सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
तुज विश्वसुहृदातें कहीं । सोयरेपणें न मनूंचि पाहीं । तुज ईश्वरेश्वराचां ठायीं । ऐश्वर्य केलें ॥569॥ तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे । तरि मियां वल्गिजे क्षोभें । अधिकाधिक ॥570॥ आतां ऐसऐसेया अपराधां । मर्यादा नाहीं मुकुंदा । म्हणोनि रक्ष रक्ष प्रमादा । पासोवो म्हणुनी ॥571॥ जी हेंचि विनवावयालागी । कैंची योग्यता माझां आंगीं । परि अपत्य जैसें सलगीं । बापेंसिं बोले ॥572॥ पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध । तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसें साहिजो जी ॥573॥ सख्याचें उद्धत । सखा साहे निवांत । तैसें तुवां समस्त । साहिजो जी ॥574॥ प्रियाचां ठायीं सन्मान । प्रिय न पाहे समर्था जाण । तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो ॥575॥ नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें । तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ॥576॥ कां उखितें आंगें जीवें । आपणपें दिधलें जिया भावें । तिये कांतु मिनलिया न राहवें । हृदय जेवीं ॥577॥ तयापरी जी मियां । हें विनविलें तुमतें गोसाविया । आणि कांहीं एक म्हणावया । कारण असे ॥578॥
अदृष्टपूर्व हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे । तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ॥45॥
तरि देवेंसीं सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली । ते मायबापें पुरविली । स्नेहाळाचेनि ॥579॥ सुरतरूंची झाडें । आंगणीं लावावीं कोडें । देयावें कामधेनुचें पाडें । खेळावया ॥580॥ मियां नक्षत्रीं डाव पाडावा । चंद्र चेंडूवालागीं देयावा । हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवां ॥581॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे
अर्थ
तू सर्व जगाचा मित्र असून तू आमचा एक नातेवाईक आहेस, असे समजून आम्ही तुला कधी मान दिला नाही. सगळ्या देवांचा जो तू ईश्वर, त्या तुझ्या ठिकाणी (तुला सारथी करून) प्रभुत्व (धनीपण) गाजविले. ॥569॥ सर्वांकडून वर्णन करण्यास तू एकच योग्य आहेस. (तेव्हा वास्तविक पहाता मीच तुझे वर्णन करणे योग्य होते,) पण माझ्यावर तुझे प्रेम असल्यामुळे सभेमध्ये तू माझेच वर्णन करत होतास. (तेव्हा मी आपली स्वत:ची योग्यता ओळखून उगीच बसावे की नाही? तरी तसे न करता,) तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिक अधिकच बडबड करीत होतो. ॥570॥ आता देवा, अशा माझ्या हातून घडलेल्या अपराधांना मर्यादा नाही. याकरिता माझ्यावर प्रसाद म्हणून माझ्या चुकांपासून माझे रक्षण करा. ॥571॥ देवा, हीसुद्धा विनंती करण्याची योग्यता माझ्या अंगी कोठे आहे? परंतु लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या बापाशी सलगीचे भाषण करते (त्याप्रमाणे मी तुमच्याशी सलगीचे भाषण करीत आहे.) ॥572॥ आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या, तरी बाप ज्याप्रमाणे दुजेपणा सोडून त्या सहन करतो, त्याप्रमाणे अहो महाराज, माझे अपराध आपण सहन करा. ॥573॥ बरोबरीचा स्नेही, आपल्या स्नेह्याकडून उपमर्द झाला असता, त्याविषयी काहीच मनात न घेता सहन करतो, त्याप्रमाणे महाराज, मी केलेली सर्व अविचारी कृत्ये आपण सहन करा. ॥574॥ असे पाहा की, स्नेह्याच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्छिष्ट काढले, त्याची आपण क्षमा करावी. ॥575॥ अथवा जिवलग स्नेह्याची गाठ पडल्यावर मग आपण भोगलेले जे संकटाचे सर्व प्रसंग, ते त्यास सांगावयास काहीच संकोच वाटत नाही, ॥576॥ अथवा ज्या पतिव्रतेने आपल्या शरीराने आणि प्राणाने सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण केले, तिची आणि पतीची भेट झाली असता ज्याप्रमाणे तिच्या मनातील कोणतीही गोष्ट पतीला सांगितल्यावाचून तिच्याने राहावत नाही. ॥577॥ अहो महाराज, त्याप्रमाणे मी तुम्हास (माझे मागील अपराध क्षमा करण्याची) विनंती केली आणि माझा आणखी काही एक सांगावयाचा हेतू नाही. ॥578॥
पूर्वी (कधी) न पाहिलेले हे रूप (तुझे विश्वरूप) पाहून मी हर्ष पावलो आहे आणि भायाने माझे मन व्याकुळ झाले आहे. (म्हणून) देवा, मला तेच (पूर्वीचे) रूप दाखव. हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, माझ्यावर प्रसन्न हो. ॥45॥
तरी मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट घेतला, हा जो देवापाशी मी लडिवाळपणा केला, तो माझा लडिवाळपणाचा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप, त्या तुम्ही पुरविला. ॥579॥ कल्पवृक्षांची झाडे अंगणामध्येच कौतुकाने लावून द्यावीत अथवा कामधेनूचे वासरू खेळावयास आणून द्यावे, ॥580॥ मी नक्षत्रांच्या फाशांशी डाव खेळावा, मला चेंडू म्हणून खेळावयास चंद्र द्यावा, हा सर्व माझा हट्ट माझ्या आई, तू सिद्धीस नेलास. ॥581॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता


