साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वीचा काळ एकत्र कुटुंबाचा होता. घरामध्ये काका-काकू, एखादी आत्या, आजी-आजोबा असायचे. नवरा-बायको दोघे जरी नोकरी करणारे असले, तरी त्यांच्या लहान मुलांना सांभाळणारे, त्यांच्यावर लक्ष ठेवणारे, त्यांच्या अभ्यासात थोडीफार मदत करणारे आजोबा; त्या मुलांचे दुपारचे खाणेपिणे उरकणारी, त्यांना कुशीत घेऊन झोपणारी, त्यांना गोष्ट सांगणारी आजी; वेळप्रसंगी फिरायला घेऊन जाणारी, मुलांना ट्युशनला सोडणारी आणि हक्काने रागवणारी आत्या अशी मंडळी एकत्र त्या घरात नांदायची. मुलांचे आई-वडील निर्धास्त आपल्या नोकरीवर जात असत.
संध्याकाळी कामावरून घरी आले की, एखादी पोह्यांची अथवा उपम्याची, शिऱ्याची डिश आणि वाफाळता चहा त्यांच्या स्वागताला तयार असायचा. संध्याकाळी सासूबाई जरी स्वयंपाकघरात नसल्या, तरी भाजी, आमटी किंवा खिचडी, थालीपीठ असे पदार्थ त्यांना विचारून घेत सुनांनी स्वयंपाकघराचा ताबा मिळवलेला असे. सकाळचे जेवण जरी सोबत होत नसले, तरी संध्याकाळी मात्र सगळे एकत्र जेवायला बसत असत आणि हसत-खेळत, गप्पा मारत जेवण होत असे. असे अन्न अंगीदेखील लागायचे. रात्री झोपताना मुलं हक्काने आजी नाहीतर आजोबांच्या कुशीतच असायची. खरंच, ते चित्र खूपच सुखावह होते. त्या नात्यामध्ये मायेचा ओलावा होता.
मनुष्याने शिक्षणात प्रगती केली, पण त्याच्यामधला माणूस हरवायला लागला. शिक्षणासोबत तो जसजसा मोठा होऊ लागला, तसा त्याला पैसा, प्रसिद्धी, सामाजिक स्टेटस मिळालं आणि तो आपले मूळ संस्कार विसरत गेला. बदलत्या काळाबरोबर त्याची लाइफस्टाईल (Lifestyle) देखील बदलत गेले आणि त्याच्यामधील मायेचा झरा आटत गेला. त्याला आपल्यासोबत घरातील इतर माणसे नकोशी झाली आणि एकत्र कुटुंबाची मोठी फ्रेम तुटून फ्लॅट संस्कृती उदयास आली. घराचे घरपण हरवले, अंगणातील तुळस वाळली, फाटकासमोर असलेले एखादे मोठे झाड तुटले, त्यावरची पक्ष्यांची घरटी नष्ट झाली, पक्षी आपला नवीन निवारा शोधायला उडून गेले आणि तिथे चकचकीत अपार्टमेंट उभे राहिले! नाही म्हणायला अंगणातली तुळस कुंडीत आली; वड, पिंपळाचा बोन्साय झाला… मनुष्यासोबतच झाडांचेही जगणे खुरटे झाले.
नाईलाजाने नवीन संस्कृतीसोबत ॲडजस्ट (Adjust) करायचे म्हणून आणि वय वाढले म्हणून घरातील वृद्धांना आपले घर सोडून फ्लॅटमध्ये राहायला यावे लागले. त्या संस्कृतीमध्ये बंद दरवाजामागे त्यांचे जीव घुसमटून निघू लागले. ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पहिल्यांदा आनंद मिळायचा, त्याच गोष्टींची आता कटकट वाटायला लागली. घरांमध्ये आधीही धुसफूस, कुरबुरी व्हायच्या, पण दोन-चार दिवसांत समेट होऊन घर परत आनंदी व्हायचे. त्या छोट्या कुरबुरींचे रूपांतर आपापसातील मोठ्या भांडणांमध्ये कधी झाले, ते कळलेच नाही. त्यामुळे भावाभावांमध्ये, बहिणींमध्ये दुरावा निर्माण झाला आणि घरातील जाणते आई-वडील हतबुद्ध होऊन फक्त उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे काहीच करू शकले नाहीत.
