सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
श्रीभगवानुवाच – सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम । देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः ॥52॥
यया पार्थाचिया बोलासवें । हें काय गा म्हणितलें देवें । तुवां प्रेम ठेवुनि यावें । विश्वरूपीं कीं ॥673॥ मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती । ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि ॥674॥ अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना । ऐसा आथी मना । चुकीचा भावो ॥675॥ तरि विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें । तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥676॥ आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी । परि अवसरु नाहीं भेटी । जयाचिये ॥677॥ तें विश्वरूप एकादे वेळ । कैं देखों अळुमाळ । ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां ॥678॥ आशेचिया अंजुळी । ठेऊनि हृदयाचां निडळीं । चातक निराळीं । लागले जैसे ॥679॥ तैसे उत्कंठानिर्भर । होउनियां सुरनर । घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥680॥ परि विश्वरूपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे । तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हें ॥681॥
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया । शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥53॥
पैं उपायासि वाटा । न वाहती एथ सुभटा । साहिसहित वोहटा । वाहिला वेदीं ॥682॥ मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा । तपांचियाही सर्वभारा । नव्हेचि लागु ॥683॥ आणि दाना कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें । जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ॥684॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा संतोषु बहु चित्तें, घेइजत असे पांडुसुतें
अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले, महत्प्रयासानेही दिसण्याला कठीण, असे जे माझे हे रूप तू पाहिलेस, त्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देव देखील नित्य उत्सुक आहेत. ॥52॥
या अर्जुनाच्या भाषणाबरोबर भगवंत म्हणाले, हे काय रे? तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून (सगुणाकडे) ये. ॥673॥ मग या सगुण मूर्तीला (विश्वरूपावर दृढ प्रेम ठेऊन नुसते रिकामे) नुसत्या देहसामग्रीने (नुसत्या रिकाम्या देहाने) भेटावे. हे सुभद्रापते अर्जुना, ही जी तुला आम्ही मागे शिकवण दिली होती, ती विसरलास! ॥674॥ अरे अविचारी अर्जुना, एवढा मोठा मेरू (सोन्याचा पर्वत) पण तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे त्याचे काही महत्त्व वाटत नाही, अशी जी मनाची समजूत असते, ती चुकीची आहे. ॥675॥ तरी आम्ही तुझ्यापुढे जे विश्वरूप दाखविले, ते शंकरालासुद्धा अनेक तपे केली तरी प्राप्त होत नाही. ॥676॥ अर्जुना, योगी हे अष्टांग योगासारख्या संकटांना तोंड देऊन शिणतात, परंतु ज्या विश्वरूपाच्या दर्शनाचा प्रसंग त्यांना येत नाही ॥677॥ ते विश्वरूप एखादे वेळ तरी थोडेसे आम्ही केव्हा पाहू, असे चिंतन करताना देवांचा काळ जातो. ॥678॥ आशारूप ओंजळ हृदयरूप कपाळावर ठेऊन चातक पक्षी जसे आकाशाकडे पाहातात, ॥679॥ त्याप्रमाणे देव आणि मनुष्य हे विश्वरूप दर्शनाच्या उत्कंठेने आतुर होऊन आठही प्रहर (रात्रंदिवस) विश्वरूपाची भेट होईल काय, म्हणून घोकीत बसतात. ॥680॥ परंतु विश्वरूपासारखी गोष्ट कोणी स्वप्नात सुद्धा पाहिली नाही. असे हे विश्वरूप तू हे आज प्रत्यक्ष सुखाने पाहिलेस. ॥681॥
ज्याप्रकारे तू मला पाहिलेस, त्या प्रकारे वेदपठनाने, तपाने, दानाने अथवा यज्ञाने (देखील) मी (कोणाला) दिसणे शक्य नाही ॥53॥
परंतु अर्जुना, या विश्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनाचा लाग नाही (मार्ग सापडत नाही), आणि सहा शास्त्रांसह वेद, लाग न लागल्याने, या विश्वरूपापासून मागे हटले. ॥682॥ मी जो विश्वरूप, त्या माझ्याकडे चालत येण्याला, अर्जुना, तपांच्या सर्व समुदायालासुद्धा सामर्थ्य नाही. ॥683॥ आणि तू जशा विस्ताराने मला पाहिलेस, तसा मी दानांनी दिसण्यास खरोखर कठीण असून यज्ञांनीही मी तसा पाहण्यास सापडत नाही. ॥684॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जी विश्वरूपाचां सागरीं, होतों तरंग मवित वांवेवरी


