पल्लवी खरोसे आंबेकर
भाग – 3
पार्थ ठरल्याप्रमाणे अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने त्याचं सगळं लीगल डॉक्युमेंटेशन कम्प्लिट केलं आणि लगेचच जॉइनिंगही केलं… त्याचं जॉइनिंग झालं, तसं त्याला एचआर डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आलं. तिथं गेल्यावर त्याला समजलं की, या कपंनीच्या नवीन बॉसच्या अंडर त्याला एका प्रोजेक्टवर काम करायचं आहे. त्याला लगेचच ट्रेनिंगला पाठवण्यात आलं. तो आधीच हुशार आणि स्मार्ट असल्यामुळे त्याला ते शिकायला वेळ लागला नाही.
त्याची बॉस ऑफिसमध्ये एंटर झाली… टकटक हिलचा आवाज सगळ्या केबिनमध्ये घुमत होता… सगळे फटाफट उठून तिला ग्रीट करत होते… ती तशीच तिच्या केबिनमध्ये निघून गेली… मिस्टर राजपाल, म्हणजे तिच्या डॅडचे पीए तिला भेटायला आले… त्यांनी तिला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितलं. ती दिसायलाच नाहीतर बुद्धीनेही स्मार्ट होती… तिने पटकन सगळं समजून घेतलं… शेवटी एका सक्षम बिझनेसमनची मुलगी होती ती! मग यात मागे कशी राहणार…!!
तिने कपंनीच्या सगळ्या प्रोजेक्ट फाइल मागवून घेतल्या… तिने चालू असलेले आणि नवीन प्रोजेक्ट्सच्या सगळ्या फाइल्स नजरेखालून घातल्या आणि जिथे जिथे समजत नव्हतं, तिथे ती मिस्टर राजपाल यांना विचारत होती आणि तेही तिला सगळं डिटेलमध्ये समजावून सांगत होते. तिने ते सगळं समजून घेतलं आणि तिच्यासाठी लवकरात लवकरच एक पीए अपॉइंट करायला सांगितला… यावर राजपाल यांनी मान हालवली आणि तिचा निरोप घेऊन निघून गेले…
त्याचा आणि तिचा आजचा सगळा वेळ शिकण्यात आणि समजण्यात गेला…
ऑफिस टाइम पूर्ण झाला तसा, पार्थ घरी निघून आला… आज तो बराच थकला होता… आल्या आल्या आधी त्याने थंड पाण्याने आंघोळ केली… आता कुठे त्याला जरा बरं वाटलं. आईने त्याला चहा बनवून दिला.
हेही वाचा – शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!
“कसा होता आजचा दिवस…” त्याच्याजवळ बसत आईने विचारलं.
“मस्त होता… आज खूप काही नवीन शिकायला मिळालं…” तो चहाचे घोट घेत म्हणाला.
“कोणती कपंनी आहे म्हणालास?” तिनं विचारलं.
“राहुल अग्रवाल यांची अग्रवाल इंडस्ट्री! इथेच आज जॉइन झालो…” तो कप खाली ठेवत म्हणाला.
राहुल अग्रवाल… हे नाव ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन झरझर बदलले… तिने तो चहाचा कप उचलला आणि आत निघून गेली… पण राहुल अग्रवाल हे नाव ऐकून ती मात्र प्रचंड अस्वस्थ झाली होती… पण पार्थकडे बघून तिने स्वतःला लगेचच नॉर्मल केलं आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली.
काही केलं तरी तिचं मन कामात लागत नव्हतं… कसातरी तिने स्वयंपाक आवरला… आणि बाहेर हॉलमध्ये आली तर तो बसल्या जागीच झोपला होता! तिने त्याला तसंच सोडलं आणि त्याच्या रूममध्ये निघून गेली. ती बराच वेळ तिथे बसून विचार करत होती… कशाच्यातरी आवाजाने ती भानावर आली…. घड्याळ बघितलं तर, बराच वेळ झाला होता.
ती बाहेर आली तर तो अजूनही झोपलाच होता… तिने त्याला जेवायला उठवलं… तो फ्रेश होऊन आला तसं दोघांनी मिळून जेवण केलं… तिने मागचं सगळं आवरलं आणि अंथरूण टाकून झोपली… ती झोपण्याचा प्रयत्न तर करत होती, पण झोप तर तिच्या कोसोदूर पळून गेली होती… कारण भूतकाळातला एक चेहरा जो समोर आला होता… आता आणखी काय काय समोर येणार होतं, हे तर देवच जाणो! त्या विचारतच तिला कधीतरी झोप लागली…
0000
शार्वीचं घर
शार्वी संध्याकाळी घरी आली… आल्या आल्या ती तिच्या डॅडच्या गळ्यात जाऊन पडली… राहुलनेही खूप प्रेमाने तिला जवळ घेतलं…
“सो कसा गेला माझ्या प्रिन्सेसचा ऑफिसचा पहिला दिवस?” राहुलने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले.
“ठीक होता… पण डॅड मी तुमच्यावर रागावलेय…” ती हाताची घडी घालून लटका राग दाखवत म्हणाली.
“पण का, हे कळेल का?” डॅडने तिचं नाक चिमटीत पकडत विचारलं.
“डॅडsss एकीकडे प्रिन्सेस म्हणता आणि दुसरीकडे एवढं कामाला लावता… This is not फेअर dad.. (हे काही बरोबर नाही हां डॅड..),” ती ओठ बाहेर काढत म्हणाली.
“ओह… असं आहे तर जास्त काम लागल्यामुळे माझी प्रिन्सेस माझ्यावर रागावलीय तर…” डॅडने तिला प्रेमाने जवळ घेतलं… “पण बाळा तुला आता आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घालवंच लागेल… आता तुझा डॅड म्हातारा झाला आहे, तो कुठे कुठे बघणार हं? आणि माझ्यानंतर सगळं काही तुलाच बघायचं आहे… सो आतापासूनच बघितलं तर त्यात काय वाईट आहे बरं!” ते तिच्या केसांवरून कुरवाळत म्हणाले.
हेही वाचा – अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…
“डॅड… असं नका न बोलत जाऊ! उगाच सेंटी मारता…” ती तोंड फिरवून म्हणाली.
“हं… बापलेकीच्या गप्पा झाल्या असतील तर चला खाऊन घेऊ…” शर्वरी त्या दोघांच्या जवळ येत म्हणाली.
“ओके ओके… चला… शार्वी जा बेटा फ्रेश होऊन ये…” तिचे डॅड डायनिंग टेबलकडे जात म्हणाले, तशी ती पटकन फ्रेश होऊन आली. सगळ्यांनी मिळून जेवण केल… शार्वी दोघांचा निरोप घेऊन झोपायला तिच्या रूममध्ये निघून गेली… आणि लगेचच झोपेच्या अधीन झाली.
0000
अग्रवाल इंडस्ट्री
तो त्याची बाइक पार्क करून जातच होता की, एका मुलीला धडकला… क्षणभर तो तिच्याकडे पाहातच राहिला… ‘ओह गॉड, एवढं सुंदर कोणी असू शकत का?’ असा प्रश्न त्याला तिला पाहिल्यावर पडला. पण ती तशीच निघून गेली… हा मात्र तिलाच बघत होता… कोणाच्या तरी गाडीचा हॉर्न ऐकायला आला, तेव्हा कुठे तो भानावर आला आणि आत निघून गेला…
क्रमशः
काय असेल पार्थच्या आईचा आणि राहुलचा संबंध… आणि कोण असेल ती मुलगी? पाहू नेक्स्ट पार्टमध्ये…


