सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥507॥ आणि हें तूंतें काइ पुसावें । येतुलालें आम्हांसिही जाणवे । तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ॥508॥ तूं स्वप्रकाशाचा आगरु । आणि जाला आहासि गोचरु । म्हणोनिया निशाचरां केरु । फिटला सहजे ॥509॥ हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा । आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥510॥ जेथूनि नाना सृष्टीचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥511॥ देवो निःसीमतत्त्व सदोदितु । देवो निःसीमगुण अनंतु । देवो निःसीमसाम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥512॥ जी तूं त्रिजगतिये वोलावा । अक्षर तूं सदाशिवा । तूंचि संतासंत देवा । तयाही अतीत तें तूं ॥513॥
त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥38॥
प्रकृतिपुरुषांचा आदी । जी महत्तत्त्वां तूंचि अवधी । स्वयें तूं अनादी । पुरातनु ॥514॥ सकळ विश्वजीवन । जीवांसि तूंचि निधान । भूतभविष्याचें ज्ञान । तुझांचि हातीं ॥515॥ जी श्रुतीचियां लोचना । स्वरूपसुख तूं अभिन्ना । त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तूं ॥516॥ म्हणोनि जी परम । तूंतें म्हणिजे महाधाम । कल्पांतीं महद्ब्रह्म । तुझां अंकीं रिगे ॥517॥ किंबहुना देवें । विश्व विस्तारिलें आहे आघवें । अनंतरूपा वानावें । कवणें तूंतें ॥518॥
वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥39॥
नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥40॥
जी काय एक तूं नव्हसी । तूं कवणे ठायीं गा नससी । हें असो जैसा आहासी । तैसिया नमो ॥519॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु
अर्थ
हे श्रीकृष्णा, येथे हे राक्षस कोणत्या कारणामुळे तुमच्या चरणांना शरण न येता दूर पळून गेले आहेत? ॥507॥ आणि हे तुम्हाला तरी काय पुसावयाचे आहे? एवढे तर आमच्याही लक्षात येण्यासारखे आहे. (तर हे पाहा,) सूर्य उगवला असता अंधार कसा टिकाव धरणार? ॥508॥ तू आत्मप्रकाशाची खाण आहेस आणि (आमच्यापुढे) प्रत्यक्ष प्रकट झाला आहेस, म्हणून सहजच राक्षसांची दुर्दशा उडाली आहे. ॥509॥ इतके दिवस, हे श्रीरामा, हे आम्हाला काहीच समजत नव्हते. हे तुझे अगाध सामर्थ्य आताच आमच्या नजरेस येत नाहे. ॥510॥ ज्याच्यापासून अनेक सृष्टींच्या पंक्ती आणि प्राणिमात्रांच्या समुदायरूप वेली उत्पन्न होत असतात, त्या महद्ब्रह्माला, प्रभू, आपली इच्छा प्रसवली आहे. ॥511॥ देवा, आपण अमर्याद तत्वरूप असून आपले अस्तित्व त्रिकालाबाधित आहे. आपण अंतरहित असून आपल्या गुणांची गणती नाही. आपण अखंड निष्प्रतिबंधपणाने सर्वत्र व्याप्त आहात आणि आपण देवांचे राजे आहात. ॥512॥ हे नित्य कल्याणरूप देवा, महाराजा, तू त्रैलोक्याला आश्रय आहेस. तू अविनाशी आहेस, देवा, सत् आणि असत् तूच आहेस आणि त्या पलीकडील जे, तेही तूच आहेस. ॥513॥
तू आदिदेव, पुराणपुरुष आहेस. तू या विश्वाचे अखेरीचे निवासस्थान आहेस. तू सर्व जाणतोस, तू जाणण्याला (अत्यंत) योग्य आहेस. अत्यंत श्रेष्ठ असे आश्रयस्थान तूच आहेस. हे अनंतरूपा, तू (हे) विश्व व्यापले आहेस. ॥38॥
देवा, (तू) प्रकृती आणि पुरुषांचे मूळ आहेस. महत् तत्वाचा शेवटही तूच आहेस. तू जन्मरहित आहेस आणि तू सगळ्यांच्या पूर्वीचा आहेस. ॥514॥ (देवा,) तू सर्व जगाचे जीवन आहेस आणि जीवांचा शेवटही तुझ्यातच होतो आणि भूतभविष्याचे ज्ञान तुझ्या हाती आहे. ॥515॥ हे जीवांशी अभिन्नतेने असणार्या देवा, श्रुतीच्या नेत्रास (ज्ञानास) गोचर होणारे असे जे स्वरूपसुख, ते तू आहेस आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया, त्या मायेला आधार तूच आहेस. ॥516॥ म्हणून देवा, तुला श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात आणि प्रलयकाळाच्या शेवटी मायाही तुझ्या स्वरूपी लीन होते. ॥517॥ फार काय सांगावे! देवा, तुझ्याकडून सर्व विश्व विस्तारले गेले आहे. ज्या तुला अनंत रूपे आहेत, त्या तुझे वर्णन कोणी करावे? ॥518॥
वायू, यम, अग्नी, वरूण, चंद्र, ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाही पिता तू आहेस. तुला सहस्त्रावधी नमस्कार असोत. पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो. ॥39॥
हे सर्वत्र असणार्या प्रभो, पुढून, मागून, सर्व बाजूंनी तुला नमस्कार असो. सामर्थ्याला अंत नसलेला आणि पराक्रमाला इयत्ता नसलेला तू आहेस. तू सर्व व्यापून आहेस. तस्मात् सर्व तूच आहेस. ॥40॥
देवा, काय काय एक तू नाहीस? अरे, तू कोणत्या ठिकाणी नाहीस? हे वर्णन करणे पुरे. तू जसा असशील तशा तुला नमस्कार असो. ॥519॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : कीर्ती आठवितां वेळोवेळां, भोगितसें महासुखाचा सोहळा


