रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. नाचणीचे आंबील, रुचकर आमटी, आंबा डाळीचे वडे, डाळींचे खुमासदार पदार्थ करताना टिप्स वापरून पाहा.
- कडधान्याला मोड येण्यासाठी कोणतेही कडधान्य भिजवून त्यातील सर्व पाणी निथळून देऊन नंतर कॅसेरोलमध्ये तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी अतिशय छान मोड येतात.
- उरलेल्या आंब्याच्या डाळीत कांदा, लसूण, आले आणि कडा काढलेल्या ब्रेडचे स्लाइस घालून हे मिश्रण चांगले मळून त्याचे छोटे चपटे वडे करून तळावेत.
हेही वाचा – Kitchen Tips : बिटाचे कटलेट आणि परोठे, भरली वांगी करताना…
- आपण बाजारातून जास्त प्रमाणात कडधान्य आणतो. थोड्याच दिवसात त्याला कीड लागते. असे होऊ नये म्हणून कडधान्यात दोन-चार बिब्बे टाकल्यास कडधान्य स्वच्छ राहतात आणि अजिबात कीड लागत नाही.
- कढीपत्ता वापरल्यावर त्याच काड्यांची जुडी करून उकळत्या आमटीत टाकावी. स्वाद चांगला लागतो.
- रस भाज्या, आमटी, फोडणीचे वरण आणि उसळी जास्त रुचकर होण्यासाठी चिमूटभर लवंग पूड आणि एक टी-स्पून व्हिनिगर घाला. स्वाद आणि चवही छान लागते.
- आपल्याकडून चुकून हरभराडाळ किंवा उडीदडाळ अथवा कुठलीही डाळ भिजत टाकायची राहून गेली तरी, ऐनवेळी चांगली भिजलेली डाळ आपल्याला एक तासात उपलब्ध होऊ शकते. थोडे दूध आणि थोडे पाणी गरम करून घ्यावे. त्यात चिमूटभर सोडा टाकावा आणि त्यात डाळ भिजत घालावी. अशा प्रकारे भिजत घातलेल्या डाळीच्या पदार्थांची खुमारी जास्तच वाढते.
हेही वाचा – Kitchen Tips : भाज्यांच्या सत्वयुक्त सालींचा वापर अन् टोमॅटोचे सार करण्याच्या टिप्स
- नाचण्याची आंबील उन्हाळ्यात करावी म्हणजे उन्हाळा बाधत नाही. एक किलो नाचणी आणून वाळवून बारीक दळून ठेवावी. पीठ चाळून ठेवावे. रात्री एक चमचा पीठ पाण्यात कालवून ठेवावे. सकाळी चार वाट्या पाणी उकळून यात पीठ शिजवावे. त्यात मिरे, जिरे पूड घालून गॅस बंद करावा. गार झाली म्हणजे आंबील ताक घालून फ्रीजमध्ये ठेवावी. उन्हाच्या वेळी पिण्यास द्यावी. आपल्याला आवडत असेल तर लसूण, आले घालावे. नुसती शिजवून गार झाल्यावर मुलांना दूध, साखर घालून द्यावी. हे फारच सुंदर टॉनिक आहे.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


