पल्लवी खरोसे आंबेकर
भाग – 5
पार्थ आणि गरिमा एकाच दिवशी अग्रवाल कंपनीत जॉइन झाले. दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्यावर बराच कामाचा लोड पडायला लागला. तोही पूर्ण वेळ देऊन त्याचं काम करत होता. कधी कधी तर तो कामात एवढं बुडून जायचा की, त्याला जेवायलाही वेळ मिळायचा नाही. पण यामध्ये समोरासमोर टेबलं असल्याने त्या दोघांची नेहमीच नजरानजर व्हायची. कितीही वाटलं तरी ते एकमेकांना टाळू शकत नव्हते. तीही आता त्याला प्रतिसाद देत होती. तिच्याही मनात त्याच्याबद्दल भावना जन्म घेत होत्या… पण या भावनांना नाव मिळणार होतं का?
दिवसावर दिवस जात होते. आता ते दोघे एकमेकांशी बोलायला लागले होते. एकमेकांना समजून घेत होते. एकमेकांची काळजी घेत होते… आता अधेमधे ती त्याच्या घरीही जात होती. तिची त्याच्या आईशी (विभा) चांगली ओळख झाली होती. ती अनाथ होती, त्यामुळे तिला त्याच्या आईचा स्वभाव आणि सहवास दोन्हीही आवडायचा. जेव्हा जेव्हा तिला रिकामा वेळ मिळायचा, तेव्हा ती त्यांना घेऊन बाहेर जायची. दोघीना आता एकमेकींची चांगलीच सवय झाली होती. त्यांनी तर मनोमन तिला आपली सून म्हणून पसंतही केलं होतं… पण असं होणार होतं का?
नवीन प्रोजेक्ट सुरू झाल्यामुळे तोही आता खूप बिझी झाला होता आणि गरिमाही खूप बिझी झाली होती. नवीन प्रोजेक्ट म्हटल्यावर मीटिंग वगैरे सगळंच आलं, जे गरिमाला मॅनेज करावं लागायचं. ती शार्वीची सेक्रेटरी असल्यामुळे तिला नेहमीच तिच्यासोबत असणं गरजेचं होतं. परत तिला काय हवं, काय नको, हे बघणंही तिचंच काम होतं आणि या सगळ्यामुळे त्या दोघांना म्हणावा तसा एकमेकांसाठी वेळ मिळत नव्हता. दोघांनी भलेही एकमेकांना प्रपोज केलं नव्हतं किंवा एकमेकांच्या मनातलं सांगितलं नव्हतं, तरीही त्यांच्या डोळ्यांत एकमेकांप्रति असलेलं प्रेम दिसत होतं…. त्या दोघांनाच नाहीतर इतरांनाही!
हेही वाचा – …अन् आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले!
कधी कधी गरिमाला शार्वीसोबत आऊटडोअर मीटिंगसाठीही जाव लागायचं.. पण ती तिला बोलायची एक संधीही द्यायची नाही… शार्वी तिचा नेहमी अपमान करायची, तिच्या राहणीमानावरून किंवा इतर करणाहून, याच्याच शोधात शार्वी असायची… पण गरिमा नेहमी शांतच असायची.
पार्थलाही बोलायचा किंवा त्याला सुनावायचा मोका शार्वी शोधायची. त्याची छोटीना छोटी गोष्ट ती नजरेखालून घालायची. पण तो त्याच्या कामात अगदी परफेक्ट होता. तो तिला कधी बोलायची संधी द्यायचाच नाही. यावरून तरी तिला कळलं होत की, तो कामात खूप सीन्सिअर आहे… आणि तिने हे मान्यही केलं होतं की, तो दिसायलाच नाहीतर माइंडनेही खूप शार्प आहे!
त्याला आता कामाचा खूप कंटाळा आला होता आणि त्यात त्याला मित्राचा फोन आला की, ‘नवीन मुव्ही लागलीय येतो का पाहायला?’ तो लगेचच तयार झाला, कारण त्याला हॉलिवूडच्या मुव्ही खूप आवडायच्या आणि त्याला ब्रेकही हवा होता… पण आता परमिशन कशी घ्यायची? हा प्रश्न होता. त्यासाठी हाफ डे तर लागणार होता. त्याने समोर पाहिलं तर गरिमा दिसली. त्याने तिच्याकरवी परमिशन घ्यायच ठरवलं. त्याला माहिती होतं की, तो खोटं कारण देऊन चुकीचं करत आहे, पण त्याच्याकडे त्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने स्वतःला नॉर्मल केलं आणि तो तिच्याकडे गेला. तिने त्याच्याकडे ‘काय?’ या अविर्भावात पाहिले.
