पल्लवी खरोसे आंबेकर
भाग – 7
दिवसेंदिवस शार्वीचा पार्थमध्ये इंटरेस्ट वाढत चालला होता. ती जास्तीत जास्त वेळ कसा तो तिच्यासोबत असेल हेच बघायची. त्याला आणि गरिमालाही हे जाणवत होतं की, ती त्याच्या जवळ रहायचा प्रयत्न करत आहे. पण का? ते त्यांना समजत नव्हतं आणि तिच्याशी बोलणार तरी काय? त्यामुळे ते दोघेही तिला इग्नोर करायचे. पण तिला हे कुठेतरी खुपत होतं.
पार्थ आणि गरिमाची जवळीक तिला खुपायची. तिला किती जरी गरिमाचा राग आला, तरी ती तिला काही बोलत नव्हती. कारण घाईमध्ये जर तिने गरिमाविरोधात काही केलं, तर तीच चुकीची दिसणार होती. त्यामुळे ती योग्य संधीची वाट पाहात होती.
तो आपल्यासोबत राहावा, यासाठी ती त्याला त्याच्यासोबत मीटिंग किंवा साइटवरही घेऊन जात होती… असंच एक दिवस ते तिघेही साइटवर पाहणीसाठी गेले होते. ते कन्स्ट्रक्शनचं काम बघत होते आणि तिथला इंजिनीअर त्यांना सगळं समजावून सांगत होता. चालत असताना अचानक पार्थला कशाचा तरी आवाज आला, त्याने बाजूला बघितलं तर तिथं ठेवलेला एक पोल हळूहळू सरकत होता. शार्वी त्यापासून काहीच इंच दूर होती. बस, तो आता तिच्यावर कोसळणार होता. पण तो तितक्यात पुढे धावला आणि त्याने तो पोल पूर्ण बळ एकवटून विरुद्ध दिशेला ढकलला.
हेही वाचा – पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…
पण या गडबडीत तो शार्वीला घेऊन खाली कोसळला. तो खाली आणि ती त्याच्यावर पडली. त्याने तिला दूर करायचा प्रयत्न केला, पण ती दूर झाली नाही. कारण तिने त्याला घट्ट पकडलं होत आणि ती त्याच्या नजरेतही गुंतली होती. आजूबाजूला काय होतंय, याचं तिला जराही भान नव्हतं. पण तो तर भानावर होता… त्याला त्या परिस्थितीची जाणीव होती. सगळे त्यांच्याकडेच बघत होते आणि त्यात गरिमा… तिची तर विचारायची सोय नाही! असं वाटत होत की, ती त्याला आता नजरेनेच जाळून राख करणार आहे. त्याने तिच्याकडे केविलवाण्या नजरेन बघितलं… तिने इशारा करताच त्याने बॉसला आवाज दिला… पण तो आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. त्याने तिला हलवून मोठ्याने आवाज दिला, तेव्हा ती भानावर आली आणि पटकन उठून बाजूला झाली.
आता तिने आजबाजूला पाहिलं तर, सगळे तिच्याकडेच पहात होते. ती त्यांच्या नजरेने ओशाळाली आणि तिथून निघून गेली. तिथल्या इंजिनीअरने सगळ्यांना तिथून कामावर पिटाळून लावलं.
नंतर त्यांनी इकडची तिकडची जरा पाहणी केली आणि ते तिघे ऑफिसला निघून गेले.
0000
ती आल्या आल्या डायरेक्ट आपल्या केबिनमध्ये गेली आणि चेअरला रेलून बसली. तिच्या डोळ्यांसमोर थोड्यावेळापूर्वी घडलेला प्रसंग आला. ती स्वतःलाच प्रश्न करत होती की, ती कशी एवढी त्याच्या नजरेत गुंतली होती? असं कसं होऊ शकतं? कशी ती एका साधारण व्यक्तीच्या आणि तिच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते? ज्यांच्यात दूर दूरवर काहीच बरोबरी नव्हती….
तिचं एक मन असा विचार करत होतं. तर दुसरं मन म्हणत होतं, ‘शार्वी प्रेम कधीही आणि कोणावरही होऊ शकतं… त्यामध्ये ना क्लास असतो, ना पैसा असतो, ते फक्त प्रेम… पण हे खरंच प्रेम आहे की, दुसरं काही?
पण तो…! त्याला मी आवडत असेन का? जर मी त्याला आवडत असते, तर त्याच्याही डोळ्यांत मला प्रेम दिसलं असतं. पण ते तर कधी नाही दिसलं…
शार्वी असंही असू शकतं की, तो तुझ्यावर प्रेम करत असेल. पण तुला सांगायला घाबरत असेल. कारण तू त्याची बॉस आहेस… वरून एका श्रीमंत बापाची एकुलती एक लाडकी मुलगी, कोणी सामान्य मुलगी नाही… आणि विचार कर जर त्याचं तुझ्यावर प्रेम नसतं, तर त्याने त्याच्या जीवाची पर्वा न करता थोडीना तुला वाचवलं असत! तोही तुझ्यावर प्रेम करतो. मला वाटतं शार्वी आता तुलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे! तू त्याच्याशी बोलून बघ… कदाचित तो तुझ्या बोलण्याची वाट बघत असेल.
तिच्या मनात नुसताच विचारांचा कल्लोळ माजला होता.
हेही वाचा – अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!
तिने मनातच काहीतरी ठरवलं. तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली… थोडावेळ तिने तिचं ऑफिसवर्क केलं आणि घरी जायला निघाली… जाता जाता तिने त्याच्या डेस्ककडे एक नजर टाकली, तर तो त्याच्या कामात बिझी होता. काम करतानाचा तो, तिला खूपच आवडला. तशीच स्माइल करत ती बाहेर निघून गेली…
0000
गरिमा आपल्या बॉसचे बदलेले सगळे अंदाज नोट करत होती. आताही तिने बॉसला त्याच्याकडे बघून हसताना आणि लाजताना पाहिलं होत. आता तिला या विषयावर पार्थशी बोलण्याची गरज आहे, असं वाटू लागलं होतं. हा विषय वाढण्याआधी आणि काही विपरीत घडण्याआधी तिथेच स्पष्ट बोलून थांबवलेला बरा, असं वाटू लागलं होत. तिने पार्थला ‘ऑफिस टाइमनंतर भेट काही महत्वाचं बोलायचं आहे’ असा मेसेज केला.
ऑफिस टाइम झाला, तसा तो तिची वाट बघत गेटबाहेर थांबला होता. ती आल्यावर त्याने आपली बाइक एका पार्ककडे वळवली. बाइकवर दोघेही शांत होते. ना तो बोलत होता, ना ती काही बोलत होती. दोघांमध्ये कमालीची शांतता होती. कारण त्याला कारणही तसंच होतं… त्यालाही कळलं होत की, तिला नक्की काय बोलायचं आहे… त्यांचं नेहमीच ठिकाण आलं तसं त्याने बाइक थांबवली आणि दोघेही एका शांत ठिकाणी जाऊन बसले. तो आता ती काय बोलणार याची वाट बघत होता…
0000
ती घरी येऊन उद्याची तयारी करत होती. उद्याचा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, असं वाटत होतं.
क्रमश:
काय घडणार आहे उद्या असं..? पाहू नेक्स्ट पार्टमध्ये…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