जिथे मुलांनाच आई-वडील नकोसे असतात, तिथे नातवंडांना ती कशी हवीशी वाटणार? ज्या नातवंडांना त्या आजी-आजोबांनी एवढा जीव लावला, तीच नातवंडे हळूहळू त्यांच्यापासून दूर जायला लागली. फ्लॅट लहान आहे म्हणून आणि सगळेच नोकरी करत असल्यामुळे पहिल्यांदा आई-वडिलांना वेगळा फ्लॅट घेऊन द्यायचा, आणि वय जास्त झाले किंवा त्यांच्यापैकी एखादा आधी स्वर्गवासी झाला, तर पर्यायाने दुसऱ्याची रवानगी अनेकदा वृद्धाश्रमात व्हायला लागली. मोठ्या शहरांत तर आता ही परंपराच होत चालली आहे असे म्हणावे लागेल. दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागली आहे; नव्हे, ती काळाची गरज आहे, असे वाटायला लागले आहे.
पूर्वी एका घरामध्ये म्हाताऱ्या आई-वडिलांव्यतिरिक्त एखादी म्हातारी आत्या, मावशी, एखादा काका नाहीतर काकू, अविवाहित मामा अशी माणसे असायची. कोणाला मूलबाळ नाही म्हणून, तर कोणी विधवा आहे म्हणून, तर कोणी घटस्फोटित आहे म्हणून, नाहीतर कोणी अविवाहित, निराधार आहे म्हणून… पण त्याची कुठे जास्त वाच्यता नसायची. घरातल्या सात-आठ लोकांबरोबर अशी व्यक्ती सहजपणे सामावून जायची. ती व्यक्ती कितीही हेकेखोर स्वभावाची, रागीट, अप्पलपोटी असली तरीही तिला कोणी वाऱ्यावर सोडत नसत. त्या व्यक्तीला सगळ्यांनी मिळून सांभाळण्याची जबाबदारी घेतलेली असायची.
हेही वाचा – स्त्री… एक आई आणि मुलगी
पण आता एकविसाव्या शतकात मात्र परिस्थिती फारच दयनीय आहे. ऐकिवात तर असेही आहे की, आजकाल तरुण मुले किंवा मुली लग्न करताना घरामध्ये “Dustbins” किती आहेत, असे विचारतात! इथे “Dustbin” म्हणजे घरातील म्हातारे लोक असा होतो. असा प्रश्न विचारताना या मुलांना लाज वाटत नाही का? ही मुले काय कायम चिरतरूण राहणार आहेत का? अशा मुलांकडून किंवा मुलींकडून त्या वृद्धांनी काय अपेक्षा कराव्यात? त्याच्यापेक्षा वृद्धाश्रम बरा, असंच त्यांना वाटेल. कमीत कमी तिथे त्यांच्यासारखेच समवयस्क आणि समदुःखी लोक असतील, त्यांच्यासोबत राहून आपले दुःख विसरायचा प्रयत्न करतील आणि उर्वरित आयुष्य समाधानाने जगू शकतील; म्हणूनच आजकाल बहुतेक वृद्ध असे निर्णय घ्यायला लागले असावेत. कधीकधी असं वाटतं की असं करण्यात काही वागवे नाही, स्वतःचे मरण स्वाभिमानाने तर येईल, असाच विचार त्यांच्या मनात येत असावा का? पण असं केल्याने बरं झालं, “सुंठीवाचून खोकला गेला” अशीच काहीशी भावना त्यांच्या नातेवाईकांची होत असेल, कारण अशी जबाबदारी घेण्यास आजकाल कोणीही तयार होत नाही.
