एकदा न्याहारी करायला ऑफिसमधली मंडळी बसलेली असताना मी एकाला विचारलं, “काय आणलंय रे बाबा डब्यात?”
‘माणिक पैंजण’ आहे म्हणाला. पैंजण रुणझुणले अगदी कानात आणि मी मनात म्हटलं, काहीतरी खास चीज आता पोतडीतून… नाही डब्यातून बाहेर पडणार बहुतेक! माझी आणि इतरांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आणि त्याने डबा उघडला… एकाने डब्यात डोकावून पाहिलं आणि म्हणाला, “अरे, हा तर ‘मनोहरा’! आम्ही त्याला ‘मधुबाला’ पण म्हणतो.”
एक जण म्हणाला, “अरे, हा तर चपातीचा कुस्करा.” मी म्हणालो, “ही तर आमची ‘फोपो’, म्हणजे फोडणीची पोळी.”
दृष्टिहीन माणसांनी, हत्तीचं जसं वेगवेगळ्या पद्धतीनं वर्णन केलं, तसंच एकाच पदार्थाची ही वेगवेगळी संबोधनं ऐकून मी अवाक् झालो.
घरी गेल्यावर बायकोला म्हणालो, “कधीतरी आपल्याकडे ‘माणिक पैंजण’ कर की, सकाळी खायला.”
‘बरा आहेस ना?’ अशा नजरेने बायको बघतच राहिली माझ्याकडे… “अगं म्हणजे, आपली फोडणीची पोळी गं,“ असं म्हटल्यावर जीव भांड्यात पडला तिचा.
एकदा एक जण डब्यात ‘सुशिले’ला घेऊन आला… हे पण काहीतरी नवं होतं माझ्यासाठी. आवडलं खूप, हे नाव पण आणि पदार्थ पण!
घरी आल्यावर बायकोकडे तगादा लावला, “सुशीला कर”, “सुशीला कर म्हणून.”
“काय एकएक नवीननवीन पदार्थ खाऊन येतो रे, मला कामाला लावायला? नसता ताप उगाच… करीन जमेल तेव्हा! शांत रहा जरा. आधीच का कटकटी कमी आहेत? त्यात तुझी ही भुणभुण… पाचवीला पूजलेली माझ्या…” हे उद्गार तर सवयीचे, अंगवळणी पडलेले इतक्या वर्षांच्या सहवासानंतर!
हेही वाचा – शोध कळणाच्या भाकरीचा!
नंतरचे दोन शनिवार, रविवार असेच भाकड गेले. सुशीला स्वप्नातच राहिली माझ्या… अवतरलीच नाही प्रत्यक्षात. मी म्हणालो तिला, “अगं, चुरमुऱ्याचा हा साधासा पदार्थ करून घालायला, किती अंत बघतेस माझा? जरा दयामाया आहे का नाही तुला?”
हा घाव मात्र वर्मी बसला होता… “करूया या शनिवारी,” असं आश्वासन मिळवलंच मी, खनपटीला बसून.
शनिवार उजाडला. भीतभीत, हळूच आठवण करून दिली, आश्वासनाची! “आहे लक्षात माझ्या, चुरमुरे घेऊन ये जाऊन. बाकी जिन्नस आहेत घरात.”
चुरमुरे साधे, का भडंगाचे यावर चर्चा झडली. दोनचार व्हीडिओ बघितले आणि सर्वानुमते साधे चुरमुरे आणायचं मुक्रर झालं. मी लगोलग निघालो, मोहिमेवर… चुरमुरे, चिरमुरे, कुरमुरे का मुरमुरे, हा मला छळत आलेला, अनादी प्रश्न आहे. ‘बालदी’ का ‘बादली’ हा जसा न सुटणारा घोळ, तसाच हा! मी आपला चुरमुरे म्हणत आलोय आणि तेच म्हणत राहीन आजन्म.
पूर्वी हे चुरमुरे ज्याच्याकडे मिळायचे त्याला ‘भडभुंजा’ म्हणायचे. हल्ली हा शब्द, आणि ही अशी दुकानं पण नामशेष झालीत. नाही म्हणायला, कल्याणला टिळक चौकात, एक तत्सम दुकान अजूनही तग धरून आहे… आमच्या वाण्याकडे, प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेले चुरमरे होते. भली मोठी पिशवी होती अगदी. मी घेतली ती आणि आलो मिरवीत घरी. ती पोत्यासारखी दिसणारी चुरमुऱ्याची पिशवी बघताच बायकोचा फ्यूज उडाला…
“गोडबोल्यांच्या सात पिढ्या खातील यात,” असं म्हणत माझ्या व्यवहारज्ञानाच्या चिंधड्या उडवल्या तिने आणि माझी दातखीळच बसली. ‘दे रे वाणी, घे रे प्राणी’ ही म्हण तंतोतंत लागू आहे तुला,” हे ऐकतच माझ्या शनिवारची सुखद सुरुवात झाली.
“आणा इकडे,” म्हणत त्या पोत्याचा ताबा घेतला गेला आणि आवश्यकतेएवढे चुरमुरे काढून घेतल्यावर, उरलेला ऐवज बघून तिच्या बोलण्याची सत्यता कळली मला. “जाऊदे, भेळ वगैरे करून संपवू आता,” असं म्हणून तह झाल्यावर, मी निवांत झालो.
मग चुरमुरे चाळणीत घेतले… वाहत्या पाण्यात, गिचका न होईल अशा बेताने भिजवून घेतले आणि मग आपण पोहे करतो तीच पद्धत वापरून फोडणीस टाकले… सढळ हाताने डाळं आणि शेंगदाणेही घातले, मला आवडतात म्हणून! या ‘सुशिले’ला मग खोबरं आणि कोथिंबीर घालून मस्त सजवली आणि ती आमच्या खाद्यदरबारात पेश केली गेली.
हेही वाचा – कोंड्याचा मांडा… लेकीने खास बाबासाठी केलेला!
पहिलाच घास… बायकोची उत्सुकता, ती शमवणारी माझी उत्स्फूर्त दाद… आणि आणखी एक बशीभर सुशीला पोटात गेल्यावरच माझा आत्मा तृप्त झाला! बायकोची मिनतवारी करून तोंडी लागलेली सुशीला, मनात अगदी घर करून बसली.
“बरं झालं हो, एक छान पदार्थ सापडला न्याहारीला” म्हणत, मलाही पोचपावती मिळाली आणि माझा शनिवार सत्कारणी लागला. कोकणात नाही, पण मराठवाडा आणि सोलापूर वगैरे भागात अगदी सर्रास होणारा हा पदार्थ नावाप्रमाणेच अगदी ‘सुशील’ वाटला मला. बघा तुम्ही सुद्धा खाऊन एकदा. नक्की आवडेल, खात्री आहे मला!


