रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. केसरी भात, मुगाची खिचडी, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ करताना टिप्स वापरून पाहा.
- आंबाडाळ उरली असेल, तर तिचे छोटे वडे करून उन्हात वाळवावेत. ते बरेच दिवस टिकतात. नंतर कधीही तळून खाता येतात.
- गडबडीच्या वेळी वरण नीट शिजले नाही आणि परत शिजविण्याएवढा वेळ नसेल, तर मिक्सरमधून काढावे. एकजीव होते.
- भात फुललेला आणि मोकळा होण्यासाठी भात खाली उतरवल्यावर त्यावर ब्रेडची स्लाइस ठेवावी.
- कुकर न लावता पातेल्यात जेव्हा भात करतो, तेव्हा भाताला कढ आल्यावर त्यात थोडासा लिंबाचा रस टाकल्यास भात अगदी मोगरीच्या कळ्यांसारखा शुभ्र होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : खमण ढोकळा, डोसा, ऑम्लेट बनवताना या टिप्स वापरून पाहा
- पातळ फडक्यात थोड्या मेथी दाण्यांची पुरचुंडी बांधून डाळीत टाकलीत, तर मेथीचा सुरेख स्वाद डाळीला लागतोच, पण डाळ पचायलाही हलकी होते.
- मुगाच्या डाळीची फोडणीची खिचडी करताना तांदूळ आणि डाळ परतल्यावर, स्वच्छ धुऊन चिरलेली मेथी परतावी आणि खिचडी करावी.
- मिक्स डाळीचे वडे करताना दोन चमचे तूरडाळ भिजवलेली तशीच टाकावी. त्यामुळे वडे तळताना तेल वड्यात न राहता आरपार जाते आणि वडे घट्ट न होता हलके होतात.
- केसरी भात तयार झाल्यानंतर पातेल्यावर ताट न झाकता, पातेल्यावर संपूर्णपणे केळीचे पान दाबून बसवावे. भातावर तूप सोडण्याचे वाचते तसेच भात एकदम आकर्षक दिसतो.
हेही वाचा – Kitchen Tips : वांग्याचे भरीत अन् कढी गोळे बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा…
- मोड आणावयाला कडधान्ये घातली की, काही वेळा खूप भिजल्यावर वास येतो. ती उन्हात वाळवावी. त्याचे पीठ दळून त्याच्या भाकरी किंवा थालीपिठे लावावीत, म्हणजे कडधान्य वाया जात नाही.
- कैरीची डाळ करताना हळद एक चमचा साजूक तुपात फेसून डाळीला चोळून घ्या. सुंदर रंग येतो.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


