“दादा मी काय म्हणतोय, आम्ही मुलांच्या शाळेजवळ एक फ्लॅट बघितलाय आणि तिथे शिफ्ट व्हायचं म्हणतोय,” मंदार चाचरत म्हणाला.
“काय? शिफ्ट व्हायचं म्हणजे तू हे घर सोडून जाणार?” रवी विश्वास न बसून त्याच्याकडे पाहातच राहिला.
“हो दादा… अरे मुलांनाही शाळा जवळ पडेल, शिवाय मुलं आता मोठी होताहेत. चारूचंही फ्रेंड सर्कल मोठं झालंय. तुम्हाला याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय. स्वतंत्र झालं की, आम्हांलाही आमच्या जबाबदाऱ्या समजतील.”
ते ऐकून रवी सुन्न झाला. त्याने रेखाला हाक मारली.
“रेखा, बघ गं हा मंदार काय म्हणतोय!”
रेखा बाहेर आली.
“ऐकलं का रेखा, हा मंदार वेगळं व्हायचं म्हणतोय.”
“काय्य? भाऊजी अहो तुमच्या मनात हा विचार आलाच कसा? अहो, काय कमी आहे इथे?” रेखाचा बोलताबोलता गळा दाटून आला. चारू तिथेच उभी होती, ती पटकन पुढे आली…
“अहो वहिनी, वेगळं होतोय म्हणजे फक्त आम्ही वेगळ्या घरात रहाणार… मनाने तर आपण एकत्रच आहोत. एकमेकांकडे आपलं येणंजाणं सुरुच राहील.”
रेखाने तिच्याकडे रागाने पाहिलं. मंदारला नाही, तर हिलाच वेगळं व्हायचंय, हे तिच्या लक्षात आलं आणि कितीही समजावलं तरी ती ऐकणार नाही, हेही तिला माहीत होतं.
“तुम्हाला काय वाटेल ते करा…” ती रागाने बोलली आणि किचनमध्ये निघून गेली.
हेही वाचा – अल्लड हर्षा अन् तिच्या मैत्रिणी
दोन दिवसांनी मंदारने आपलं सामान ट्रकमध्ये घालून शिफ्ट केलं. सगळ्यात अवघड गेलं ते मुलांना समजावणं. मुलं रवीकाकाचं घर सोडायलाच तयार नव्हती. रवीच्या मुलांशी त्यांचं एवढं सख्य होतं की, एकमेकांशिवाय ती जेवणसुद्धा करत नसायची. सोबत खेळणं, अभ्यास करणं… यामुळे त्याचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. निरोप घेताना ती एकमेकांना सोडत नव्हती. रवीची मुलंही, “काका राहू द्या ना त्यांना इथेच. आम्हाला करमणार नाही त्यांच्याशिवाय…” असं म्हणत होती. रडारडी सुरू झाली, तशी चारूने आपल्या मुलांच्या पाठीत धपाटे घातले आणि बळजबरीने त्यांना कारमध्ये बसवलं.
फ्लॅटमध्ये आल्यावर चारूने सगळं सामान व्यवस्थित बसवलं. मग मंदारला म्हणाली,
“कसलं मोकळं मोकळं वाटतंय मंदार! शेवटी आपलं घर ते आपलं घर. किती स्वातंत्र्य आहे बघ इथे. केव्हाही झोपा केव्हाही उठा. वाटेल तेवढा वेळ टीव्ही पाहा, नाहीतर मोबाइलशी खेळत बसा… कुणी काही म्हणणार नाही. आता आपण काहीही खायला करू शकतो. मी माझ्या कितीही मैत्रिणींना बोलवू शकते, पार्ट्या करू शकते…”
“चारू, दादाकडेही आपल्याला खूप स्वातंत्र्य होतं. तिथेही तू सकाळी नऊपर्यंत झोपायचीस. रात्री अकरापर्यंत टीव्ही बघायचीस. कधी कुणी तुला अडवलं नाही…”
“अरे, पण शेवटी ते रवीदादांचं घर ना! नाही म्हटलं तरी बंधनं येणारच…”
मंदार काही बोलला नाही.
