नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
तुम्ही जेव्हा सीरियल किंवा सिनेमा बघता, त्यात किचनचा सीन असला की, त्यात तुम्हाला भाज्या दिसत असतीलच. ताज्या ताज्या हिरव्यागार पालेभाज्या, लालभडक टोमॅटो… या अणि अशा मस्त भाज्या… डोळ्यांना सुखावणाऱ्या! त्या सीनसाठी या भाज्या सेटवर आणल्या जातात. दिवसअखेर या भाज्या सुकतात, खराब होतात. दुसऱ्या दिवशी जर सीन कंटिन्यू होणार असेल तर, पुन्हा सगळ्या भाज्या तशाच्या तशा विकत आणाव्या लागतात…
सीन संपल्यानंतर त्या भाज्यांचं काय करत असतील? हा गहन, महान प्रश्न मला कायम भेडसावयचा. जेव्हा हा सीन करणं माझ्या वाट्याला आला, तेव्हा मी विचारलं, की “काय रे आता सीन तर झाला… या भाजीचं काय करणार?” तर तो मुलगा म्हणाला, “काही नाही माई. आता ती टाकून देणार.” मला खूप वाईट वाटलं. माझं तोंड बघून तो म्हणाला, “माई, तू एक काम कर… ही भाजी घरी घेऊन जा आणि उद्या मस्तपैकी काही तरी बनवून आण.” मग काय मी एकदम खूश! कारण भाजी वाया जाणार नव्हती आणि मलाही काहीतरी बनवून सगळ्यांसाठी नेता येणार होतं.
पालक आणि मेथीच्या जुड्या होत्या. पॅकअप होईपर्यंत अधून मधून मेकअप रूममध्ये मी पालक आणि मेथीच्या जुड्या निवडून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी उशिराच कॉलटाइम होता (शूटिंगला उशिरा यायचं होतं). मग काय मेथीचे मुठे आणि पालकाचे पराठे बनवले. सेटवर सगळे जण खाऊन तृप्त झाले!
हेही वाचा – सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!
आता सगळ्यांना सवय लागली. भाज्यांचा सीन झाला की, त्या भाज्या माईला द्यायच्या. “माई गं, लाल माठाच्या भाजीत ना ओल खोबरं जरा जास्त घाल हां… उद्या मेथीचे पराठे कर गं… पालकाची भजी… लसूनी मेथी…” एक ना दोन… मला मस्त वाव मिळत होता आणि सेटवरच्यांना मेजवानी!
एका सीरियलच्या वेळी तर गवार आणून ठेवली होती सीनसाठी. किलोभर गवार मी सीनमध्ये मोडून ठेवली. झालं “माई, उद्या तेवढी गवारीची भाजी बनवून आणा हां मस्तपैकी!”
“परवा आणू का? उद्या सगळ्यांना सुका जवळा बनवून हवाय. जवळा भाकऱ्या बनवून, शिवाय गवारीची भाजी बनवायची तर, मला यायला उशीर होईल ना!”
हेही वाचा – स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!
“चालेल. उद्या तुम्हाला उशिराचा कॉलटाइम देतो.”
झालं… असा आनंदी आनंद!
माझी स्वयंपाक करायची हौस अशीपण पूर्ण होते. म्हणजे, घरचा स्वयंपाक मी घरी करतेच, पण हे प्रकरण जास्तीचंही असतं!
एरवीसुद्धा अन्न वाया जाणार नाही, याची काळजी घ्या. शेतकऱ्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी खूप कष्ट पडतात. आपल्याला सुद्धा ते अन्नधान्य विकत घेण्याकरिता कष्ट करून कमवावं लागते. तेव्हा अन्नधान्याची नासाडी होणार नाही, याची जमेल तेवढी काळजी घ्या…


