दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 02 मे 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 12 वैशाख शके 1948; तिथि : प्रतिपदा 24:49; नक्षत्र : विशाखा अहोरात्र;
- योग : व्यतिपात 21:44; करण : बालव 11:49;
- सूर्य : मेष; चंद्र : तुळ 24:29; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:00;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
नारद जयंती
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट-दिग्दर्शक सत्यजित रे
टीम अवांतर
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट-दिग्दर्शक सत्यजित रे यांचा जन्म 2 मे 1921 रोजी कलकत्ता येथे झाला. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, कलेच्या ओढीमुळे 1940 साली ते रवींद्रनाथ टागोरांच्या प्रेरणेने शांतिनिकेतनमध्ये दाखल झाले. नंदलाल बोस यांच्यासारख्या चित्रकार-कलातज्ज्ञाचे तिथे मार्गदर्शन लाभल्यामुळे रे यांची अंगभूत कलासक्ती आणि सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होत गेली. 1943च्या सुरुवातीला ‘डी. जे. केमर अँड कंपनी’ या ब्रिटिश जाहिरात संस्थेत त्यांची वाणिज्य कलाकार म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी ते अनेक नियतकालिकांतून चित्रपटविषयक लेख लिहीत असत. 1947मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ ही संस्था सुरू केली.
मात्र स्वतःचा चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली, ती मुख्यत्वे व्हित्तोरिओ डी’सिका या दिग्दर्शकाच्या द बायसिकल थिव्ह्ज या चित्रपटामुळे. बिभूतिभूषण बंदोपाध्याय या सुप्रसिद्ध लेखकाच्या ‘पथेर पांचाली’ या कथेने त्यांच्या मनात घर केले होते. त्याच कथेवर चित्रपट काढावा, असे त्यांनी ठरविले. पथेर पांचाली हा चित्रपट पहिल्यांदा न्यूयॉर्कला आणि नंतर भारतात प्रदर्शित झाला. आपल्या पहिल्याच चित्रपटामुळे रे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाले. पुढे त्यांनी अपराजितो आणि अपूर संसार हे आणखी दोन चित्रपट निर्माण केले. त्यांच्या पहिल्या सहा चित्रपटांना पंडित रविशंकर, विलायतखाँ, अली अकबर खाँ असे नामवंत संगीतदिग्दर्शक लाभले होते. नंतरच्या सर्व चित्रपटांना मात्र स्वतःच उत्तम जाणकार असलेल्या सत्यजित रे यांनीच संगीत दिले.
हेही वाचा – कॉन्फरन्स रूममध्ये ‘ती’ व्यक्ती पाहून आराध्याचा श्वासच अडखळला
1955 ते 1985 या तीन दशकांत रे यांनी पंचवीस चित्रपट आणि काही अनुबोधपट निर्माण केले. सत्यजित रे हे चतुरस्त्र प्रतिभेचे कलावंत होत. साहित्य, चित्रकला, संगीत, रेखन, छायाचित्रण अशा विविध कलाक्षेत्रांत त्यांनी आपले कौशल्य दाखविले. चित्रपटाप्रमाणेच साहित्याचीही उत्कृष्ट जाण असल्याने संदेश या नियतकालिकाचे पुनरुज्जीवन करून त्यांनी आपले आजोबा आणि वडील यांचा साहित्यिक वारसा पुढे चालू ठेवला. तसेच त्यांनी स्वतःही विपुल कथावाङ्मय निर्माण केले. त्यांचे ‘अवर फिल्म्स देअर फिल्म्स’ हे पुस्तकही चित्रपटसमीक्षेत मोलाची भर घालणारे आहे.