रात्री झोपताना मंदारला आठवलं, त्यांचं लग्न झाल्यावर सहाच महिन्यांनी वेगळं होण्यासाठी चारूने मंदारवर दडपण आणलं होतं. पण ‘तू आलीस आणि सहाच महिन्यांत एका घराची दोन घरं केली, असं होईल आणि लोक तुलाच नाव ठेवतील. तेव्हा वर्ष होऊन जाऊ दे मग बघू…’ असं सांगून मंदारने तिला गप्प केलं होतं. वर्ष संपता-संपता चारू गरोदर राहिली आणि तो विषय बारगळला. चारूला आईवडील नव्हते. एक भाऊ जर्मनीत होता तर, बहीण पुण्यात होती. ‘चारूचं पहिलं बाळंतपण पुण्यात माझ्याकडेच करू,’ असं तिच्या बहिणीनेच सांगितलं होतं. पण सातवा महिना उलटला तरी, तिचा फोन आला नाही. म्हणून चारूनेच तिला फोन लावला. बाळंतपणाचा विषय काढताच ती म्हणाली,
“अगं चारू, जरा गडबड झालीये. फ्रान्सच्या दोन मुली माझ्याकडे वर्षभर रहायला येताहेत. त्याच्यासाठी घराच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. घरात इतका पसारा आहे की, तुला इथे रहाणं मुश्कील होईल. तुझ्या होणाऱ्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून मला वाटतं तू तुझं बाळंतपण तुझ्या सासरीचं केलेलं उत्तम राहील. मात्र पुढच्या बाळंतपणाला माझ्याकडे नक्की ये. तेव्हा मी तुला हक्काने पुण्याला घेऊन येईन!”
कुण्या दूरच्या देशातल्या मुलींसाठी आपल्या बहिणीने सख्ख्या बहिणीला झटकून टाकावं, ही गोष्ट चारूच्या मनाला खूप लागली. ती रडायला लागली. मंदारने ती गोष्ट रेखा वहिनीला सांगितली. वहिनीने चारूला जवळ घेतलं आणि म्हणाली,
” अगं वेडे रडतेस कशाला? मी आहे ना! हे तुझं माहेरच आहे असं समज. आपण करू सगळं व्यवस्थित. काही काळजी करू नकोस.”
चारूची डिलिव्हरी झाली. सिझेरियन झालं. प्रतीक्षाचा जन्म झाला. प्रतीक्षा वर्षाची झाली आणि चारूच्या अंगात समाजसेवेचं वारं संचारलं. एक वर्षाच्या प्रतीक्षाला रेखा वहिनीवर सोपवून चारूच्या महिला मंडळाच्या मीटिंग्स्, कार्यक्रम सुरू झाले. आकर्षक व्यक्तिमत्व आणि उत्तम वक्तृत्व यामुळे ती लवकरच प्रसिद्ध झाली. वर्तमानपत्रात तिचे फोटो झळकू लागले, तसं चारूचं घरातलं लक्ष कमी झालं. स्वतःची दोन मुलं आणि चारूची मुलगी यांना सांभाळताना रेखा वहिनींचा दिवस कधी उलटायचा ते कळायचं नाही; पण रेखा वहिनींनी कधीही तक्रार केली नाही. उलट ती चारूचं कौतुक करायची.
चारूच्या महिला मंडळात अशाच महिलांचा सामावेश होता, ज्यांनी आपल्या सासू-सासऱ्यांना हाकलून दिलंय किंवा त्या एकत्र कुटुंबातून बाहेर पडल्या आहेत. संयुक्त कुटुंबाबद्दल त्या चारूची चेष्टा करायच्या. मग चारू मंदारवर आगपाखड करायची. मंदारला बायकोचं वागणं खटकायचं. तो ते बोलूनही दाखवायचा. अशावेळी रेखा वहिनीच त्याला समजावयाची.
प्रतीक्षा दोन-अडीच वर्षांची होत नाही तर, चारू परत एकदा गरोदर राहिली. पहिलं सिझेरियन झाल्यामुळे डाँक्टरांनी तिला सहाव्या महिन्यापासूनच बेड रेस्ट सांगितली. वचन दिल्याप्रमाणे आपली बहिण आपल्याला बाळंतपणासाठी पुण्याला घेऊन जाईल, अशी चारूची अपेक्षा होती. पण याहीवेळी तिनं बहाणे केले.
“चारू, माझे म्हातारे सासू-सासरे माझ्याकडे आलेत आणि रोटेशननुसार सहा महिने ते इथेच रहाणार आहेत. त्यांचं करूनच माझा जीव मेटाकुटीला येतो. तुझ्याकडे मला लक्ष देता येणार नाही. तू म्हणत असशील तर मी येते तुझ्याकडे. तेवढीच सासू-सासऱ्यांपासून माझी सुटका!”
चारूने मंदारला विचारलं… ती आली की, करणार काहीच नाही, पण रेखा वहिनींवरच तिची सरबराई करायची वेळ येईल, हे मंदार जाणून होता. त्याने सपशेल नकार दिला. रागावलेली चारू दोन दिवस त्याच्याशी बोलली नाही.
