अतुला प्रणव मेहेंदळे
फोनवरचा मनस्वीचा आवाज ऐकताना नीलिमाताईंच्या ओठांवर हळूवार हास्य उमटलं. “आई, औषधं घेतलीत ना वेळेवर? उद्या शनिवार आहे. मी तुमच्यासाठी सकाळी आंब्याचा रस, पोळी आणि तुमच्या आवडीची डाळ घालून शेपूची भाजी करणार आहे. सकाळी बँकेत काम आहे. तिकडे जाता जाता घेऊन येते. तुम्ही काही करायला जाऊ नका. आराम करा एकवेळ तरी…” नीलिमाताई गपगुमान ऐकत राहिल्या. हा हक्काचा, काळजीचा सूर ऐकताना त्यांना आतून कुठेतरी उबदार वाटलं. एखाद्या विझत चाललेल्या दिव्याला ज्योत मिळावी अगदी तसंच!
काही वर्षांपूर्वी घर लहान पडतं म्हणून आलोक आणि मनस्वी नातीला घेऊन वेगळे राहायला गेले होते, तेव्हा या घरात जे वादळ आलं होतं, ते अजूनही नीलिमाताईंच्या स्मरणात ताजं होतं. नीलिमाताईंच्या सासूबाई थेट बोलल्या होत्या, “एक मूल काय झालं, चार खोल्या कमी पडायला लागल्या? आम्ही किती छोट्या जागेत संसार केला, काही वाईट झालं का आमचं?” नीलिमाताईही मागे नव्हत्या. मधुकरराव तर चांगलेच दुखावले होते. त्या घरात एक प्रकारची थंड शांतता पसरली. नाती होती, पण त्यात ओलावा नव्हता…
वर्षभरापूर्वी सासूबाई गेल्यावर मात्र नीलिमाताईंना आयुष्याचा एक नवा पदर दिसला. दोघांचा एकांत, एकमेकांसाठी वेळ, स्वतःच्या गतीने जगण्याचं स्वातंत्र्य हे सारं खूप उशिरा मिळालं होतं, पण मिळालं तरी होतं! आणि मग त्यांना हळूहळू उमगलं की, मनस्वीने आठ वर्षांपूर्वी जो निर्णय घेतला होता, त्यात स्वार्थ नव्हता तर केवळ श्वास घेण्याची गरज होती.
खरी कसोटी लागली चार वर्षांपूर्वी, जेव्हा सासूबाई आजारी पडल्या. नीलिमाताई आणि मधुकरराव वयोपरत्वे सगळं करूच शकत नव्हते. त्या दिवसांत आलोक आणि मनस्वी जसे धावून आले, डॉक्टर, औषधं, रात्री जागणं — सारं त्यांनीच केलं. त्या आजारपणातच नीलिमाताईंनी मनस्वीला खऱ्या अर्थाने पाहिलं. वेगळी राहते, हे खरं — पण मनाने दूर गेली नाही, हेही खरंच! नाहीतर आजकाल सासूचं कुणी करत नाही तर, आजेसासूचं काय करणार…?
त्यात आता परवापासून त्यांना ताप येत होता, तोंडाची चव गेली होती. मनस्वीने निक्षून सांगून टाकलं होतं की, उद्या ती येणार आणि ती आली.
शनिवारच्या सकाळी मनस्वी आली, ती रिकाम्या हाताने नाही. ताज्या कैरीचं लोणचं घेऊन आली होती. नीलिमाताईंच्या गेलेल्या तोंडाच्या चवीसाठी तिने विचार करून सगळा स्वयंपाक आणला होता. गरम पोळी, डाळीची भाजी, रस सगळं तिने स्वतः वाढलं. मधुकरराव अगदी तृप्तीने जेवत होते…
“मनस्वी, आलोक का नाही आला?” नीलिमाताईंनी विचारलं. आवाजात काहीसं हुरहुरलेपण होतं.
“असं काही नाही हो आई… बाबा आलेत ना, म्हणून तो घरी राहिला आणि सान्वी पण आहे ना घरी. उद्या ती मित्र-मैत्रिणींसोबत एक दिवस पिकनिकला जाणार आहे. तिची थोडी तयारी पण करून देतोय तो… आणि मी आलेय त्याचं काहीच नाही का तुम्हाला? पहिल्यापासूनच तुम्हाला मुलाचंच कौतुक जास्त!” असं म्हणत मनस्वीने विषय बदलला.. हसत हसत, पण डोळ्यांत एक जड ओझं लपवत.
नीलिमाताई मात्र सगळं जाणत होत्या. आलोक कुठला तयारी करून देणार, स्वतःचं सगळं केलं तरी खूप! आलोक कमी बोलणारा होता — आईबाबांशीही. परत येणं-जाणं सुरू झाल्यापासून त्याने कधी स्वतःहून फोन केला नाही, कधी मनमोकळ्या गप्पा मारल्या नाहीत. मनस्वीने मात्र दोन्ही घरं जोडून ठेवली होती. नोकरी, घर, सासर, माहेर सारं कसं समतोलाने सांभाळत होती. असो… नीलिमाताईंच्या मनातला विचार आता अधिकच पक्का झाला.
