रावण भातासाठी साहित्य
- तांदूळ – दोन वाट्या
- तीळ – पाऊण वाटी
- चण्याची डाळ – पाव वाटी
- मेथी – दीड चमचा
- चिंच – लिंबाएवढी
- लाल सुक्या मिरच्या – 4 ते 5
- हळद – अर्धा चमचा
- मीठ – दीड चमचा
- आंबट ताक – अर्धी वाटी
- उडदाची डाळ – दोन चमचे
- गोडतेल – पाऊण वाटी
- कढीलिंब – 8 ते 10 पाने
- हिंग – एक चमचा
- मेथी दाणे – अर्धा टी-स्पून
कृती
- चण्याची डाळ भिजत घालावी आणि तांदूळ धुऊन घ्यावेत.
- तीळ भाजून, कुटून घ्यावेत आणि चिंच कोळून घ्यावी.
- जरा जास्त हिंग घालून आणि कढीलिंब घालून फोडणी करावी.
- त्यावर तांदूळ घालून परतून घ्यावेत.
- नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा आणि परातीत काढून घ्यावा.
- चण्याची भिजवलेली डाळ, तेलावर परतून घ्यावी. त्याच तेलात मेथी तांबूस रंगावर परतून घेऊन त्याची पूड करावी.
- त्याच तेलात उडदाची डाळ तांबूस रंगावर परतून घ्यावी.
- नंतर चण्याची डाळ, मेथीची पूड, उडदाची डाळ, तिळाचे कूट, मीठ आणि चिंचेचा कोळ भातात घालावा.
- तेलाची फोडणी करून त्यात सबंध मिरच्या टाकून काळसर होऊ द्याव्या आणि ती फोडणी भातावर घालून, भात सारखा करून घ्यावा.
- दह्यातील कोशिंबीर किंवा रायत्याबरोबर या भाताचा आस्वाद घ्यावा.
हेही वाचा – Recipe : तांदळाची, गव्हल्याची अन् दुधीभोपळ्याची खीर
डाळिंबी भाताचे साहित्य
- तांदूळ – दोन वाट्या
- सोललेल्या डाळिंब्या – दोन वाट्या
- गोडा (काळा मसाला) – एक चमचा
- मीठ – चवीनुसार
- गूळ – लिंबाएवढा
- धणे पूड – दोन चमचे
- जिरे पूड – एक चमचा
- ओले खोबरे – पाव वाटी (किसलेले)
- कोथिंबीर – पाव वाटी (बारीक चिरलेली
- लाल तिखट – चवीनुसार
- हळद – एक चमचा
- फोडणीचे साहित्य
हेही वाचा – Recipe : आजचा मेन्यू… कोबी डोलमा आणि संत्र्याचा भात
कृती
- तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि वालाच्या बिरड्या काढून घ्याव्यात.
- नंतर अर्धी वाटी तेलाची खमंग फोडणी करून घ्यावी आणि त्यात तांदूळ घालून जरा परतावेत.
- नंतर त्यात आधणाचे पाणी घालून वालाच्या डाळिंब्या घालाव्यात.
- भात अर्धवट शिजवून झाल्यावर त्यात गूळ, धणे व जिऱ्याची पूड, काळा मसाला, चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालावे. थोडी हळदही घालावी.
- भात चांगला शिजवून घ्यावा आणि ताटात वाढाताना त्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालून वाढावे.
टीप
- या भातात काळा मसाला नको असल्यास चार-पाच ओल्या मिरच्या, एक वाटी चिरलेला कांदा आणि चार-पाच लसणीच्या पाकळ्या वाटून घालाव्यात. तसेच वाटीभर नारळाचे दूध घालावे.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883
या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


