अध्याय तेरावा
म्हणाल हिरवें चारीं गुरूं । विसरे मागील मोहर धरूं । कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ॥314॥ तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्ती । वाहविला मती । आकळेना ॥315॥ तरि तैसें नोहे अवधारा । कारण आहे विस्तारा । एऱ्हवीं पद तरी अक्षरां । तिहींचेंचि ॥316॥अहिंसा म्हणतां थोडी । परि तेचि होय जी उघडी । जैं लोटिजती कोडी । मतांचिया ॥317॥ एऱ्हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें बोलिजैल ते न सरे । तुम्हांपाशीं ॥318॥ रत्नपारखियांचा गांवीं । जाईल गंडकी तरि सोडावी । काश्मीरीं न करावी । मिडगण जे ॥319॥ काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा । पिठाचा विकरा । तिये सातें ॥320॥ म्हणोनि इये सभे । बोलकेपणाचेनि क्षोभें । लागसर न लभे । बोला प्रभु ॥321॥ सामान्या आणि विशेषा । सकळे कीजेल देखा । तरी कानाचेया मुखा- । कडे नेयाल ना तुम्ही ॥322॥ शंकेचेनि गदळें । जैं शुद्ध प्रमेय मैळे । तैं मागुतां पाउलीं पळे । अवधान येतें ॥323॥ कां करूनि बाबुळियेची बुंथी । जळें जियें ठाती । तयांची वास पाहाती । हंस काई ॥324॥ कां अभ्रापैलीकडे । येत चांदिणें कोडें । तैं चकोरें चांचुवडें । उचलितीना ॥325॥ तैसें तुम्ही वास न पाहाल । ग्रंथु नेघा वरि कोपाल । जरी निर्विवाद नव्हैल । निरूपण ॥326॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जें बीज भुईं खोंविलें, तेंचि वरी रुख जाहलें
अर्थ
कदाचित आपण असे म्हणाल की, हिरव्या चार्यांत जनावर सुटले असतां ते जसे (चार्याच्या लोभाने) पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते अथवा वार्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो ॥314॥ त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने, माझी बुद्धी वहावत गेली, ती आवरत नाही. ॥315॥ तर ऐका, महाराज, तसे नाही विस्तार करण्याला कारण आहे. नाही तर अहिंसा हे पद लीन अक्षरांचे न आहे. ॥316॥ अहिंसा म्हणावयास थोडी आहे. परंतु जेव्हा कोट्यावधी मतांचा विचार करून त्यांचे खंडण करावे तेव्हा महाराज ती स्पष्ट होते. ॥317॥ एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता आंगच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही. ॥318॥ रत्न पारखणार्या लोकांच्या गावात गंडकी (कसोटीचा शालिग्रामासारखा दगड) रत्न म्हणून विकली जाईल, असे वाटत असेल, तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी; (तसेच) सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी ती पुरी होणार नाही, म्हणून तिची स्तुती करू नये. ॥319॥ ऐका जेथे (ज्या बाजारात) कापराला ‘वास मंद आहे’ असे म्हणतात, त्या बाजारात (कापूर म्हणून) पिठाची विक्री कशी होईल? ॥320॥ म्हणून महाराज, या सभेमध्ये (नुसत्या) बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक (पसंती) मिळणार नाही. ॥321॥ सर्व साधारण अशी अहिंसेची कल्पना, निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसेसंबंधाने विशेष कल्पना, यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपण आपल्या कानाच्या मुखांकडे नेणार नाही ॥322॥ शंकारूपी कचर्याने जेव्हा स्चच्छ सिद्धांत मळला जातो, तेव्हा त्या सिद्धांताकडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पाउलीच पळेल. ॥323॥ गोंडाची खोळ पांघरून जी उदके असतात, त्या उदकांची हंस वाट पहातात काय? ॥324॥ किंवा ढगांमधून ज्या वेळेला चांदणे येते, त्या वेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपयोग करून घेण्याकरिता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत. ॥325॥ त्याप्रमाणे जर माझे निरूपण शंकारहित होणार नाही, तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही, इतकेच नव्हे तर, शिवाय आणखी तुम्ही रागावाल. ॥326॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते


