भाग – 34
फोन ठेवताना तिने नंदिनीकडे पाहिलं, आणि दोघींमध्ये एक समजूतदार हसू उमटलं.
“आईचं काय?” नंदिनीने डोळ्यांनीच खुणावलं.
आराध्याने डोळे मिचकावत उत्तर दिलं, “नेहमीसारखी काळजी, पण आज ती फार समाधानात होती… बहुधा मी शांत आवाजात बोलले म्हणून.”
त्या क्षणी, नंदिनीच्या हातात असलेल्या फोनवर एक मेसेज हलकासा चमकला —
“Safe arrival confirmed. Good work. – S”
आराध्याने घरी आईला कॉल केला होता तेव्हा… तिचा आवाज शांत होता, पण शब्दांतून एक नकळतपणे काळजी दिसत होती…
“आई… हो गं, मी पूर्णपणे सुरक्षित आहे. नंदिनी सोबत आहे मी. तू काळजी करू नकोस. काही दिवस इथेच राहणार आहे…”
ती पुढे काही सांगणार, इतक्यात तिच्या आईच्या घरात दुसऱ्या खोलीत कुणीतरी सावधपणे कान देऊन हे संभाषषण ऐकत होतं…
निशा!
ती हळूच दरवाज्याच्या आड उभी राहिली होती. ती संशयाने अंदाज घेत होती, पण नजरेत निश्चयी कपट होतं…
“नंदिनी? कोण नंदिनी? तिथेच राहणार म्हणतेय?” ती मनातल्या मनात म्हणाली… “ही मुलगी काहीतरी लपवत आहे… आणि बहुधा शर्वाय सोबतच आहे.”
आराध्याचं बोलणं संपलं. निशा मागे सरकली. तिने पर्समधला फोन बाहेर काढला आणि काही सेकंद थांबून एक नंबर डायल केला — माधवचा!
“माधव, मला आराध्याबद्दल काही नवीन माहिती मिळाली आहे. ती म्हणते की, ती नंदिनी नावाच्या मैत्रिणीसोबत आहे. पण तिचं बोलणं अगदी बनावट वाटलं मला.”
दुसऱ्या टोकाला माधवच्या चेहऱ्यावर कठोर भाव उमटले… “खूप दिवसांनी काहीतरी हातात आलंय,” तो म्हणाला.
“तिच्या त्या ‘मैत्रिणी’चा माग काढ आणि शक्य असेल तर फोन नंबर, फोटो काही मिळव,” निशा म्हणाली.
हेही वाचा – आराध्याच्या सशक्त अस्तित्वाची साक्ष देणारी कॉन्फरन्स
या फोन कॉलनंतर माधवच्या हालचालींना वेग येतो. तो नंदिनीच्या ओळखीचा माग काढायला लागतो आणि शर्वायला हे समजण्याआधीच तो आराध्याच्या आसपास काहीतरी नवं जाळं विणण्याची तयारी करतो…
पण शर्वायही शांत बसलेला नाही. तो आधीच नंदिनीवर आणि आराध्यावर लक्ष ठेवतोय. त्यांचा प्रत्येक संवाद, त्यांच्या संपर्कातील सगळ्या गोष्टी ट्रॅक होऊ लागतात. आराध्या अजूनही या सगळ्यापासून अनभिज्ञ आहे; पण तिच्या भोवतीचं जग आता एक नवं वळण घेतंय…
निशा-माधव यांचे नव्याने कटकारस्थान सुरू झालं होतं… पण त्या खेळात शर्वायसारखा खेळाडू आधीपासूनच उतरला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनीच्या फ्लॅटवर आराध्या आत्ता कुठे झोपेतून नुकतीच उठली होती. खिडकीतून कोवळं ऊन येत होतं. तिने मोबाइल बघितला — कोणाचाही कॉल नव्हता. शर्वायचा एक टेक्स्ट होता…
“सकाळ ताजीतवानी वाटतेय का? सगळं व्यवस्थित आहे ना? नंदिनी आहेच सोबत. Don’t worry. I’ve got you.”