योग्य वेळी चारूची डिलिव्हरी होऊन प्रसादचा जन्म झाला. मागच्या वेळेप्रमाणेच याहीवेळी रात्री रेखा वहिनीने तिची काळजी घेतली.
प्रसाद पाच वर्षांचा झाला आणि प्रतीक्षा आठ वर्षांची झाल्यावर मात्र चारूने मंदारचं ऐकलं नाही. रवीदादा आणि रेखा वहिनीपासून त्याला वेगळं करूनच तिने मोकळा श्वास घेतला.
पण असं वेगळं होण्याची शिक्षा मंदार आणि मुलं भोगू लागली. वेळेवर डबे न मिळणं, जेवण न मिळणं, त्यामुळे उपास घडणं… असे प्रकार सुरू झाले. त्या अपार्टमेंटमध्ये मुलं होती, पण ती आपापल्या फ्लॅटमध्ये दार बंद करून बसायची. अख्ख्या अपार्टमेंटमध्ये कोणी कुणाशी बोलायचं नाही. त्यामुळे मुलांना जेलमध्ये आल्यासारखं वाटू लागलं. चारूचं समाजसेवेसाठी सातत्याने बाहेर रहाणं मुलांना आणि मंदारलाही त्रासदायक होऊ लागलं. मंदारची चिडचिड होऊ लागली. चारूसोबत त्याचे वारंवार खटके उडू लागले. मुलांनी चारूच्या स्वयंपाकाची तुलना रेखा काकूबरोबर केली की, चारू चिडायची. मुलांना फटके लगवायची. तिची स्वतःचीही खूप धावपळ व्हायची. समाजसेवा आणि घरकाम यांचा ताळमेळ बसवणं तिला कठीण होऊन बसलं. शेवटी तिने स्वयंपाकासकट सगळ्या घरकामांसाठी बाई लावून घेतली. यामुळे तिला तर फुरसत मिळू लागली, पण मंदार आणि मुलांची नाराजी वाढली. थोडक्यात, चारू वगळता कुणालाही या अशा स्वातंत्र्यात आनंद वाटत नव्हता.
स्वातंत्र्याचे सात-आठ महिने निघून गेले आणि एक दिवस चारू आजारी पडली. ताप उतरेना म्हणून टेस्ट्स केल्यावर टायफॉइडचं निदान झालं. मंदारने चारूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. भरीसभर म्हणून स्वयंपाक आणि घरकाम करणाऱ्या बाईने लग्नासाठी पंधरा दिवस दांडी मारली. मंदारचे फार हाल होऊ लागले. रात्री मुलांना शेजाऱ्यांकडे ठेवून हॉस्पिटलमध्ये झोपायला जाणं, सकाळी घरी येऊन मुलांना शाळेसाठी तयार करणं, त्यांचे डबे तयार करणं, मग स्वतः तयार होऊन परत हाँस्पिटलमध्ये जाणं, चारूच्या वेगवेगळ्या टेस्ट्स करणं यात मंदारचा दिवस कधी पार पडायचा त्यालाच कळत नव्हतं.
चारूच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. त्यातच तिला चिकन गुनिया झाल्याचं निदान झालं आणि तिच्या हालात अजूनच भर पडली. तिच्या महिला मंडळातील बायका फक्त तिची कोरडी चौकशी करून जात होत्या, पण एकीनेही तिला मदत करायची तयारी दाखवली नाही.
एक दिवस संध्याकाळी मंदार चारूजवळ चिंताग्रस्त अवस्थेत बसला असताना दरवाजावर थाप पडली. मंदारने दार उघडून पाहिलं तर, बाहेर रवीदादा आणि रेखा वहिनी उभे होते.
“अरे दादा वहिनी तुम्ही? तुम्हाला कुणी कळवलं?”
“मंदार, अरे चारू आजारी असल्याचं कळवायचंस ना? एक साधा फोन तर करायचास. वेगळा झालास म्हणजे आमचा काही संबंधच राहिलाच नाही का?” रवीने आत येता येता विचारलं.
“तसं काही नाही रे दादा, पण…”
“काही बोलू नका भाऊजी. आज प्रतीक्षा आणि प्रसाद घरी आले नसते तर, आम्हाला काही कळालं नसतं!”
“काय मुलं तुमच्याकडे आलीहेत?”
“हो. आई-वडिलांचे होणारे हाल त्यांना पहावले गेले नाहीत म्हणून ती आमच्याकडे आलीत आणि आता चारू घरी येईपर्यंत त्यांना आमच्याकडेच राहू देत.”
