सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
अर्थतदप्यशक्तोऽसि कर्तृ मद्योगमाश्रितः । सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥11॥
ना तरी हेंही तूज । नेदवे कर्म मज । तरी गा तूं भज । पंडुकुमरा ॥125॥ बुद्धींचां पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं । मातें बांधणें किरीटी । दुवाड जरी ॥126॥ तरी हेंही असो । सांडीं माझा अतिसो । परि संयतिसीं वसो । बुद्धि तुझी ॥127॥ आणि जेणें जेणें वेळें । घडती कर्में सकळें । तयांचीं तियें फळें । त्यजितु जाय ॥128॥ वृक्ष कां वेली । लोटती फळें आलीं । तैसीं सांडीं निपजलीं । कर्में सिद्धें ॥129॥ परि मातें मनीं धरावें । कां मजउद्देशें करावें । हें कांहीं नको आघवें । जाऊं दे शून्यीं ॥130॥ खडकीं जैसें वर्षलें । कां आगीमाजीं पेरिलें । कर्म मानी देखिलें । स्वप्न जैसें ॥131॥ अगा आत्मजेचां विषीं । जीवु जैसा निरभिलाषी । तैसा कर्मीं अशेषीं । निष्कामु होईं ॥132॥ वन्हीची ज्वाळा जैसी । वायां जाय आकाशीं । क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजीं ॥133॥ अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु । परी योगामाजीं योगु । धुरेचा हा ॥134॥ येणें फलत्यागें सांडे । तें तें कर्म न विरूढे । एकचि वेळे वेळुझाडें । वांझें जैसीं ॥135॥ तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारे । चिरा पडे ॥136॥ पैं अभ्यासाचिया पाउटीं । ठाकिजे ज्ञान किरीटी । ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाचिये ॥137॥ मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव । तेव्हां कर्मजात सर्व । दूरी ठाके ॥138॥ कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे । त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ॥139॥ म्हणोनि यावया शांति । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । अभ्यासुचि प्रस्तुतीं । करणें एथ ॥140॥
हेही वाचा – Dnyaneshwari : विष कीं आहारीं पडे, समुद्रीं पायवाट जोडे
अर्थ
अथवा मद्योगाचा आश्रय करून, हे (माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास) करण्यासदेखील जर तू असमर्थ असलास तर नियतचित्त होऊन सर्व कर्मफलांचा त्याग कर ॥11॥
अथवा हेही कर्म तुला मला देववत नसेल (म्हणजे मला अर्पण करवत नसेल) तर अर्जुना, (आम्ही तुला पुढे सांगतो ते) तू आचरण कर ॥125॥ बुद्धीच्या मागे व पुढे व कर्माच्या आरंभी व शेवटी हे अर्जुना मला बांधणे तुला कठीण वाटत असेल (कर्माची प्रेरणा करणार्या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणे हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणे होय व ते कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणे योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणे, हेच परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय आणि करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्मास प्रारंभ होतो ते कर्तृत्व आपले नसून खरोखर परमात्म्याचे आहे अशा समजुतीने कर्म करावयास लागणे हे कर्माच्या प्रारंभी परमात्म्यास बांधणे होय व आरंभलेल्या कर्मापासून मिळणारे फळ त्या कर्माचे शेवटी परमात्म्यास समर्पण करणे हेच कर्माच्या शेवटी परमात्म्यास बांधणे होय. याप्रमाणे बुद्धीच्या अगोदर व बुद्धीच्या शेवटी व कर्माच्या आरंभी व कर्माच्या शेवटी मला परमात्म्याला त्यात गोवणे हे जर तुला कठिण वाटत असेल) ॥126॥ तर हे देखील राहू दे. माझ्याकरता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला, त्याविषयीचा आग्रहही एकीकडे राहू दे. परंतु तुझी बुद्धी (कर्मफलाविषयी) निग्रहयुक्त असू दे. (तू आपल्या बुद्धीत कर्तृत्वमद व फालास्वाद घेऊ नकोस) ॥127॥ आणि ज्या ज्या वेळी कर्मे घडतील त्या त्या वेळी त्यांची ती सर्व फळे तू टाकीत जा ॥128॥ झाडास अथवा वेलीस आलेली फळे जशी ती झाडे व त्या वेली टाकून देतात, त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे (तू) टाकून दे (म्हणजे त्यांच्या फळांची आशा चित्तात ठेवू नकोस.) ॥129॥ परंतु मनामधे माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे काही नको, तर ते शून्यात जाऊ दे. (तूही घेऊ) नकोस व मलाही अर्पण करू नकोस तर ते कर्म तसे रिकामे राहू दे.) ॥130॥ खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले बी अथवा पाहिलेले स्वप्न हे जसे व्यर्थ असते, त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थ मान ॥131॥ अरे अर्जुना, आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव निष्काम असतो त्याप्रमाणे सर्व कर्मांच्या फलाविषयी तू निष्काम हो ॥132॥ अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते, (म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही) त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्यामधे जिरू देत. (म्हणजे जणू काय ती कर्मे केलीच नाहीत अशी तुझी चित्तवृत्ति असू दे.) ॥133॥ अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो खरा, पण सर्व योगांमधे हा योग श्रेष्ठ आहे ॥134॥ जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, त्याप्रमाणे या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही. (ते कर्म सुखदु:खाचा भोग देण्याकरिता पुढे जन्माला कारणीभूत होत नाही ॥135॥ त्याप्रमाणे याच शरीराने शरीराला येणे (जन्माला येणे) संपते. फार काय सांगावे ? जन्ममरणाच्या खेपांवर दगड पडतो ॥136॥ मग अर्जुना, अभ्यासाच्या (वरील 9 व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे) पायरीने ज्ञान (परमेश्वराचे परोक्ष ज्ञान) प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस यावे. (त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचे ध्यान करावे) ॥137॥ मग सर्व भाव (कायिक, वाचिक, मानसिक भाव) ध्यानाला आलिंगन देतात म्हनजे ध्यानात गढून जातात. त्यावेळेला कर्ममात्र जेवढे आहे ते दूर रहाते (म्हणजे होत नाही. कारण कर्मे करण्याची साधने किंवा द्वारे जी काया, वाचा व मन ती सर्व ध्यानात गढून गेल्यामुळे कर्म करण्यास कोणी जागेवर नसतात, म्हणूनच कर्मे होत नाहीत) ॥138॥ फळाला उत्पन्न करणारे जे कर्म ते जेव्हा दूर होते तेव्हा फलत्याग संभवतो आणि अशा त्या त्यागामुळे पूर्ण शांती (पूर्ण ब्रह्मस्थिति) हस्तगत होते ॥139॥ म्हणूनच अर्जुना शांती प्राप्त होण्याकरिता हाच (आता सांगितलेला) काय तो क्रम आहे. (म्हणून) सांप्रतकाळी तुला अभ्यासच केला पाहिजे ॥140॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती


