सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
मियां होआवया समाधान । पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एकें काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥446॥ तरि तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं । आघवांचि करीं परिजिलीं । शस्त्रें काह्या ॥447॥ जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें । कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥448॥ एथ कृतांतेंसीं देवा । कासया किजतसे हेवा । आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ॥449॥ या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु । आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी ॥450॥
श्रीभगवानुवाच :- कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥32॥
तरि मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । सैंघ पसरिलीं आथि तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ॥451॥ तेथ अर्जुन म्हणे कटकटां । उबगिलों मागिल्या संकटा । म्हणौनि आळविला तंव वोखटा । उधाइला हा ॥452॥ तेवींचि कठिण बोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी । म्हणोनि सवेंचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥453॥ तरि आतांचि ये संहारवाहरे । तुम्ही पांडव असा बाहिरे । तेथ जातजात धनुर्धरें । सांवरिले प्राण ॥454॥ होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला । मग लागला बोला । चित्त देऊं ॥455॥ ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझे हें जाणावें । येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ॥456॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला, का भणंगा दुष्काळु पाहला
अर्थ
माझे समाधान व्हावे म्हणून मी विश्वरूपाचे ध्यान विचारले आणि इतक्यात एकदम तू सर्व त्रैलोक्य-संहारच करीत सुटलास! ॥446॥ तेव्हा तू आहेस तरी कोण? इतकी ही भयंकर तोंडे कशाकरिता तयार केलीस? या सर्वच हातांत शस्त्रे कशाकरिता धारण केली आहेस? ॥447॥ जेव्हा महाराज तुमचा रागीटपणा अधिक वाढतो, तेव्हा आकाशालाही कमीपणा आणीत आहे! तू डोळे भयंकर वटारून आम्हाला भीती काय म्हणून दाखवीत आहेस? ॥448॥ देवा येथे सर्वनाश करणार्या काळाबरोबर स्पर्धा काय म्हणून करण्यात येत आहे? या करण्यात तुझा अभिप्राय काय आहे, तो तू मला सांगावास. ॥449॥ अर्जुनाच्या या भाषणावर श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि एवढ्या उग्रतेने कशाकरिता वाढत आहे, हेच तू विचारीत आहेस ना? ॥450॥
श्रीकृष्ण म्हणाले, लोकांचा संहार करणारा (आणि त्यासाठी) वृद्धी पावलेला काळ मी आहे. येथे मी लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. तुझ्याखेरीज दोन्ही सेनासमुदायामध्ये जे योद्धे (उभे) आहेत, ते सर्व नाहीसे होतील ॥32॥
तर अरे, मी काळ आहे, हे पक्के समज. मी जगाचा नाश करण्याकरिता मोठा होत आहे. माझी तोंडे चहूकडे पसरलेली आहेत आणि मी (त्या तोंडांनी) हे सर्व आता गिळून टाकीन. ॥451॥ असे ऐकून अर्जुन म्हणाला, हाय हाय! (हे सर्व सैन्यच्या सैन्यच विश्वरूपाच्या उग्र तोंडात जात आहे. अशा) या पहिल्या संकटाने मी त्रासलो म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना केली, त्यावर तो हा श्रीकृष्ण परमात्मा अनिष्ट रूपाने प्रकट झाला. ॥452॥ त्यावर त्या कठीण बोलण्याने अर्जुन निराश आणि कष्टी होईल म्हणून लागलीच श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, पण यात दुसरी आणखी एक गोष्ट आहे. ॥453॥ तर आत्ताच्या या संहाररूपी संकटाबाहेर फक्त तुम्ही पांडव राहिलेले आहात. असे भागवंत बोलले, त्या वेळी अर्जुनाने जाण्याच्या बेतात आलेले आपले प्राण सावरून धरले. ॥454॥ अर्जुन मरणरूप महामारीत सापडला होता. तो पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला. ॥455॥ अर्जुना, तुम्ही पांडव तेवढे माझे असल्यामुळे तुमच्यावाचून बाकी इतर सर्वांचा ग्रास करण्याला मी तयार झालो आहे. असे तू पक्के समज, असे देव त्यावेळी म्हणाले. ॥456॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अगा आत्मा तूं एकु, सकळविश्वव्यापकु…


