अध्याय तेरावा
यालागी साचोकारें । मनीं अहिंसा थांवे थोरें । पिकली द्रुती आदरें । बोभात निघे ॥304॥ म्हणोनि इंद्रियें तेचि संपदा । वेचितांहीं उदावादा । अहिंसेचा धंदा । करितें आहाती ॥305॥ समुद्रीं दाटे भरितें । तैं समुद्रचि भरी तरियांते । तैसें स्वसंपत्ती चित्तें । इंद्रियां केलें ॥306॥ हें बहु असो पंडितु । धरुनि बाळकाचा हातु । वोळी लिही व्यक्तु । आपणचि ॥307॥ तैसें दयालुत्व आपुलें । मनें हातापायां आणिलें । मग तेथ उपजविलें । अहिंसेतें ॥308॥ याकारणें किरीटी । इंद्रियांचिया गोठी । मनाचियेचि राहाटी । रूप केलें ॥309॥ ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा । जाहला ठायीं जयाचां । देखशील ॥310॥ तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचें वेळाउळ । हें असो निखळ । ज्ञानचि तो ॥311॥ जे अहिंसा कानें ऐकिजे । ग्रंथाधारें निरूपिजे । ते पाहावी हें उपजे । तैं तोचि पाहावा ॥312॥ ऐसें म्हणितलें देवें । तें बोलें एकें सांगावें । परी फांकला हें उपसाहावें । तुम्हीं मज ॥313॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : लीलाकमळें खेळणें, पुष्पमाळा झेलणें
अर्थ
ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर पडतो, त्याप्रमाणे मनामध्ये अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रियव्यापारांतून दिसून येते. ॥304॥ म्हणून (ती सर्व) इंद्रिये (मनात असलेल्या) त्याच अहिंसारूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतांनाही आपला अहिंसेचा व्यवहार पूर्णपणे करीत असतात. (म्हणजे अहिंसेचा इंद्रियांकडून अव्याहत खर्च होऊनसुद्धा अहिंसारूप भांडवल संपत नाही). ॥305॥ समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे, जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो, त्याप्रमाणे (चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे) चित्तच या सर्व इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकते. ॥306॥ हे फार बोलणे राहू दे. पंतोजी ज्या वेळी मुलाचा हात धरून त्याला अक्षरांच्या ओळी काढावयास शिकवितो, त्या वेळी मुलाचा हात धरून पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो ॥307॥ त्याप्रमाणे मनाने आपले दयाळुत्व हातापायांस आणले व मग तेथे (म्हणजे हातापायांचे ठिकाणी) मनानेच अहिंसेला उत्पन्न केले. ॥308॥ म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनानेच मनाच्या अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले. ॥309॥ याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल ॥310॥ तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. हे राहू दे, तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्तीच होय. ॥311॥ जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा ज्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण (वर्णन) करतो, ती अहिंसा पाहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हा त्या पुरुषालाच पाहावे. ॥312॥ (ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या जवळ परिहार देतात) असे जे देव म्हणाले, ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे; परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला, याबद्दल मला आपण क्षमा करावी. ॥313॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जें बीज भुईं खोंविलें, तेंचि वरी रुख जाहलें


