भाग – 2
घरात पहिल्यांदाच मोठं कार्य होतं. मुलगा शिकून नोकरीला लागला होता. कष्टाने संसार उभा केलेल्या बापासाठी हा दिवस मोठा होता. नामदेवला वाटलं, आमदार साहेबांना पत्रिका दिली, त्यांनी दोन शुभेच्छा दिल्या, तर मुलालाही आनंद होईल. त्यासाठी नामदेव सकाळीच साहेबांच्या बंगल्यावर जाऊन बसला होता. साहेब बाहेर आले, पण त्या गर्दीत नामदेवला भेटताच आलं नाही. ते गाडीत बसून कुठेतरी जायच्या तयारीत होते. पुढे होऊन हातातली पत्रिका उंचावत तो म्हणाला, “साहेब, मुलाचं लग्न आहे… पत्रिका द्यायची होती…”
आमदार साहेबांनी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं की नाही, ते समजलंच नाही. ते फक्त म्हणाले, “आज खूप मोठा दौरा आहे. मी उद्या किंवा परवा फ्री असेन. तेव्हा या सगळे.”
आमदार साहेबांच्या गाड्यांचा ताफा त्याच्या समोरूनच निघून गेला. उदास झालेला नामदेव बाहेरच्या टपरीवर चहा पिऊन घराच्या दिशेने चालू लागला.
गावच्या चौकातून जाताना त्याला सावंत सर भेटले. सावंत सर आता निवृत्त झाले आहेत. केस पांढरे झालेले आहेत, चाल मंदावलेली आहे, पण डोळ्यातली प्रज्ञा अजूनही तेजस्वी आहे. शाळेत असताना नामदेवने बऱ्याच वेळा सरांचा मार खाल्ला होता. सरांनी गावातल्या कितीतरी तरुणांना योग्य वळणावर आणले होते. त्यांनी नामदेवच्या हातातली पत्रिका पाहिली आणि हसत विचारलं,
“काय नामदेवा, एवढ्या घाईत कुठं चाललास?”
“सर, आमदार साहेबांना पत्रिका देण्यासाठी गेलो होतो. परंतु आज त्यांचा मोठा दौरा असल्यामुळे पत्रिका देऊ शकलो नाही. घरात पहिलंच लग्न आहे. कोणतरी मोठा माणूस असावा, म्हणून गेलो होतो.”
सावंत सरांनी नामदेवला खाली वर न्याहाळले. बाजूच्या झाडाखालच्या बाकड्यावर त्यांनी हातातली छत्री एका कोपऱ्यात ठेवली आणि ते बसले. नामदेवकडे पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली…
“लग्नात सर्वात मोठा पाहुणा कोण असतो माहिती आहे नामदेव? आईच्या डोळ्यातलं आनंदाचं पाणी. वडिलांच्या काळजातलं समाधान. भावाच्या चेहऱ्यावरचा अभिमान. बहिणीच्या मनातली हुरहूर. मित्रांच्या गोंधळातला आनंद… आणि नातलगांच्या आशीर्वादातला ऊबदारपणा. यापेक्षा मोठा पाहुणा कुणीच नसतो, नामदेव!
आपण अनेकदा आपली प्रतिष्ठा चुकीच्या गोष्टींशी जोडतो. आपल्यामागे किती नेते आहेत? किती मोठी माणसं ओळखीची आहेत? कोण कोण फोन करतात? कोणाच्या गाड्या दारात उभ्या राहतात? यावर आपण स्वतःचं मोजमाप करतो. पण खरी प्रतिष्ठा वेगळी असते. तुमच्या मुलाच्या लग्नात गावातील गरीब माणूस आनंदाने येतो का? तुम्ही आयुष्यात कोणाला मदत केली म्हणून लोक प्रेमाने येतात का? तुमचं बोलणं आठवून लोक सन्मानाने उभे राहतात का? तुमच्या घरी आलेल्या माणसाला आपलेपण वाटतं का? हे महत्त्वाचं. माणूस मोठ्या माणसांसोबत फोटो काढून मोठा होत नाही. तो छोट्या माणसांना मोठेपण देऊन मोठा होतो.
आज अनेक लग्नसमारंभांत आपण पाहतो, घरच्यांनी कष्ट करून पैसा जमवलेला असतो. वर्षानुवर्षे काटकसर केलेली असते. मुला-मुलीच्या हौसेप्रमाणे कार्यक्रम केलेला असतो. पण त्या आनंदातही आपण इतरांच्या दिखाव्याची सावली आणतो. कोणी म्हणतं, “फलाणा नेता आला का?”
हेही वाचा – हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!
कोणी विचारतं, “अमुक आमदार दिसला नाही?”
कोणी मोजतं, “किती गाड्या आल्या?” आणि नकळत खरा आनंद हरवतो. लग्नाचा दिवस हा घरच्यांसाठी आठवणींचा दिवस असतो. तो तणावाचा दिवस नसावा. मुलीच्या बापाने हसत राहावं, धावत नाही. आईने मुलीकडे पाहत राहावं, फोनकडे नाही. मुलाने मित्रांमध्ये रमावं, प्रोटोकॉलमध्ये नाही.