“बापरे, काय भयंकर अवस्था झालीय चारूची!” चारूकडे पहात रवी म्हणाला, “…आणि या कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलास तू तिला? अरे आपल्या इतक्या डॉक्टरांच्या ओळखी आहेत, चांगल्या डाँक्टरकडे तर जायचंस! आपल्या एवढ्या मोठ्या मेडिकल एजन्सीमध्ये सगळी औषधं उपलब्ध असताना तू विकत औषधी आणलीस?”
मंदारला काय बोलावं ते कळेना. रवीने फाइल बघितली. मग म्हणाला, “आपण आत्ताच चारूला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करुया. मी डॉक्टरांशी बोलतो आणि ॲम्ब्युलन्स बोलावून घेतो.”
रेखा चारूजवळ बसली. तिचा हात हातात घेऊन म्हणाली,
“काही काळजी करू नकोस चारू. सगळं व्यवस्थित होईल… आणि भाऊजी मी थांबत जाईन रात्री चारुजवळ. तुम्ही जाऊन आराम करा.”
ते ऐकून चारूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
हेही वाचा – अल्लड हर्षा अन् जगण्यातील जिवंतपणा!
पंधरा दिवसांनी बरी झाल्यावर चारूला रेखा वहिनी आपल्या घरी घेऊन आली. संध्याकाळी मंदारने बाहेर खेळणाऱ्या मुलांना हाक मारली.
“चला मुलांनो. आपल्याला आता घरी जायचंय.”
प्रतीक्षा आपला भाऊ आणि रवीच्या मुलांसह आत आली. मंदारसोबत रवी, चारू आणि रेखा वहिनीही बसली होती.
“मी नाही येणार तिकडे. तुम्ही मला कितीही बोला, मारा पण मी तिकडे येणार नाही. मी रवी काकाकडेच रहाणार आहे,” असं प्रतीक्षाने म्हटल्यावर सगळेजण आश्चर्याने बघत असतानाच छोटा प्रसाद आपल्या बहिणीला बिलगला आणि म्हणाला,
“मी पण नाही येणार!”
मंदार त्यांच्या निश्चयापुढे आणि आवाजातल्या ठामपणापुढे नि:शब्द झाला. असा निश्चय आणि ठामपणा आपण का दाखवू शकलो नाही, याची त्याला खंत वाटली.
“ठीक आहे, मग मी सुद्धा तिकडे जाणार नाही…” मंदार चारूकडे पाहात म्हणाला.
चारूच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले. तिने रेखा वहिनींचे पाय धरले.
“वहिनी, मी चुकले मला माफ करा. मी खूप वाईट वागले तुमच्याशी…” रेखा वहिनीने तिला उचलून जवळ घेतलं.
“अगं वेडे, एकमेकांना सुख-दुःखात साथ देण्यासाठीच तर ही बंधनं असतात. मला कल्पना आहे की, एकत्र कुटुंबात प्रायव्हसी मिळत नाही. पण ज्या सुखाकरिता आपण ही बंधनं तोडून स्वतंत्र होऊ पहातो, ती सुखं क्षणिक असतात. आपल्यापेक्षा ही लहान मुलं बघ किती शहाणी असतात. ती एकमेकांशी भांडतात, माऱ्यामाऱ्या करतात, पण पुन्हा एक होतात. आपल्या घासातला घास एकमेकांना खाऊ घालतात. शेअरींगचं सुख त्यांना कळलेलं असतं. आपण मोठे स्वतंत्र होऊ पहातो, पण त्या स्वातंत्र्यामुळे येणारी वेगळी बंधनं अजूनच त्रासदायक ठरतात. या सर्व प्रकारात तुझी नाही तुझ्या वयाची चूक आहे. लग्न झाल्यानंतर मलासुद्धा आपला राजाराणीचा संसार असावा, असं वाटायचं. पण नणंद-दिरांची लग्नं, सासू-सासरे आणि माझ्यावरचे संस्कार यामुळे मला स्वतंत्र होता आलं नाही. नंतर तर ही बंधनंच मला आवडायला लागली. आता तर मी त्याशिवाय जगूच शकत नाही!”
चारूने डोळे पुसले. दिराकडे पाहिलं आणि म्हणाली,
“भाऊजी आम्ही परत या घरात आलेलं चालेल?”
“चालेल? अगं, हे घर तुझंच आहे चारू. मंदार घेऊन ये सगळं सामान.”
मुलांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. ते पाहून मंदारचे डोळे आसवांनी भरून गेले.


