नाही. ॥471॥ म्हणून मनामधे ज्ञान असावे, मग बाह्य शुद्धि सहजच प्राप्त होईल. शिवाय ज्ञान व कर्म या दोहोंनी उत्पन्न होणारी अशी पवित्रता कोठे मिळेल ॥472॥ याकरता अर्जुना, बाहेरील भाग कर्माने चांगला शुद्ध केलेला आहे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकलेला आहे ॥473॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी


