पोह्यांचा इतिहास पाहिला, तर हा पदार्थ महत्त्वाचा आणि पवित्र ठरवण्यामागे थेट द्वापारयुगातील ‘कृष्ण-सुदामा’ भेटीचा फार मोठा वाटा आहे! जेव्हा अत्यंत गरीब सुदामा आपले परममित्र द्वारकेचे राजे श्रीकृष्ण यांना भेटायला निघाले, तेव्हा आपल्या मित्राला रिकाम्या हाताने कसे भेटावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. सुदामाच्या पत्नीने घरात असलेले मूठभर पोहे एका जुन्या कापडाच्या पुरचुंडीत बांधून दिले. द्वारकेच्या भव्य महालात सुवर्णपात्रात 56 भोग घेणाऱ्या श्रीकृष्णाने सुदामाची ती गरिबीची पुरचुंडी आनंदाने हिसकावून घेतली आणि अत्यंत आवडीने ते कच्चे पोहे खाल्ले. देवाला सोन्या-चांदीच्या ताटातील ऐश्वर्यापेक्षा भक्ताने प्रेमाने दिलेले ‘पोहे’ जास्त प्रिय वाटले.
आयुर्वेदात आणि प्राचीन ग्रंथांमध्ये पोह्यांचा उल्लेख ‘पृथुक’ असा केला आहे. प्रवासात टिकणारा, पचायला हलका आणि त्वरित ऊर्जा देणारा पदार्थ म्हणून पोह्यांचे महत्त्व अगदी कृष्णकाळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत अबाधित राहिले आहे. मध्य प्रदेश नागपूरला लागूनच असल्याने ‘इंदोरी पोह्यां’चा प्रभाव नागपूरवर पहिल्यापासूनच आहे. पण नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ‘तर्री पोहे’ प्रसिद्ध आहेत अन् त्याची चव न्यारीच!
मी 1994-95 मध्ये जेव्हा चंद्रपूरला रहायला गेले, तेव्हा आमच्या पोलीस क्वार्टर्सच्या समोर गिरनार चौकात सकाळी सकाळी साडेसहा-सात वाजता एक पोहेवाला त्याच्या हातगाडीवर एक स्टोव्ह आणि त्यावर लोखंडी कढई घेऊन बसलेला दिसायचा. सात वाजल्यापासून त्याचे पोहे तयार करणं सुरू व्हायचं. सातेक वाजता खमंग कांदा भाजल्याचा वास तेथील आजूबाजूच्या परिसरात दरवळायचा. त्या कांद्याच्या फोडणीनेच त्या परीसरातील लोकांची झोप चाळवली जायची आणि तो पोहेवाला पोहे तयार करेपर्यंत त्याच्या गाडीसमोर रांग लागायला सुरुवात झालेली असायची. अर्ध्या तासात मस्तपैकी पिवळ्या रंगाचा, वरून हिरवी कोथिंबीर पेरलेला पोह्यांचा वाफाळलेला ढिग तयार व्हायचा आणि ते गरमागरम पोहे विकत घेण्याकरिता एकच झुंबड उडायची.
हेही वाचा – Recipe : नागपूरची खासियत… तर्री पोहे
चंद्रपूरच्या आजूबाजूला कोळशाच्या खाणी आणि बल्लारशहा सारख्या ठिकाणी पेपर मिल्स आहेत. आमच्या घरासमोर त्या कंपनीच्या बसेस थांबायच्या. चौकातच हा पोहेवाला असल्याने नाइट शिफ्टवरून परतणारे आणि सकाळी ॲाफिसला जाणारे लोक, ट्युशन्सला जाणारी मुलं, कॅालेजला जाणारे विद्यार्थी हे सगळे त्या पोहेवाल्याकडे पोहे खाण्याकरिता थांबत असत.
माझ्या घराच्या खिडकीतून मी रोज हे दृश्य पहायची. सात वाजता तयार झालेला कढईतील भला मोठा पोह्यांचा ढिग साडेनऊ दहा वाजेपर्यंत संपलेला असायचा. तो विक्रेता सकाळचे फक्त दोन-तीस तास आपलं काम करून आणि जमेल तितका गल्ला गोळा करून दहा वाजेपर्यंत घरी निघून गेलेला असायचा. सुरुवातीला मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की, काय विशेष आहे त्यात? साधे पोहेच तर आहेत, ते काय विकत घेऊन खायची गोष्ट आहे का? पण हळूहळू लक्षात आलं. एकटे-दुकटे राहणारे खाण कामगार, नोकरीच्या तसेच शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेले लोक यांना तो पोहेवाला म्हणजे देवदूतासारखा वाटायचा. सकाळी सकाळी चविष्ट पोहे जर माफक दरात मिळत असतील तर ते कोणाला नको होते?
नागपूरातील एलआयसी चौकातील पोहेवाल्याची ‘विमानभरारी’ चा किस्सा खूपच रंजक आहे. नागपूरच्या एलआयसी चौकातला पोहेवाला सुप्रसिद्ध होता. सुरुवातीला एका हातगाडीवर हा व्यवसाय करणारा हा पोहेवाला इतका श्रीमंत झाला की, तो नंतर विमानाने प्रवास करायला लागला होता. सिंगापूर, दुबई, बॅन्कॉक अशा परदेशवाऱ्या पण तो करत असे, असं ऐकिवात आहे. तो जरी नंतर श्रीमंत झाला तरी, ज्या पोह्यांनी त्याला फेमसं केलं, त्यांना तो कधीच विसरला नाही. तो पहिल्यांदा हातगाडीवर खाकी ड्रेस घालून रोज पोहे विकायचा. परंतु जेव्हा त्याच्याकडे पैसा आला तेव्हा तो आपल्या मारूती स्विफ्ट डिझायरमधून आपले खाकी रंगाचे कपडे अंगावर चढवूनच पोहे विक्रीला सुरुवात करायचा. प्रारंभी चार-पाच किलो पोहे विकणारा हा माणूस नंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोत्यांनी पोहे विकू लागला. आपल्या कारच्या डिक्कीतून पोह्यांची पोती आणायचा. ही अतिशयोक्ती नाहीये तर, सत्य घटना आहे. पांढऱ्या शुभ्र कारमधून तो माणुस पांढरेच कपडे घालून यायचा, परंतु पोहे विकताना मात्र कारमध्ये पांढरे कपडे बाजूला काढून ठेवून आपल्या जुन्या खाकी कपड्यांवरच पोहे विकायला बसायचा. त्याची ती आपल्या कामाप्रतीची श्रद्धा असावी. त्या काळात त्याचे पोहे नागपूरात खूपच फेमस होते. आता तो पोहेवाला या जगात नाहीये, परंतु आजही तुम्ही नागपूरात एलआयसी चौकातल्या पोहेवाल्याविषयी विचारलं तर तेथील लोक तुम्हाला त्याची यशोगाथा ऐकवतील.
हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!
आता तर नागपूरात तर्री पोह्याची अनेक दुकानं दिसतील. तर्रीमध्ये सावजी तर्रीसारखे व्हेरीएशन्स आणून या साध्या उद्योगाला एक नवीन रूप देण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला नागपूरात रामजी श्यामजी, श्रद्धा फरसाणचे पोहे, गोल्डी, विकीचे तर्री पोहे प्रसिद्ध होत आहेत. पोह्यांसारख्या साध्या डिशला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देऊन कमी बजेटमधे हा व्यवसाय कसा विस्तारता येऊ शकतो, हे या नागपूरच्या तर्री पोहे विक्रेत्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्याकरिता आमच्या नागपुरात म्हणतात तसं, “कम दाम में ज्यादा रोशनी” ही म्हण बरोबर लागू होते. या तर्री पोह्यांच्या बरोबरीने विदर्भातील पोह्याचा कच्चा चिवडा देखील तितकाच प्रसिद्ध आहे. बाहेर विकतच्या चिवड्यात तर फक्त मुरमुऱ्यांचा किंवा पोह्यांचा कच्चा चिवडा मिळतो, परंतु घरी जर कच्चा चिवडा करायचा असेल तर त्यामध्ये मुरमुऱ्यांसोबत पातळ पोहे वापरतात.
सकाळी सकाळी मिलिंद इंगळेंच्या सुरेल आवाजातील ‘गारवा’ अल्बममधील पावसाची गाणी ऐकत तर्री पोह्यांवर ताव मारायचा म्हणजे आनंदी आनंद!


