पल्लवी खरोसे आंबेकर
आज सकाळी सकाळी त्याची गडबड चालू होती. आज त्याचा इंटरव्ह्यू होता, एका नामवंत कपंनीत… आज त्याचं सिलेक्शन झालं तर त्याचे बरेचसे प्रश्न सुटणार होते आणि यासाठी तो खूप मेहनत घेत होता. तो त्याचं आवरत होता… तेवढ्यात आईने त्याला आवाज दिला…
“पार्थ… किती घाई करत आहेस तू… थोडंसं खाऊन घे… असं रिकाम्यापोटी जाऊ नये…” त्याची आई काळजीने त्याला म्हणाली.
“आई ऑलरेडी मला उशीर झाला आहे आणि त्यात जेवण करत बसलो तर, अजून उशीर होईल… आणि तुला माहिती आहे, हा जॉब आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते…” तो आईला समजावत म्हणाला.
“हं… माहिती आहे… तुझे बाबा असते तर कदाचित आपल्यावर ही वेळ आली नसती!” त्याची आई दुःखी स्वरात म्हणाली.
“बरं ते सोड, मी जातो आता… मी बाहेरच काहीतरी खाऊन घेईन, काळजी करू नको…” तो विषय बदलत म्हणाला.
“थांब, मी आलेच,” म्हणत आई किचनमध्ये निघून गेली…
बाहेर येऊन म्हणाली, “आ कर…” त्यांनी त्याला दहिसाखर भरवलं. त्याने आईचा आशीर्वाद घेतला आणि बाईक घेऊन निघून गेला…
तो आज जरा वेगातच बाईक पळवत होता… मधेच सिग्नल लागला आणि तो थांबला… दोन सेकंदात सिग्नल सुटणार, तोच एक मर्सिडीज एकदम वेगात त्याच्या जवळून गेली… आणि तो धड्डाम खाली पडला…
तिने थोडं पुढं नेऊन गाडी थांबवली… साइड मिररमधून त्याच्याकडे एक नजर टाकली आणि तशीच निघून गेली…
त्याने वैतागून उठत गाडी सरळ केली. बाईकचा साईड मिरर तुटला होता… त्याचे कपडेही थोडेसे खराब झाले होते. कपडे झटकून तोही घाईतच निघून गेला… कारण आता त्याच्याजवळ वेळ खूप कमी होता… तो तसाच इंटरव्ह्यूच्या ठिकाणी गेला… तिथे पोहोचल्यावर त्याने समोर बघितले तर काचेची एक मोठी बिल्डिंग उभी होती… यात आपला निभाव लागेल का? त्याने एकवेळ मनोमन विचार केला… आणि आत गेला… रिसेप्शन डेस्कवर त्याने चौकशी केली आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन बसला…
त्याचा नंबर आला तसा तो आत गेला… समोर दोन वयस्कर व्यक्ती बसल्या होत्या… त्यांच्या पर्सनॅलिटीवरून तर ते खूप अनुभवी आणि प्रभावी दिसत होते…
तो परमिशन घेऊन त्यांच्या समोर बसला… त्यांनी एक ना अनेक प्रश्न विचारले, जोवर त्यांच्या मनाचं समाधान होत नाही तोवर… शेवटी त्यांचे प्रश्न थांबले… लवकरच कळवतो म्हणून त्यांनी त्याला जायला सांगितल…
तो थोडासा नर्व्हस होता… इंटरव्ह्यू तर ठीक झाला होता; पण त्या दोन जेष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरून काहीच समजतं नव्हतं की, ते त्याच्यावर खूश आहेत की नाही! बस्स, आता वाट बघायची होती त्यांच्या कळवण्याची…
तो घरी परत आला… आल्या आल्या आईने आधी त्याला फ्रेश व्हायला सांगितले… आणि त्याच्यासाठी जेवणाच ताट बनवायला किचनमध्ये गेली… त्यालाही खूप भूक लागली होती… आईला तर सांगून गेला होता की, बाहेर काहीतरी खाईन पण… कोणीतरी त्याला धक्का दिला आणि तो पडला त्यामुळे तिथे त्याचा थोडासा वेळ वाया गेला… पण त्या धक्का देणाऱ्या व्यक्तीने मात्र याची दखल घेतली नाही… पण त्याने त्या गाडीचा नंबर मात्र बघितला होता आणि तो डोक्यात चांगलाच फिट्ट करून ठेवला होता….. आणि भविष्यात ती व्यक्ती भेटली तर नक्कीच तो त्याला खडसवणार होता…
हेही वाचा – शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!
“पार्थ, चल बाळा तुझ्यासाठी जेवण वाढलंय.. खाऊन घे बर आधी…” आई म्हणाली.