रे यांनी 1959 पासून आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाचे ज्युरी म्हणून काम केले. त्यांना अनेक मानसन्मान लाभले आहेत. त्यात रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ‘ब्रिटिश फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्’तर्फे गेल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून सन्मान, ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाची डॉक्टरेट ही पदवी, भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ हा नागरी सन्मान, तसेच दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय फ्रान्सतर्फे ‘लीजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च बहुमानाचा किताब राय यांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मीत्तरां यांच्या हस्ते कलकत्ता येथे देण्यात आला. 1992 मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार आणि ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. जाखान चोटो चिल्लम या नावाने बंगाली भाषेमध्ये त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. 23 एप्रिल 1992 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. एखाद्या जुन्या कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडतील. करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात, पण घाई करू नका. नीट विचार करून मगच निर्णय घ्या. आर्थिक स्थिती स्थिर राहील. आरोग्यही चांगले असेल.
वृषभ – आजचा दिवस संतुलित असेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांकडून तुमची प्रशंसाही होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्च टाळा. आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. अतिविचार करणे टाळा, नाहीतर मानसिक आरोग्यावर परिणाम होईल.
मिथुन – आज, तुमच्या निर्णयांचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. मन थोडे अस्थिर असण्याची शक्यता आहे, मात्र कुटुंबाचा आणि जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला सावरण्यास मदत करेल. आहारात बदल करा, संतुलित आहार घ्या.
कर्क – आजचा दिवस व्यग्र राहण्याचा असू शकतो. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही सर्व काही व्यवस्थितपणे हाताळाल. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका, आराम करण्यासाठी वेळ काढा. प्रत्येक गोष्टीसंबंधी जास्त विचार करण्याची सवय सोडून द्या.
सिंह – आज प्रगतीच्या संधी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. कोणतेही नवीन नियोजन यशस्वी होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून देखील भक्कम पाठिंबा मिळेल. कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडतील. त्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. तथापि, रागावर आणि बोलण्यावर ताबा ठेवा, कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या.
कन्या – आज सगळे लक्ष कामावर असेल. मेहनतीचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कौटुंबिक नात्यांमध्ये किरकोळ गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, तथापि, चर्चेद्वारे ते सहजपणे सोडवले जाऊ शकतात. आरोग्य सामान्य राहील. आज जोडीदाराला फिरायला घेऊन जा. खाण्याच्या सवयी सुधारा, ऋतुनुसार हलका आहार घ्या.
तुळ – आज सावधगिरीने पावले उचलण्याचा दिवस आहे. सध्या कोणतेही मोठे निर्णय पुढे ढकलणे उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी थोडा तणाव जाणवू शकतो, पण संयम ठेवा. नातेसंबंधांमध्ये तारतम्य बाळगा. प्रत्येक गोष्टीचे टेन्शन घेण्याची सवय सोडून द्या. गरज पडल्यास प्राणायाम करा.
वृश्चिक – खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबात काही तणाव निर्माण होऊ शकतो, परंतु समजूतदारपणाने परिस्थिती हाताळल्यास तणाव निवळायला मदत होईल. करिअरची नवीन संधी निर्माण होऊ शकते, ती हातची जाऊ देऊ नका. आज घेतलेला एक योग्य निर्णय तुमच्या भविष्याला नवी दिशा देऊ शकतो.
हेही वाचा – आश्वस्त करणारी मिठी
धनु – आजचा दिवस सामान्य असेल. कामाची गती थोडी मंद असू शकते, पण दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखा. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा राखणे आवश्यक असेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधाल, ज्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होतील.
मकर – आजचा दिवस सकारात्मक असेल. एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यावसायिक जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळतील. इतरांच्या बोलण्यानुसार तुमचे निर्णय बदलू नका. कुटुंबात शांतता आणि आनंदी वातावरण राहील.
कुंभ – आज थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. कामातील घाईमुळे नुकसान होऊ शकते. नात्यांमध्ये संयम ठेवा. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. प्रवासात बाहेरचे पदार्थ खाणे टाळा, अन्यथा त्रास होऊ शकतो. मानसिक आरोग्यासाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल.
मीन – आजचा दिवस शुभ संकेत घेऊन येईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंबंधीची कागदपत्रे नीट तपासून घ्या. एकंदरीत, आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा आहे.