अनेक मोठे लोक चांगलेही असतात. काही आमदार, खासदार खरोखर प्रेमाने येतात, वेळ देतात, साधेपणाने बसतात, जेवतात, चार शब्द बोलतात, घरच्यांना माणूस म्हणून मान देतात. अशांना नक्की बोलवा. कारण त्यांचं मोठेपण पदात नाही, वागण्यात आहे. पण फक्त नावासाठी, फक्त फोटोसाठी, फक्त समाजाला दाखवण्यासाठी कोणाच्या मागे धावू नका. कारण ज्या माणसाला तुमच्यासाठी वेळ नाही, त्याला तुमच्या आनंदाचं मूल्यही नसतं.
तुझ्या मुलाच्या लग्नाला कोण येणार, हे ठरवत बसू नकोस. पण कोणाला बोलवायचं, हे मात्र शहाणपणाने ठरव. तुझ्यासाठी वेळ देणाऱ्या माणसांना पहिला मान दे. ज्यांनी तुझ्या दुःखात हात दिला, त्यांना अगोदर आठव. तुझ्या मुलाला वाढताना ज्यांनी प्रेम दिलं, त्यांना बोलव. बाकी पदं, खुर्च्या, गाड्या… या सगळ्या क्षणभंगुर गोष्टी आहेत.”
नामदेव खरंच विचारमग्न झाला. तो खूपच अंतर्मुख झाला. त्याला आठवलं, मुलगा आजारी असताना शेजारचा गणू धावत आला होता. घरात पैशाची अडचण असताना दामू मामाने मदत केली होती. शेतात संकट आलं तेव्हा बाळू, संपा आणि शरद उभे राहिले होते. मुलाच्या शिक्षणासाठी सावंत सर, माने सर, गडदे सर या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं होतं. हे सारेच खरे मानकरी होते. आपण आता विचारच बदलायला हवा. मोठ्या माणसांच्या येण्याने कार्यक्रम मोठा होत नाही. मोठ्या मनाच्या माणसांनी येण्याने कार्यक्रम मोठा होतो. शंभर गाड्या आल्या म्हणून लग्न यशस्वी होत नाही. शंभर गरीबांचे आशीर्वाद मिळाले तर लग्न यशस्वी होतं. मंचावर फोटो वाढले म्हणून मान वाढत नाही. घरात आनंद वाढला तर मान वाढतो. आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आपण दुसऱ्यांच्या वेळेवर का ठेवायचा? कोणीतरी येईल की नाही, किती वाजता येईल, किती मिनिटं बसेल, यावर आपला आनंद का अवलंबून असावा?
त्यापेक्षा आपल्या कार्यक्रमाला मनापासून आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे प्रेमाने स्वागत करूया. सर्वांना सारखाच मान देऊया. ज्येष्ठांना सन्मान देऊया. गरीबाला आपलेपण देऊया. मित्रांना मिठी देऊया. नातलगांना वेळ देऊया. यापेक्षा मोठा सोहळा कोणता? शेवटी सरांनी नामदेवला एक वाक्य सांगितलं,
“पत्रिका हातात घेऊन दारोदार फिरण्यापेक्षा, प्रेम मनात घेऊन आपल्या माणसांत फिर. लोक स्वतःहून येतील!”
नामदेव परत फिरला.
आमदार-खासदारांच्या बंगल्याकडे जाणारी पायवाट त्याने कायमची सोडली. तो सरळ आपल्या माणसांकडे गेला. कारण त्याला समजलं होतं, लग्नात येणाऱ्या गर्दीपेक्षा, मनापासून येणारी माणसं महत्त्वाची असतात. मोठ्या नावांपेक्षा, जपलेली नाती मोठी असतात… आणि प्रतिष्ठा बाहेरून येत नाही… ती आपल्या वागण्यातून जन्माला येते.
हेही वाचा – सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!
घरी पोहोचल्यावर मुलगा दारात भेटला.
“पप्पा, दिली का पत्रिका? भेटले का आमदार?”
नामदेवने मुलाच्या खांद्यावर हात ठेवला.
“नाही रे…”
मुलगा थोडा खट्टू झाला.
नामदेव पुढे म्हणाला,
“नाही दिली… कारण मला कळलं, आपलं लग्न मोठं करण्यासाठी मोठ्या माणसांची गरज नसते.”
घरात सगळे शांत झाले. तो पुढे म्हणाला,
“आपल्याला शुभेच्छा देणारे आपले लोक भरपूर आहेत. ज्यांना आपली किंमत नाही, त्यांना पत्रिका देऊन काय उपयोग?”
त्याने पत्रिका देव्हाऱ्यासमोर ठेवली. हात जोडले. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर वेगळं समाधान दिसलं. कारण, आज तो फक्त कार्यकर्ता नव्हता. तो एक बाप होता… आणि बापाचा स्वाभिमान कोणत्याही आमदारांच्या भेटीपेक्षा मोठा असतो!!