आईच्या आवाजाने तो भानावर आला आणि लगेचच जेवायला जाऊन बसला… जेवणाचा खमंग वास येताच त्याला लागलेल्या तीव्र भुकेची जाणीव झाली… आणि त्याने आधाशासारखं जेवण सपंवूनही टाकलं… पोट भरलं तेव्हा कुठे त्याला जरा तरतरी आली… आईला सांगून तो आपल्या रूममध्ये आराम करायला निघून गेला…
त्याच्या जेवणावरून तर त्याच्या आईला एवढं तरी समजलं होत की, तो सकाळपासून उपाशीच होता… आणि त्यांना त्याचा जरा जास्तच अभिमान वाटला… अगदी सहज त्याने सगळं काही स्वीकारलं होतं…
त्यादिवशी कदाचित त्याचे वडील कामानिमित्त बाहेर गेले नसते तर, आज त्याची ही अवस्था नसती, असं त्यांना नेहमीच वाटायचं… पण नियती…. नियतीपुढे कोणाचं काही चालत का? पण त्यांना कुठे माहिती होतं की, हे नियतीमुळे नाही तर, कुणाच्यातरी वाईट नियतमुळे झालं होतं…
तर, पार्थ राजेश सूर्यवंशी हा आपल्या कथेचा नायक… दिसायला निमगोरा म्हणजे जास्त गोराही नाही आणि काळाही नाही… धारदार नाक, काळे डोळे, रूंद कपाळ आणि काळे सिल्की केस… उंची बऱ्यापैकी आणि जिमला जरी जात नसला तरी, दररोजच्या रनिंगमुळे बॉडीही बऱ्यापैकी होती… म्हणजे एकदम फिट होता… स्वभावाने शांत आणि समजूतदार, स्वाभिमानी… नेहमी विचार करून वागणारा… नात्यांना आणि प्रेमाला महत्त्व देणारा… पण एक होतं, त्याला जर एकदा राग आला तर, मग समोरच्याचं काय खरं नाही… एवढाच काय तो अवगुण बाकी सगळं एकदम ठीकठाक…
तो आणि त्याची आई विभा एवढाच काय तो त्याचा परिवार! आधी त्याचा खूप मोठा परिवार होता. पण काही वर्षांपूर्वी वडील वारले… आणि तो आणि त्याची आई परिवारापासून वेगळे झाले… आता सध्या ते दोघे एका अपार्टमेंटमध्ये वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतात… आणि तो सध्या घर चालवण्यासाठी नोकरीच्या शोधात आहे…
संध्याकाळी त्याच्या आईने त्याला उठवलं… कारण त्याला कामाला जायला उशीर होत होता… तो शिकत शिकत एका हॉटेलमध्ये पार्टटाइम काम करत होता… त्यावरच त्याचं घर चालायचं… सुरुवातीला त्याच्या आईने त्याला रोखलं होतं, पण त्यांच्याकडे पर्याय नव्हता… शेवटी त्यांनीही मान्य केलं…
“पार्थ उठ बाळा, बघ सहा वाजत आले…” आई त्याला आवाज देत म्हणाली.
सहा वाजले ऐकून तो ताडकन उठला आणि तयार व्हायला गेला. त्याने त्याचं फटाफट आवरलं आणि कामाला निघून गेला…
0000
ठरल्याप्रमाणे त्याला दोन दिवसांनी फोन आला की, त्याचं सिलेक्शन झालं आहे आणि त्याला लवकरात लवकर जॉइन व्हायला सांगितलं. सिलेक्शन झालं, हे ऐकून तो खूप खूश झाला… त्याने ही बातमी आईलाही सांगितली. त्याची आईही खूश झाली, त्यांनी पटकन जाऊन देवापुढे साखर ठेवली आणि त्याचे आभार मानले.
0000
कंपनीत अचानक तातडीची मीटिंग बोलावण्यात आली… सगळे शेअर होल्डर आणि एमडीही उपस्थित होते.
“थँक्स की तुम्ही या मीटिंगला आलात. मला एक महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे..” असं सांगत ते उभे राहिले. सगळे त्यांच्याकडेच बघत होते की, ते नेमकी कोणती अनाउन्समेंट करणार आहेत.
“So, ladies and gentlemen I’m going to introduce the new CEO of this Agrwal Industry…Please welcome my beautiful princess Sharvi Rahul Agrwal… (लेडीज अँड जेंटलमेन, मी तुम्हा सर्वांना अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची ओळख करून देणार आहे. तर, प्लीज वेलकम माय ब्युटीफूल प्रिन्सेस शार्वी राहुल अग्रवाल)…” ते दरवाज्याकडे हात करत म्हणाले. सगळ्यांच्या नजरा आपसूक त्यांनी हात केलेल्या दिशेला वळल्या… दरवाज्यातून एका सुंदर स्त्री, सोबत एक मुलगी आत येताना दिसली… उंची 5’4, रंग दुधापेक्षा गोरा… ब्राऊन डोळे, शॉर्ट हेअर, फिजिकली एकदम मेंटेन… तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता… ती आत एंटर झाली तसं सगळ्यांनी तिचं स्वागत केलं…
हेही वाचा – बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!
ती तिच्या डॅडच्या शेजारी जाऊन थांबली. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढलं आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाले, “मी आशा करतो की, तुम्ही जेवढं प्रेम मला दिलं, तेवढंच प्रेम तुम्ही माझी मुलगी शार्वीलाही द्याल… आणि तिला नेहमीच सहकार्य कराल!”
यावर सगळ्यांनीच सहमती दर्शवली… नंतर काही महत्त्वाचं बोलून त्यांनी मीटिंग संपल्याचं जाहीर केलं… नंतर बायको आणि मुलीला घेऊन ते निघून गेले…
उद्यापासून ती सगळी सूत्रं आपल्या हाती घेणार होती…
काय होईल ती पार पाडेल का आपली जबाबदारी… की होईल सगळं मातीमोल? पाहू पुढील भागात…


