आज सकाळपासून नानांची गडबड सुरू होती. मुलगा, सुन यांना लेकींना फोन लावून द्यायला सांगितलं होतं. त्यामुळे कधी बोलणे होते, यासाठी उगीचच घरात चकरा मारत होते. तसे तर नाना म्हणजे वय वर्षे 90 पार केलेले आणि आई 80 पार केलेल्या, पण उत्साहात सगळ्यांना मागे टाकणारे. छान भरलेला संसार दोन मुली आणि दोन मुले… सगळ्यांची लग्न झालेली. दोघी मुलींना एक मुलगी आणि एक मुलगा. त्यांची पण लग्न झालेली. मुलांच्या मुलांचे लग्न अजून व्हायचे होते. तर, असा हा नानांचा छान गोतावळा. बाकी बहीण-भाऊ तर नानांचे मस्तच आहेत. काही आहेत काही नाहीत… वयोमानाप्रमाणे दिसत नाही, ऐकू येत नाही. पण सगळे मस्त!
तर असो. अशा या नानांची गडबड होती, ती अधिक महिन्याचे लेक-जावयाला बोलावणे देण्यासाठी. तसे तर, दोन्ही जावई नानांना नेहमी म्हणतात, “किती घेणार तुमच्याकडून? आता नको हे वाणाचे.” पण ऐकतील तर ते नाना कसे!
दोन्ही जावयांकडे सुद्धा लेकी-सुनेला अधिकाचे वाण देण्याची गडबड होतीच; त्यामुळे आपला नंबर लवकर लावावा म्हणून नानांची घाई होती. शेवटी मुलाने मोठ्या जावयांना-लेकीला व्हीडिओ कॅाल लावून दिला. थरथरत्या हाताने नाना फोनवर बोलत होते. तसे तर ते आता वयानुसार हळवे झाले होते, त्यामुळे लेक समोर दिसली अन् नाना आणि आईच्या डोळ्यांत पाणी आले. ऐकू तर कमी येत असल्यामुळे नानांनी अधिकाचे आमंत्रण दिल्यावर पुढे लेक, जावई काय म्हणाले, त्यांना नीट समजले नाही. नाना सांगत होते, “दोघींनी मिळून ठरवा, बरोबरच या म्हणजे छान वाटेल. तुमच्या लेकींना पण घेऊन या, त्यांचे पण इकडेच करू छान सगळेजण एकत्र अधिक महिना साजरा करू.”
सुट्ट्यांचा विचार करता मोठ्या जावयाने “सांगतो नंतर… सुटी कशी मिळते ते बघतो,” असे सांगितले. नंतर मुलाने दुसऱ्या लेकीला फोन लावून दिला, तेथेही तेच उत्तर मिळाले. आता जावई काय सांगतील, याचा विचार करत नाना आणि आई बसले. दोघी सुनासुद्धा, कसे करायचे, याचा विचार करत होत्या. नाना आणि आईंनी परिवार एकत्र छान बांधलेला असल्यामुळे सुना पण घरच्या लेकींची आतुरतेने वाट बघायच्या.
नानांचा अधिकाचे वाण देण्याचा काही मोठा बडेजाव नव्हता. तसं म्हणजे या पिढीकडेच कोणता बडेजाव किंवा दिखाऊपणा करण्याचा गुण नाही. त्यामुळे साधे सोपे स्टिलचे ताट, त्यामध्ये छोटा तांब्याचा दिवा याबरोबर मोठ्या जावयाला म्हैसुरपाक आवडतो म्हणून त्यांच्या ताटात म्हैसुरपाक आणि धाकट्या जावयाला अनारसे आवडतात म्हणून त्यांना अनारसे…
हेही वाचा – आठवणींचे कपाट!
लेकींची ओटी आई प्रेमाने भरायची. सुना पण छान धोंड्याचा स्वयंपाक घरी करायच्या. सगळे असल्यावर कशाला त्रास होतो, असे म्हणायच्या आणि सगळ्याजणी मिळून हसत खेळत धोंड्याचा स्वयंपाक करायच्या. असा छान घरीच कार्यक्रम असायचा. लेक, जावई, नातवंड मुले, सुना अशा सगळ्या गोतावळ्यात नानांना आणि आईंना छान वाटायचे. या आठवणींवर नंतर मजेत दिवस जात. तसे तर, या पिढीला हेच तर हवे असते, बाकी काय!
इकडे मात्र दोन्ही लेकींकडे वेगळीच गडबड होती. दोन्हीकडे लेकीपण माहेरी येणार होत्या आणि सुनांना पण त्यांच्या माहेरी जायचे होते. महिनाभर जरी वेळ असला तरी सगळ्यांच्या कामांच्या वेळांचे गणितच जमत नव्हते. त्यामुळे आधीच गोंधळ होता. त्यात जावयाला काय द्यायचे? प्रश्न होता.
काहीतरी चांदीचे किंवा सोन्याचे वाण द्यायचे तर सध्या किमती किती जास्त आहेत, हा विचार होता. आता नवीन विचारांमुळे सुनेला पण काही तरी घ्यायचे होते. त्यामुळे तो पण विचार चालूच होता. परत कार्यक्रम कुठे करायचा? कोणत्या हॉटेलमध्ये सगळ्यांना घेऊन जायचे? घरी करायचे तर केटरींगचे कोणाला सांगायचे? की बाहेरून आणायचे? एवढ्या सगळ्यांचे घरी करायचे तर मदतीला कोणाला बोलावणार? धोंड्यापेक्षा वेगळा साधा मेन्यू करू आणि दोन दोन धोंडे विकत आणू बापरे किती ती गडबड किती ते प्रश्न? त्यात हा माहेरचा फोन! काय करावे काही सुचेना. आपल्या लग्नाला इतकी वर्षं झाली नाना तसेच आईने आणि आता त्यांच्या सुनांनी आपले अधिकाचे वाण कसे केले असेल, असे दोघींनी वाटत होते.