“मॅम आहेत का..?” तो तिच्याकडे पाहात म्हणाला.
“नाही. त्यांना अचानक एक इमर्जन्सी आली, त्यामुळे त्या घरी गेल्या आहेत… तुझं काही काम होत का?” तीही त्याच्याकडे बघत म्हणाली.
“काही नाही… ते… माझा एक फ्रेंड दवाखान्यात ॲडमिट आहे. त्याला भेटायला जायचं होतं. सो, मला हाफ डे हवा होता…” तो नजर चोरत म्हणाला.
“त्याला भेटायला जाणं खूप महत्त्वाचं आहे का?” त्याच्या नजर चोरण्यामुळं तिने परत एकदा कन्फर्म केलं.
“खूप जवळचा मित्र आहे… जावंच लागेल. बघ ना मॅमना विचारून…” त्याने रिक्वेस्ट केली.
“हं… एक मिनिट थांब, मी विचारते…” तिने लगेच शार्वीला विचारून त्याला परमिशन दिली.
परमिशन मिळताच तो खूश झाला.
“थँक यु सो मच गरिमा, मला परमिशन मिळवून देण्यासाठी…” तो हसत म्हणाला.
“ठीक आहे… ठीक आहे… जा आता तू, नाहीतर उशीर होईल…” ती त्याला म्हणाली.
त्याने त्याचं आवरलं आणि घाईतच निघून गेला… त्याचा मित्र बाहेर त्याची वाट बघत होता. पार्थ आला तसं दोघं मुव्हीला निघून गेले… मुव्ही बघून झाल्यावर त्याने त्याच्या मित्राला बसस्टॉपवर सोडलं आणि तो घरी निघून गेला… पण त्याला हे माहिती नव्हतं की, त्याला कोणीतरी तिथं पाहिलं होत!
0000
नेक्स्ट डे इन ऑफिस
दुसऱ्याच दिवशी गरिमा आणि पार्थ दोघेही शार्वीच्या केबिनमध्ये खाली मान घालून उभे होते आणि शार्वी त्या दोघांना ओरडत होती.
“मॅम, यात गरिमाची काहीच चूक नाही. मी तिला जे सांगितलं, ते तिला खरं वाटलं म्हणून तिने तुमच्याकडे परमिशन मागितली. प्लीज तिला ओरडू नका. जी शिक्षा द्यायची ती मला द्या.” पार्थ काकुळतीला येऊन म्हणाला. यावर गरिमाने त्याच्याकडे रागात पाहिलं.
हेही वाचा – गेटवर जी धडकली ‘ती’ पार्थच्या समोर होती…
“ओह… खूप काळजी वाटते आहे तुला हिची, मग याचा विचार खोटं बोलण्याअगोदर करायचा होता. मला असली खोटारडी माणसं माझ्या ऑफिसमध्ये नको आहेत! तुम्ही दोघेही जाऊ शकता आता.” शार्वी त्यांना ओरडत म्हणाली.
तिच्या ओरडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. तोच मिस्टर राजपाल त्या केबिनमध्ये दाखल झाले.
मिस्टर राजपाल यांनी कारण विचारताच शार्वीने कालचं प्रकरण सांगितलं. तीही काल त्याच थिएटरमध्ये तिच्या बेस्ट फ़्रेंड सोबत गेली होती. तेव्हा तिने पार्थला त्याच्या फ्रेंडसोबत तिथे पाहिलं आणि यामुळेच त्या दोघांची सकाळी सकाळी परेड चालू होती. चूक तर पार्थने केली होती. पण त्याला परमिशन मिळवून दिल्याबद्दल गरिमालाही विनाकारण ऐकून घ्यावं लागत होतं आणि बहुतेक आता जॉबही जाणार होता…
राजपाल यांनी सगळं ऐकून घेतलं आणि शार्वीला समजावून, त्या दोघांना एक शेवटचा चान्स द्यायला लावला. मिस्टर राजपाल हे सिनियर होते, त्यामुळे तिला त्यांचं ऐकावं लागलं. पण पुन्हा जर असं वागलं तर, न सांगता फायर केल जाईल, हे तिनं स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं. यावर दोघांनीही होकार दर्शवला आणि आपल्या कामाला निघून गेले… पण पार्थच्या खोटं बोलण्यामुळे गरिमा दुखावली होती…


