सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
तुज महामूर्तीचां आंगी । उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी । लेइलासी वानें परींचीं आंगीं । ऐसा आवडतु आहासी ॥283॥ नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवेली । तुझां स्वरूपमहाचळीं । दिव्यालंकार फुलीं फळीं । सासिन्नलिया ॥284॥ हो कां जे महोदधी तूं देवा । जाहलासि तरंगीं मूर्ती हेलावा । कीं तूं वृक्षु एक बरवा । मूर्तिफळीं फळलासी ॥285॥ जी भूतीं भूतळ मांडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें । तैसें मूर्तिमय भरलें । तुझें देखतसें रूप ॥286॥ जी एकेकीचां अंगप्रांतीं । होय जाय हें त्रिजगतीं । एवढियाही तुझां आंगीं मूर्ती । कीं रोमां जालिया ॥287॥ ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तूं कवण पां एथ कैचा । हें पाहिलें तंव आमुचा । सारथी तोचि तूं ॥288॥ तरी मज पाहता मुकुंदा । तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा । भक्तानुग्रहें तया मुग्धा । रूपातें धरिसी ॥289॥ कैसें चहूं भुजांचें सांवळें । पाहतां वोल्हावती मन डोळे । खेंव देऊं जाइजे तरि आकळे । दोहींचि बाहीं ॥290॥ ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी विश्वरूपा । कीं अमुचियाचि दिठी सलेपा । जे सामान्यत्वें देखती ॥291॥ तरी आतां दिठीचा विटाळु गेला । तुवां सहजें दिव्यचक्षू केला । म्हणोनि यथारूपें देखवला । महिमा तुझा ॥292॥ परि मकरतुंडामागिलेकडे । होतासि तोचि तूं एवढें । रूप जाहलासि हें फुडें । वोळखिलें मियां ॥293॥
किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् । पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥17॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जी सत्यलोकु तुजमाजीं आहे, देखिला चतुराननु हा नोहे
अर्थ
तू जो विश्वरूप, त्या तुझ्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटल्या आहेत. म्हणून नाना प्रकारची वस्त्रे अंगावर तू धारण केली आहेस, असे वाटते. ॥283॥ अथवा दिव्य अलंकार रूप फळाफुलांनी अगदी दाट भरून आलेल्या अशा या अनेक प्रकारच्या मूर्तिरूप वृक्षवेली, तुझ्या या विश्वरूप महापर्वतावर उत्पन्न झालेल्या आहेत. ॥284॥ अथवा हे परमेश्वरा, (तुझ्या स्वरूपावर दिसणारा) मूर्तिरूपी लाटांनी उसळणारा असा तू मोठा समुद्र आहेस किंवा तू एक चांगला वृक्ष असून मूर्तिरूपी फळांनी फळभारास आला आहेस. ॥285॥ महाराज, प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे, किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले आहे, त्याप्रमाणे तुझे स्वरूप मूर्तींनी भरलेले आहे, असे मी पाहातो. ॥286॥ महाराज, एका एका मूर्तीच्या अंगप्रदेशात हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे आणि लयाला जात आहे. अशा प्रचंड मूर्ती असूनही त्या तुझ्या (विश्वरूपाच्या) शरीराच्या रोमांच्या ठिकाणी झाल्या आहेत. ॥287॥ असा विश्वाचा पसारा मांडून तेथे तू कोण? कसा? असा विचार करून पाहिले, तर आमचा जो सारथी, तोच तू आहेस. ॥288॥ तर श्रीकृष्णा, विचार करून पाहिले तरी मला असे वाटते की, तू नेहेमी असाच व्यापक स्वरूपाने असतोस, पण भक्तावर कृपा करण्याकरिता तू सुंदर सगुण अवतार घेतोस. ॥289॥ (तुझे) श्यामसुंदर चतुर्भुज रूप कसे आहे की, ज्याला पाहिले असता मन आणि डोळे शांत होतात आणि आलिंगन द्यावयास लागले तर, दोन्ही हातांमध्ये कवटाळले जाते! ॥290॥ हे विश्वरूपा देवा, तुम्ही भक्तांवर कृपा करून असे सुंदर रूप बनता, परंतु आमच्याच दृष्टी मलीन आहेत, म्हणून त्या तुमच्या सगुण मूर्तीला सामान्यत्वाने पाहातात, ॥291॥ तर आता तो दृष्टीचा दोष दूर झाला. (कारण) तू लीलेन मला ज्ञानदृष्टिवान बनवलेस आणि म्हणूनच तुझा मोठेपणा जसा आहे, तसा मी पाहू शकलो. ॥292॥ परंतु मकरतुंडाच्या मागल्या बाजूला जो तू बसलेला होतास, तोच तू एवढे विश्वरूप बनला आहेस, हे मी पक्के जाणले. ॥293॥
मुकुट, गदा आणि (सुदर्शन) चक्र धारण करणारा, तेजाची राशी, ज्याचे तेज सर्वत्र पसरले आहे, ज्याच्याकडे एकसारखे पाहणे (देखील) अशक्य आहे, असा दीप्तिमान् अग्नी आणि सूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा सर्वत्र (पसरलेली) आहे, असा आणि अमर्याद अशा तुला मी पाहात आहे. ॥17॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तुझें रूप वय कैसें, तुजपैलीकडे काय असे