तसे तर दोन्ही लेकींकडे मुलगा, सून, मुलगी, जावई सगळे छान कमावणारे त्यामुळे कोणाला काय देणार हा प्रश्नच. ते त्यांच्या पैशाने काही ना काही घेतच असतात. सगळेच कमावणारे… आपल्यासारखे नाही नवरा कमावतो आणि आपण घर सांभाळतो… त्यामुळे असा विचार त्या दोघींच्या मनात सारखाच येत होता. इतका पैसा कमावतात पण त्यांच्याकडे नसणारी गोष्ट म्हणजे वेळ.
(दोन पिढ्यांमधील विचारात किती वेगळेपणा होता.)
तेवढ्यात या नानांच्या मुलांचा म्हणजे बहिण-भावांच्या WhatsApp group वर फोन वाजला. नानांच्या मुलाने फोन केलेला होता. नांनांचे मुलगा-सून, मुलगी-जावई एकत्र बोलत होते, काय करायचे ठरवत होते. सगळ्यांनी आपापली कारणे दिली… जावयांनी सुटीची, लेकींनी आम्हीच आधी गोंधळात आहोत तर, हे कसे जमेल याची… ते सर्व मोठ्या मुलाने ऐकून घेतले आणि सांगितले, “बघा मी काय म्हणतो ते ऐकून घ्या… पटले तर तसे करू नाही तर, अजून काही वेगळे सुचते का ते बघू.”
हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!
तो सांगू लागला… “तसं तर अधिकाचे वाण द्यायचे, हे खूप सोपे असते. त्यामुळे वाण काय द्यायचे याचा विचार जास्त करायला नको. त्यापेक्षा तो कार्यक्रम कसा करायचा, याचा विचार करू. आपण जर असे केले की, नाना म्हणतात, तसा एकत्र कार्यक्रम केला तर, त्या दोघांना पण बरे वाटेल. जावई – जावयांचे जावई सगळे घरी येणार म्हटल्यावर किती आनंद होईल दोघांना. वाण तुम्ही तुमच्या जावयांना जे हवे ते आणा. आम्ही काय द्यायचे ते आम्ही आणूच. स्वयंपाकाचे म्हटले तर, घरी स्वयंपाक करायला कोणाला तरी बोलवू, जेणेकरून कोणालाच ताण नको. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे छान सगळ्यांना एकमेकांबरोबर गप्पा मारता येतील. निवांत बोलणे होईल… असेच आपले घर नानांनी आणि आईने बांधले आहे, त्यामुळे जागेची अडचण नाही. छान अधिक साजरा करू!”
भावाने हा पर्याय सांगितला, सुनांनी पण याला हो म्हटले. राहिला प्रश्न दोन्ही लेक, जावयांचा! त्यांनी लेक-जावयाला विचारून सांगतो, असे म्हटले. खरंतर, हा पर्याय छानच होता. पण सगळ्यांना जमेल का? आवडेल का? जावयांच्या घरच्यांना हे पटेल का? असे अनेक प्रश्न होते. मग काय सगळ्यांचे एकमेकांना फोन सुरू झाले. लेकीला फोन करून विचारले गेले. तुम्ही तुमच्या घरी विचारून बघा हे सांगितले. आधी तर, हे कसे शक्य आहे?… असे कुठे असते का?… इकडेच घरी करा ना… एवढी सुटी नाही मिळणार… असे अनेक फाटे पडले.
एकीकडे सगळ्यांनाच नाना आणि आईचा स्वभाव माहीत होता, त्यामुळे त्यांना भेटता येईल, असेही वाटत होते. जावई असो नाही तर, नातजावई, सून असो वा नातसून सगळ्यांनाच नाना आणि आईंना भेटावेसे वाटत होते. बरीच फोनाफोनी झाल्यावर हे नक्की झाले की, नाना आणि आईकडे जाऊनच हा अधिक साजरा करू.
हे सर्व किती दिवस चालले होते. लेकींच्या सुना हे सगळे ऐकत होत्या. विचारात सामील होत होत्या. त्यांनी पण त्यांच्या माहेरी हे सांगितले. जेणेकरून त्यांना त्यांच्या माहेरी केव्हा जायचे, हे ठरवायचे होते. पण झाले वेगळेच त्या सुनांच्या आई-वडिलांनी विचारले “आम्ही पण तिकडे येऊन आमच्या जावयांचे अधिक-वाण दिले तर चालेल का?”
मग काय विचारता सगळ्यांनाच आनंद झाला. आता तर काय सगळीकडे मोठीच गडबड होती ती म्हणजे सगळे भेटल्यावर काय मजा करायची (वाण काय द्यायचे, हा विचारच डोक्यातून गेला होता.) सगळ्यांसाठी एकत्र येणे हाच अधिक आनंदाचा भाग होता. सगळे भेटणार म्हणून सगळेजण काही ना काही ठरवते होते… काय काय प्लॅन करत होते, हे प्रत्येक पिढीचे वेगळेच होते.
मग काय तुम्ही पण येणार का, आमच्या अधिकच्या आनंदात सहभागी व्हायला.


