अध्याय तेरावा
तरि तरंगु नोलांडितु । लहरी पायें न फोडितु । सांचलु न मोडितु । पाणियाचा ॥245॥ वेगें आणि लेसा । दिठी घालुनि आंविसा । जळीं बकु जैसा । पाउल सुये ॥246॥ कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबैल केसर । इया शंका ॥247॥ तैसे परमाणु पां गुंतले । जाणुनि जीव सानुले । कारुण्यामाजीं पाउलें । लपवूनि चाले ॥248॥ ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेह भरितु । जीवातळीं आंथरितु । आपुला जीवु ॥249॥ ऐसिया जतना । चालणें जया अर्जुना । हें अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥250॥ पैं मोहाचेनि सांगडें । लासी पिलीं धरी तोंडें । तेथ दांतांचे आगरडे । लागती जैसे ॥251॥ कां स्नेहाळु माये । तान्हयाची वास पाहे । तिये दिठी आहे । हळुवार जें ॥252॥ नाना कमळदळें । डोलविजती ढाळें । तो जेणें पाडें बुबुळें । वारा घेपे ॥253॥ तैसेनि मार्दवें पाय । भूमीवरी न्यसीतु जाय । लागती तेथ होय । जनां सुख ॥254॥ ऐसिया लघिमा चालतां । कृमिकीटक पंडुसुता । देखे तरि माघौता । हळूचि निघे ॥255॥ म्हणे पावो धडफडील । तरि स्वामीची निद्रा मोडैल । रचलेपणा पडैल । झोती हन ॥256॥ इया काकुळती । वाहणी घे माघौती । कोणेही व्यक्ती । न वचे वरी ॥257॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाना रोगीं अहाळलीं, लोळतीं भूतें देखिलीं
अर्थ
तर लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज (खळखळ) न मोडू देता ॥245॥ वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टि ठेवून, बगळा जसा पाण्यात पाय घालतो, ॥246॥ अथवा भ्रमर जसे कमळावर, कमळातील बारीक तंतु चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात, ॥247॥ त्याप्रमाणे परमाणूंमधे लहान जीव आहेत, असे जाणून दयेमधे आपली पाऊले लपवून चालतो ॥248॥ तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते, ती दिशाच तो प्रेमाने भरलेली करतो व प्राण्यांच्या खाली आपला स्वत:चा प्राण अंथरतो ॥249॥ अर्जुना, अशा रीतीने जपून त्याचे चालणे असते त्या चालण्याचे वर्णन वाचेने करता येत नाही; आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले, तर ते पुरे पडत नाही ॥250॥ जेव्हा मांजरी मायेने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते, त्या वेळी त्या पिल्लास जशी तिच्या दातांची टोके लागतात (मांजरीने दातांनी पिल्लू जरी बळकट धरलेले असते, तरी त्यांस दात लागत नाहीत) ॥251॥ अथवा प्रेमळ आई जशी आपल्या तान्ह्या मुलाची वाट पहाते, त्या दृष्टीमधे जो नाजूकपणा असतो, ॥252॥ अथवा वारा घेण्याकरता कमळाचे फूल हळू हळू हालविले असता, त्यापासून निघालेला वारा, तो ज्याप्रमाणे डोळ्याच्या बुबुळास मोठा सुखकर वाटतो ॥253॥ तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवीत (तो) जातो. (त्याचे) ते पाय जेथे लागतील तेथे लोकांना सुख होते ॥254॥ अर्जुना, अशा हळूपणाने चालत असतांना (त्याने जर) कृमिकीटक पाहिले तर, तो हळूच माघारा फिरतो ॥255॥ तो म्हणतो, पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर (सर्व भूतांना व्यापून असलेल्या) प्रभूची झोप मोडेल व असलेल्या सुखरूपतेस विक्षेप येईल ॥256॥ या करुणेने तो मागे परततो व कोणत्याही प्राण्यावर पाय ठेवीत नाही. ॥257॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पहिलें अहिंसेचें नांव, आम्हीं केलें जंव