दुसऱ्या दिवशी रविवारी नीलिमाताई आणि मधुकरराव छान तयार होऊन आलोककडे गेले. अधिक महिन्याचं वाण द्यायला मनस्वीचे बाबा आले होते. मनस्वीची आई तीन वर्षांपूर्वी गेली. त्यामुळे हे काम आता त्यांनीच करायचं ठरवलं होतं. त्यांनी जावयाला पाटावर बसवून अगत्याने वाण दिलं. अनारसे, म्हैसूरपाक, बत्तासे असे तीनही पाच-पाच नग, आणि नको म्हणत असतानाही चांदीचं घसघशीत निरांजन दिलं. मनस्वीला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद आणि पाकीट दिलं. कार्यक्रम आटोपला. दोघे पाटावरून उठणार तोच नीलिमाताईंनी प्रेमळ आग्रहाने म्हटलं, “थांबा जरा. मी आले.”
हेही वाचा – आईचं वाण…
क्षणभर सगळे एकमेकांकडे पाहात राहिले.
नीलिमाताई आतून आल्या… एका हातात औक्षणाचं ताट, दुसऱ्या हातात ओटीचं सामान. त्यांनी ते मनस्वीसमोर धरलं. “अधिक महिन्यात खरंतर आईची ओटी भरतात. पण आज मी तुझी — लेक म्हणून — ओटी भरणार आहे.” सगळे स्तब्ध झाले. मनस्वीच्या डोळ्यांत पाणी दाटलं, पण तोंडातून मात्र शब्द फुटेनात. नीलिमाताई शांतपणे बोलत राहिल्या —
“मनस्वी, मी हे मनापासून म्हणते आहे. अगदी खरं सांगू का! तू आणि आलोक जेव्हा वेगळे रहायला गेलात तेव्हा मला खूप राग आला होता तुझा. वाटलं हिने आपलं घर तोडलं. पण आज जेव्हा आम्ही दोघं शांतपणे जगतोय, एकमेकांसाठी वेळ देतोय, अशावेळी तू ‘तेव्हाच’ का गेलीस हे कळतंय. दुरून डोंगर साजरे म्हणतात, ते काही खोटं नाही. आम्हाला आईंचा काही त्रास होता का तर, तसं नाही पण तरीही… असो! प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे तसे तोटे असतात, हे विसरू नका कधीच. मोठी माणसं जवळ असणं म्हणजे ओझं नाही. ती सावली असते. ती गेल्यावर कळतं, किती उन्हाचं असतं आयुष्य. आलोक, अरे तुला माहीत आहे की, आम्हाला आता तुझ्यावर राग नाही. पण कधीतरी आईची विचारपूस कर, बाबांना फोन कर. त्यातून मिळणारा आनंद आम्हाला सांगता येणार नाही आणि मनस्वी तू दोन घरं जोडून ठेवलीस. नोकरी, घर, सासर, माहेर सगळी कसरत करत आलीस. कित्येकदा आलोक आमचे वाढदिवस, दुखणं खुपणं विसरतो, पण तू त्याला आठवण करून देतेस, हे आमच्या नजरेतून सुटलं नाहीये बरं! आईवडिलांना कित्येकदा उगीच वाटत असतं, आपला मुलगा सगळं करतोय, पण त्यामागे खंबीर साथ असते हे, ते विसरून जातात… आमचं तसंच झालं… तू आमचं दूर राहून का होईना, लेकीसारखं करते आहेस. आम्हाला हे वयाने आलेलं शहाणपण आहे, पण तू ते स्वभावानेच जगलीस. आज त्याचीच ही पोचपावती माझ्याकडून आणि बाबांकडून.”
त्यांनी मनस्वीच्या हातात रेशमी पैठणी ठेवली… “तू म्हणाली होतीस ना तुला ही साडी, तिचा रंग आवडतो! म्हणून आजपासून ही तुझी आणि हा आपल्या घराण्याचा लामणदिवा. अशीच या दिव्यासारखी मंद, शांत तेवत रहा, घर उजळवत रहा, आनंद पसरवत रहा.”
हेही वाचा – अधिक मासाचं अनोखं वाण… जावयाकडून!
आलोक थोडा खजील झाला. त्याने आईचा हात हातात घेतला, “आई, मला माफ कर. तुला माझा स्वभाव माहिती आहे ना! मला प्रेम असं दाखवता येत नाही. पण यापुढे मी आठवड्यातून एकदा फोन नक्की करेन.” मधुकरराव हसले… “बापरे, चिरंजीव! अहोभाग्य म्हणायचं आमचं. अरे, तू आमचा मुलगा आहेसच — पण आता मनस्वी आमची लेक आहे. तेव्हा आमच्या लेकीला सुखात ठेवायचं बरं का.” खोलीत हास्याची लाट उठली. मनस्वीचे बाबाही आनंदले. मनस्वी आणि आलोक दोघेही सर्वांच्या पाया पडले. आणि सगळे आत जायला निघाले.
सासूबाईंना आज आपली खरी ओळख झाली, यातच मनस्वीने सारं कमावलं होतं. घर तोडल्याच्या कित्येक वर्षांच्या अपराधीपणाच्या भावनेतून आज ती मुक्त झाली होती. अधिक महिना खरंच तिला ‘अधिक’चा आनंद देऊन गेला होता.


