उन्हाळ्यात अंगाची काहिली करणारा उष्मा सहन करावा लागत असला तरी, या ऋतुची वाट पाहण्यासारखी जर काही एक गोष्ट असेल, तर ती म्हणजे ‘आंबा’! कच्चा आणि पिकलेला, या दोन्ही आंब्यांची माझ्या घरात खूप आतुरतेने वाट पाहिली जाते. बाजारात सर्वात आधी येतो तो म्हणजे कच्चा आंबा म्हणजेच कैरी. कैरीचा मंद सुगंध आणि जिभेवर रेंगाळणारी तिची आंबट-गोड चव. कैरी म्हणजे केवळ एक फळ नाही, तर ती आपल्या भारतीय संस्कृतीतील ऋतुचक्राची एक महत्त्वाची खूण आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात कैरीचे पन्हे, तक्कू किंवा आंबे डाळ बनवून उन्हाळ्याचे स्वागत केले जाते. यापासून चटण्या, लोणची, सरबते तयार केली जातात.
पण तुम्हाला माहीत आहे का की, कैरीचा हा प्रवास केवळ आपल्या घरापुरता मर्यादित नाही? भारताच्या कानाकोपऱ्यात कैरीचा वापर तेथील स्थानिक मसाल्यांसोबत एकरूप झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये एक खास बंगाली आंबट डाळ बनवली जाते, जिला ‘टोकेर दाल (Toker Dal) किंवा ‘काचा आम डाळ’ (Kacha Aam Dal) असे म्हणतात.
येथे या नावाचा थोडा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. बंगाली भाषेत ‘टो’ (Tok) म्हणजे ‘आंबट’. त्यामुळे ‘टोकेर दाल’ म्हणजे ‘आंबट डाळ’. ही आंबट चव कच्च्या आंब्यामुळे (कैरी) येते. भारतातील उन्हाळ्यात प्रत्येक बंगाली घरात बनणाऱ्या डाळींच्या विविध रेसिपींपैकी ही कच्च्या आंब्याची रेसिपी एक मुख्य पदार्थ (staple) आहे. त्याचबरोबर आम पोरा शरबतही बनवलं जातं. कैरी भाजून बनवलेले ‘आम पोरा शरबत’ म्हणजे उन्हाळ्यातील अस्सल ‘स्मोकी’ फ्लेवरचा खजिना! पुदिना आणि काळ्या मिठासोबत हे सरबत शरीराला कमालीचा थंडावा देते.
हेही वाचा – Recipe : मोड आलेल्या मेथीदाण्यांचे रुचकर लोणचे!
तोक डाल
ही कैरी घालून केलेली हलकी आणि पचायला सोपी मुगाची किंवा मसूरची डाळ आहे. याशिवाय वाटाणा किंवा हरभऱ्याची डाळ देखील टोकेर डाळीकरता वापरली जाते.
साहित्य
- मुगाची डाळ – अर्धी वाटी
- कैरी – एक मध्यम आकाराची (लांब फोडी)
- मोहरी – 1 टी स्पून
- सुकी लाल मिरची – 1
- हळद – 1 चमचा
- मीठ – चवीनुसार
- मोहरीचे तेल – फोडणीसाठी
कृती
- मुगाची डाळ हळद घालून शिजवून घ्या.
- एका कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात मोहरी आणि लाल मिरचीची फोडणी द्या. त्यात कैरीच्या फोडी परतून घ्या.
- आता शिजवलेली डाळ एका भांड्यात घेऊन त्यात कैरीच्या फोडींचे मिश्रण घालून एकत्र करा.
- त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यात पाणी घाला आणि ती डाळ उकळवा. (हवी असल्यास थोडी साखर घालू शकता).
हेही वाचा – Recipe : मिसळीचे वरण अर्थात मिश्र डाळींचे वरण
आम पोरा शरबत
साहित्य
- कैरी – एक मोठी
- पुदिना – 12 ते 15 पाने
- भाजलेली जिरे पूड – एक लहान चमचा
- काळे मीठ – चवीनुसार
- साखर- चवीनुसार
कृती
- कैरी गॅसवर किंवा कोळशावर काळपट होईपर्यंत भाजून घ्या.
- थंड झाल्यावर तिचे साल काढून गर बाजूला करा.
- या गरात पुदिना, जिरे पूड, मीठ आणि साखर घालून ते एकत्र करा आणि मिक्सरला फिरवा.
- हे मिश्रण पाण्यात मिसळून थंडगार सर्व्ह करा.
- भाजलेल्या कैरीचा ‘स्मोकी’ फ्लेवर खूप छान लागतो.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


