सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जैसी प्रभा हारति बिंबीं । की जळदसंपत्ती नभीं । भरतें सिंधुगर्भीं । रिगालें राया ॥650॥ हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥651॥ तंव परिमाणा रंगु । तेणें देखिला साविया चांगु । तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणोनि घडी केली पुढती ॥652॥ तैसें वाढीचेनि बहुवसपणें । रूपें विश्व जिंतिलें जेणें । तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥653॥ किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें । परि आश्वासिलें पार्थातें । बिहालियासी ॥654॥ तेथ जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला । तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥655॥ नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें । स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥656॥ तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्वरूपाची जवनिका होती । ते फिटोनि गेली परौती । हें भलें जाहलें ॥657॥ काय काळातें जिणोनि आला । महावातु मागां सांडिला । आपुलिया बाहीं उतरला । सात सिंधु ॥658॥ ऐसा संतोषु बहु चित्तें । घेइजत असे पांडुसुतें । विश्वरूपापाठीं कृष्णातें । देखोनियां ॥659॥ मग सूर्याचां अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं । तैसी देखों लागला अवनी । लोकांसहित ॥660॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…
अर्थ
ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेज हे, सूर्यादिकांच्या बिंबात सामावते, किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्ये लीन होतात, (अथवा) राजा धृतराष्ट्रा, समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते, ॥650॥ त्याप्रमाणे कृष्णाकृतीच्या रूपाने जी विश्वरूप रूपी वस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या पसंती करता देवांनी उकलून दाखविली ॥651॥ तेव्हा (एखादे वस्त्र विकत घेणारे गिर्हाईक जसे त्या वस्त्राची लांबी, रुंदी आणि रंग सहज पाहाते त्याप्रमाणे) अर्जुनाने या विश्वरूप रूपी वस्त्राची लांबी, रुंदी आणि रंग सहज नीट पाहिला, त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभावच नाही, म्हणून देवांनी विश्वरूपी वस्त्राची सगुण कृष्णमूर्तिरूप पुन्हा घडी केली. ॥652॥ त्याप्रमाणे आपल्या वाढीच्या अतिशय विस्ताराने ज्या कृष्णरूपाने विश्व जिंकले होते, ते विश्वरूपाने वाढलेले कृष्णरूप (पुन्हा) शांत, सगुण आणि सुंदर असे झाले. ॥653॥ फार काय सांगावे! श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगु्ण रूप धारण केले, पण भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला. ॥654॥ त्यावेळी स्वप्नात स्वर्गाला गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा (म्हणजे तो जसा एकदम बदलेल्या परिस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो) तसे अर्जुनास आश्चर्य वाटले. ॥655॥ अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर, प्रपंचाचे सर्व ज्ञान ओसरल्यावर जसे एक ब्रह्मात्र स्फुरते, त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर अर्जुनाने कृष्णमूर्ती पाहिली. ॥656॥ त्या अर्जुनाला मनात असे वाटले की, (माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्णमूर्तीच्या) आड (मध्ये) जो विश्वरूपाचा पडदा होता, तो पलीकडे निघून गेला, हे चांगले झाले. ॥657॥ जसा काय काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वार्यास मागे हटविले, अथवा आपल्या हातांनी सात समुद्र पोहून उतरून आला. ॥658॥ अर्जुनाने विश्वरूपानंतर कृष्णरूपाला पाहून आपल्या मनाने असा फार आनंद मानला. ॥659॥ मग सूर्य जसा मावळल्यावर पुन्हा आकाशात चांदण्या प्रकट होतात, त्याप्रमाणे अर्जुन हा लोकांसहित पृथ्वी पाहावयास लागला. ॥660॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तया विश्वरूपायेवढी दशा, करितां प्रीतीचा वाढु कैसा