आराध्याच्या ओठांवर नकळत हसू आलं. पण त्याच वेळेस दुसऱ्या टोकाला माधवच्या ऑफिसमध्ये निशा येते. तिच्या हातात एक छापील स्क्रीनशॉट होता…
“हा बघ, आराध्याने ज्या नंबरवरून फोन केला होता, तो ट्रेस केलाय. पुण्याजवळच्या रिसॉर्टवर अॅक्टिव्हेट झाला काही आठवड्यांपूर्वीच आणि ‘नंदिनी’ नावाची जी मुलगी आहे – तिच्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.”
माधव खुर्चीत बसून कपाळावर हात ठेवून विचारात करू लागला…
“खोटं नाव असावं… शर्वायचाच डाव असेल… मला वाटतं आराध्या आपल्या हातून निसटतेय, आणि त्याच्याजवळ पोहोचतेय!”
माधव कोणाला तरी फोन करतो…
“मला त्या नंबरचं मूळ लोकेशन हवंय… आणि नंदिनी नावाचा भूतकाळही संपूर्ण हवा. आपल्याकडे जास्त वेळ नाही आता.”
त्याच वेळेस, शर्वायच्या ऑफिसमध्ये दत्ता एक लपवलेला रिपोर्ट घेऊन येतो.
“सर, माधव आणि निशा दोघंही काहीतरी शोधतायत. पण आपल्या माणसांनी दिशाभूल करणारा क्लू सोडला आहे – ते आता पुण्याजवळच्या एका रिसॉर्टवर लक्ष केंद्रीत करतायत.”
शर्वाय एक दीर्घ श्वास घेतो, खिडकीबाहेर पाहात म्हणतो…
“छान. त्यांनी तिकडं बघावं, तोपर्यंत आराध्या सुरक्षित राहील. पण आता मला दुसऱ्या टप्प्यात जायचंय. माधवच्या पुढचं पाऊल मला आधीच ओळखायला हवं.”
आराध्या अजूनही नंदिनीच्या फ्लॅट वर होती, पण तिच्या मनात एक प्रश्न होता —
“मी इतकी महत्त्वाची का झालेय?”
तिचं आयुष्य एका वेगळ्याच प्रवाहात वाहत होतं… आणि त्या प्रवाहाच्या किनाऱ्यावर उभा होता एक पुरुष — शर्वाय, जो केवळ तिचा रक्षणकर्ता नव्हता, तर तिच्या मनाचा विश्वासही होत चालला होता.
निशा मात्र मिळालेल्या नंबरवर ‘नंदिनी’शी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती…
आराध्या नंदिनीच्या फ्लॅटवर सुरक्षित आहे. त्या रात्री आकाशात विजा चमकत होत्या. अवकाळी पावसाची शक्यता होती. आभाळ दाटून आलं होतं. वातावरणात एक गूढ शांतता होती. अचानक तिला वाटतं — कुणीतरी तिच्या हृदयाच्या धडधडीत सामील झालंय.
दाराजवळ जराशी हालचाल जाणवते… ती दार उघडते, तर समोर शर्वाय उभा होता — पावसात चिंब भिजलेला… डोळ्यांत एक हळूवार, पण निर्धारयुक्त भाव होता.
“आराध्या,” तो म्हणतो, “हे सगळं मी केवळ तुझ्या सुरक्षेसाठी केलं… पण या सगळ्या संरक्षणाच्या आड माझं स्वतःचं मन तुझ्याकडे हरवत गेलंय. तू माझ्यासाठी केवळ एक जबाबदारी नाहीस, तू माझी निवड आहेस, तू माझी आहेस…”
आराध्याच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले होते. ती काही न बोलता त्याच्याजवळ गेली. शर्वाय तिचा हात हळूच हातात घेतो,
“तुला स्वप्नांप्रमाणे जपायचंय, पण वास्तवात…”
पावसाच्या पार्श्वभूमीवर त्याने तिला आपल्या बाहुपाशात बंदिस्त केलं… दोघांचं एकमेकांना आलिंगन… त्यात न शब्द होते, न शंका — फक्त नात्याची कबुली!