जरा डोळसपणे पाहिले तर एकाकी लोकांच्या समस्या तर, अजूनच गंभीर आहेत. जी लोकं मनाने कमकुवत असतात किंवा जे अतिशय ताठर, हेकेखोर असतात, अशा लोकांची वृद्धावस्था अतिशय केविलवाणी होते. मनाने कमकुवत असलेले लोक स्वतःच्या भरवशावर कुठलेच निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यामुळे तेही परावलंबी राहतात. पूर्वी असे लोकही बऱ्याच कुटुंबात असायचे, पण त्या व्यक्तीला आजन्म अंतर मिळत नसे. कसेही का असेना, पण दोन वेळचे जेवण आणि डोक्यावर छप्पर तर मिळायचेच. त्या व्यक्तीचा सांभाळ करणे ही त्या कुटुंबाची नैतिक जबाबदारी असायची. रागालोभाने कसाही असो, पण त्या व्यक्तीचा सांभाळ व्हायचा.
आताच्या चौकोनी कुटुंबात असे चित्र दिसत नाही. धकधकीच्या या एकविसाव्या शतकात माणसाला स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तर तो इतरांची जबाबदारी कशी बरं घेईल? सगळ्या क्षेत्रांत नुसती चुरस आहे, जो तो आपले लक्ष्य गाठण्यासाठी धावत सुटलेला दिसतो. भौतिक सुखाच्या मागे लागून माणसाने आपले मानसिक आरोग्य मात्र गमावले आहे. त्यापाठोपाठ मनुष्य मनाने कोरडा होत चालला आहे. नात्यांमध्ये गोडवा कमी आणि ताणतणाव जास्त आढळतो आहे.
हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!
जरा पन्नास वर्षे मागे वळून पाहिले, तर आपल्याला एक सुखद चित्र दिसेल. संध्याकाळी मुले शाळेतून घरी आलेली आहेत, घरात त्यांचा आणि अंगणात झाडांवर पाखरांचा किलबिलाट चालू आहे. त्यावेळेस घरातील आजोबांचे आणि त्यांच्या मित्रांचे गप्पांचे फड एखाद्या वडाच्या पारावर रंगलेले आहेत. घरातील आजीचे देवघरात समया लावणे सुरू आहे. लेकी-बाळी अंगणातल्या बाकड्यावर आपल्या मैत्रिणींसोबत आपल्या मनातल्या गुजगोष्टी सांगत आहेत. स्वयंपाकघरात संध्याकाळच्या जेवणासाठी तयारी चालू आहे, पोळ्या शेकण्याचा, आमटीचा मंद सुवास दरवळतो आहे. नुसती कल्पनाच करा बरं, अजूनही तेच दिवस परत मिळाले तर… “मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?” सुखाची परिभाषा यापेक्षा वेगळी नसावी.
एकत्र कुटुंब म्हणजे एक आदर्श कुटुंबसंस्था. वेगवेगळ्या विचारांची, गुणांची खाण म्हणजे एकत्र कुटुंब. एकमेकांना सावरून घेणारे, एकमेकांच्या हातात हात घालून समविचारी वडाच्या झाडासारखे दिसणारे, “फॅमिली ट्री” (Family Tree) म्हणजे एकत्र कुटुंब असंच असावं, नाही का? त्यातील घरातील वृद्ध म्हणजे दुधावरच्या दाट सायीसारखे! तो त्या सुरकुतलेल्या हाताचा मऊ, नरम स्पर्श आठवतो का? या दुधावरच्या सायीने आपल्या आयुष्याला गती दिली, या परिसस्पर्शाने आपले भवितव्य उजळून टाकले. अशा या दुधावरच्या आटत चाललेल्या सायीला आपण आपल्या देहाची तिजोरी करून जपायला हवे, तरच आपल्या पुढच्या पिढीचा इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला जाईल. कारण ज्ञानाचा आणि समृद्ध अनुभवाचा वारसा त्यांच्याकडे असेल, जेणेकरून त्यांना एक परिपूर्ण जीवन जगता येईल. आणि अशा एका सुविद्य आणि सुसंस्कृत समाजाची कल्पना, या दुधावरच्या सायीला जपले तरच शक्य होईल!


