मागील लेखात आपण ध्यान साधनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याबाबत जाणून घेणार आहोत.
वाचनाविषयी थोडक्यात…
‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती सर्वपरिचित आहे. वास्तविक, वाचन संस्कृती ही प्राचीन काळापासून पूर्वापार चालत असलेली प्रथा असून आपल्या दैनंदिन जीवनात तिचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नियमित वाचनातून वाचकाच्या विचारांना श्रीमंती लाभते आणि यातूनच आयुष्य समृद्ध होण्यास साहाय्य प्राप्त होते. परंतु आजकालच्या गतिमान जीवनात वाचायला फुरसतच मिळत नाही, असा सूर बहुतांश लोकांकडून ऐकायला मिळतो. तथापि, अशा प्रकारची बतावणी चुकीची तर आहेच, शिवाय ती आपल्याला एकंदरीत नक्कीच हितावह नाही. ही वस्तुस्थिती समजण्यासाठी आपण वाचनाची व्याप्ती तसेच वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ यावर थोडक्यात ऊहापोह करूयात.
हेही वाचा – योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
वाचनाची व्याप्ती
वाचनाची व्याप्ती विशाल असून त्यात प्रामुख्याने पुढील माध्यम / पद्धत / प्रकार यांचा समावेश करता येईल.
- अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तके
- वर्तमानपत्रे
- साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक वाङ्मय
- धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक
- कथा, कादंबरी, कविता, नाटक इत्यादी
- विविध शास्त्रांशी निगडीत
- विषय : कला, क्रीडा, आरोग्य इत्यादी
- माध्यम : छापील लिखाण, डिजिटल लिखाण (मोबाइल, संगणक इत्यादी)
- वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
वाचनातून वाचकाला पुढील मानसिक आरोग्य लाभ प्राप्त होतात
- वाचनामुळे मेंदू सक्रिय राहतो तसेच मेंदूला आणि बुद्धिला चालना मिळून नवनवीन कल्पना सुचतात.
- वाचनातून नवीन गोष्टींचे ज्ञान प्राप्त होते आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते.
- वाचनातून एखाद्या विषयावरील विविध दृष्टिकोन समजल्याने मानसिक क्षमतेचा विकास साधला जातो.
- वाचनातून व्यक्तीच्या विचारांना तथा कृतींना योग्य दिशा मिळते, परिणामी योग्य आचार-विचारांतून मानसिक स्वास्थ्य मिळते.
- वाचनामुळे मनाची एकाग्रता वाढून मानसिक शांती लाभते.
- वाचनातून भावनिक बुद्धिमत्ता प्रगल्भ होण्यास साहाय्य मिळते.
- मानसिक ताणतणाव निवारणार्थ वाचन हा उपयुक्त प्रभावी उपाय आहे.
- थोडक्यात सांगायचे झाल्यास, वाचनातून मानसिक आरोग्य समृद्ध होते आणि पर्यायाने सर्वांगीण विकास प्रक्रियेस हातभार लागतो.
वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ लक्षात घेतल्यास लेखाच्या सुरुवातीला नमूद केलेल्या ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीची महती अधोरेखित होते. आपण वाचनाचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करून दररोज नित्यनेमाने आवर्जून वाचन केले पाहिजे.
माझी ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही तीनही पुस्तके वाचनीय तर आहेतच, शिवाय त्यातील आरोग्य मार्गदर्शन दैनंदिन जीवनात सदैव उपयोगी पडणारे आहे.
आपण पुढील लेखात आरोग्यावर सुपरिणाम करणाऱ्या अशाच एका विषयाबाबत जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