शर्वायच्या मिठीत आराध्याला एक वेगळीच शांतता जाणवली. जणू सगळ्या धडपडीला, सगळ्या शंकांना त्या क्षणात विश्रांती मिळाली होती.
शर्वायने तिच्या केसांवरून अलगद हात फिरवला. तिचे डोळे मिटले होते, आणि मन पूर्णपणे त्या क्षणात विरघळून गेले होते.
“माझ्या आयुष्यातलं सगळ्यात खरा आणि सुंदर क्षण आहेस तू,” तो कुजबुजला.
आराध्या एक क्षण थांबली. मग त्या मिठीतून हलकेच बाजूला झाली, आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली…
“आजवर अनेकांनी मला फक्त दूषणं दिली… पण तुम्ही एकटेच आहात, ज्यानी मला वास्तवात सुरक्षित असल्याची जाणीव दिली. तुम्हीच माझा विश्वास आणि स्थैर्य आहात, शर्वाय!”
आज खऱ्या अर्थाने दोघांनी एकमेकांना कबुली दिली होती… पावसाच्या साक्षीने! शर्वायच्या अंगावरून पाणी ओघळत होतं… बाहेर पाऊस अजूनही सुरू होता, पण त्यांच्यातला क्षण थांबलेला वाटत होता.
हेही वाचा – आराध्याची नवी मैत्रीण नंदिनी कोण होती?
आराध्या आत गेली — आणि काही क्षणांत एका मऊ टॉवेलसह परतली. शर्वाय हलकंसं हसत होता, त्याच्या डोळ्यांत अजूनही त्या क्षणाचं दृश्य तरळत होतं. तो काही बोलणार, इतक्यात आराध्या त्याच्यासमोर येऊन थांबली.
“बसा… आता थोडं शांत रहा,” ती हळूच म्हणाली.
शर्वाय तिच्याकडे बघत राहिला. आराध्या हळूवारपणे त्याचं डोकं पुसू लागली — केसांमधून ओघळणारं पाणी तिने सावधपणे टिपलं. त्याच्या कपाळावरचे थेंब, भुवया, गालावरचे ओघळ, सगळं काही प्रेमाने सावरत होती…
“तुम्हाला त्रास होत नाही पावसात?” तिने अचानक विचारलं…
शर्वाय शांतपणे उत्तरतो, “त्रास फक्त तेव्हा होतो… जेव्हा तू दूर जातेस.”
आराध्या क्षणभर स्तब्धच झाली.
त्या थोड्याशा पावसात, त्या शब्दांनी तिच्या हृदयाचा ठाव घेतला होता… ओठांवर एक लाजरं स्मित विलसत होतं…
तो टॉवेल बाजूला ठेवून तिने त्याच्याकडे पाहिलं… आणि त्या निःशब्द नजरेत एक वचन होतं — “आता मी आहे, तुझ्यासोबत. कायम.”
शर्वायचं डोकं पुसून झाल्यावर आराध्या त्या टॉवेलला अलगद घडी घालून बाजूला ठेवते. पावसाची रिमझिम सुरू होती, जणू त्यांच्या मधुर क्षणाला साक्ष देत…
शर्वाय उठून तिच्या समोर आला. दोघं काही क्षण एकमेकांकडे फक्त पाहात राहिले. त्या नजरेत शंका नव्हती, ना प्रश्न, ना कोणत्या वेदना — फक्त आत्ता आणि इथलं सत्य होतं.
आराध्याने हळूच हात पुढे केला. तिच्या मुठीत एक छोटी चांदीची डबी होती…
“ही… मी खूप दिवसांपासून देणार होते तुम्हाला,” ती म्हणाली.
शर्वाय डबी पाहतो — ती अगदी जुनी, कोरलेली, अनेक वर्षांपूर्वीची वाटली…


