Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026

    Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें

    April 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!
    ललित

    एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!

    मधुर सुनील कुलकर्णीBy मधुर सुनील कुलकर्णीApril 25, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, गौरी आदिनाथ प्रेमकथा, मराठी प्रेमकथा, आदिनाथ जोसेफ प्रेमकथा, गौरीचे कौन्सिलिंग करिअर, कोपिष्ट नाना, जमदग्नी नाना, आदिनाथचे आईवडील, आदिनाथ गौरी क्लासमेट, आदिनाथ गौरी प्रेमकहाणी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    कॉलेज सुरू होऊन आठच दिवस झाले होते. शेवटचं सायकॉलॉजीचं लेक्चर सुरू होतं. गौरी अगदी तल्लीन होऊन सरांचं लेक्चर ऐकत होती.

    “मे आय कम इन सर?” हे ऐकल्यावर सगळ्यांचीच नजर क्लासच्या दाराकडे गेली. इतकं सुंदर लेक्चर मधेच बंद पडलं म्हणून गौरी जरा चिडलीच. तो मुलगा गौरीच्याच बाजूला येऊन बसला. एक मंद सुगंधाची झुळूक आली. गौरीने त्याच्याकडे बघितलं आणि त्यानेही बघितलं. नजरानजर झाली आणि गौरीने मान खाली घातली. सर इतकं सुंदर शिकवत होते की, मंत्रमुग्ध होऊन सगळे विद्यार्थी ऐकत होते. लेक्चर कधी संपलं, कळलंच नाही.

    क्लासरूमच्या बाहेर आल्यावर त्या मुलाने गौरीला गाठलं, “माफ करा, मी जरा उशिरा कॉलेज जॉइन केलं आहे. तुमच्या नोट्स मिळतील का?”

    अख्ख्या क्लासमध्ये याला मीच सापडली का नोट्स मागायला? गौरी जरा वैतागलीच.

    “मी तुमच्याकडेच नोट्स का मागतो आहे, हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे पण तुमच्या बाजूला मघाशी बसलो आणि तुम्ही सिन्सीअर वाटला. यु मस्ट हॅव रिटन ऑल द पॉइंट्स.”

    “मी जरा घाईत आहे. उद्या बोलू.”

    “ओके, नो प्रॉब्लेम. मी आदिनाथ जोसेफ.”

    गौरीने चमकून त्याच्याकडे बघितलं. हे कसलं विचित्र नाव! याच्यापासून चार हात लांबच रहायला हवं. गौरी त्याला बाय करून तिथून चालती झाली.

    कॉलेजमधून परतल्यावर गौरीने घरात पाऊल ठेवलं आणि नानांनी तिला विचारलं,  “गौरी, नवचंडी यज्ञाची यादी शौनकजवळ दिली होतीस का? अजून तो आला नाही. उद्या आपट्यांकडे यज्ञ आहे. सामान सगळं तयार हवं.”

    हेही वाचा – पुरस्कार… एक नवा हुरूप देणारा!

    “हो नाना, तुम्ही सकाळी देवळात गेला होता, तेव्हा शौनक आला होता. त्याच्याजवळ मी यादी दिली आहे.” गौरीने घाबरतच उत्तर दिले.

    “मला सांगून का गेली नाहीस?”

    “नाना, आईला सांगून गेले होते. मला कॉलेजला उशीर झाला होता आणि तुम्ही घरी नव्हता.”

    “एखादं काम तुला सोपवल्यावर, ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे ना?”

    नानांचे ते शब्द ऐकले आणि गौरी काही न बोलता आत गेली.

    “गौरी, शौनक येऊन गेला हे मी नानांना सांगायला विसरले बघ!” शैला गौरीकडे बघून म्हणाली.

    गौरीने आईकडे फक्त कटाक्ष टाकला आणि तिच्या खोलीत गेली. पर्स टेबलवर फेकली आणि कॉटवर डोळ्यावर हात ठेवून आडवी झाली. हुंदका गळ्यापर्यंत आला, तो तिने आवरला. सगळं मनात साठवलेलं डोळ्यातून पाझरायला लागलं..

    0000

    तिला समजायला लागल्यापासून नानांचा कडक स्वभाव ती अनुभवत होती. त्यांच्या या स्वभावाला आजी आणि आई खतपाणी घालत गेल्या. मी म्हणेन ती पूर्व दिशा हा स्वभाव होत गेला. एकदा तर रात्रीच्या जेवणाची वेळ टळून गेली म्हणून आईला वाटेल तसे बोलले. त्यावेळी गौरी दहावीत होती. तिला असह्य झालं. ती चिडून नानांना म्हणाली, “नाना,एक दिवस उशीर झाला तर काय झालं? आज आईचं डोकं दुखत होतं म्हणून ती जरा वेळ झोपली होती.”

    “मला दुरुत्तर करायची तुझी हिम्मत कशी झाली गौरी? आणि आईला बरं नव्हतं तर तू स्वयंपाक करायचा होता.”

    “अहो, तिची परीक्षा महिन्यावर आली आहे. दहावीची परीक्षा आहे. त्याचा अभ्यास किती असतो.”

    “ही कारणं मला सांगू नका. शिक्षण बंद करून टाकेन.” नानांचे हे बोलणे ऐकले आणि गौरी खोलीत जाऊन हुंदके देऊ लागली.”

    “रडू नकोस बाळा! तो असाच आहे तापट!” गौरीच्या पाठीवरून आजी हात फिरवत होती.

    “असाच आहे म्हणजे काय ग आजी? तू कधी रागावली नाहीस का नानांना या बाबतीत? सतत घरात तणाव! मला हल्ली घरी यावसंच वाटत नाही. माझ्या मैत्रिणींकडे किती खेळकर वातावरण असतं.”

    “काय बोलणार गं? तो दोन वर्षांचा असताना तुझे आजोबा गेले. मी फक्त मॅट्रिक झाले होते. शिवणकाम सुरू केलं. नाना अतिशय बुद्धिमान पण पैशांअभावी त्याला डॉक्टर किंवा इंजिनीअर होता आलं नाही. साताऱ्याला जाऊन पौराहित्याचे शिक्षण घेतले आणि हळूहळू जम बसला. आज पुण्यात त्याच्यासाठी लोकं थांबतात. त्याला वेळ असेल तेव्हा पूजा, यज्ञ, सत्यनारायण करतात. त्या क्षेत्रात त्याला फार मान आहे. अगदी लहान वयात परिस्थितीचे चटके खाल्ल्यामुळे, स्वकर्तृत्वामुळे थोडा तापट, आग्रही झाला आहे.”

    “पण त्याची झळ आपल्याला पोहोचते आहे.”

    “निवळेल गं तो काही दिवसांनी!” आजी गौरीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

    पण नानांचा संतापी स्वभाव कमी झालाच नाही. आजी गेली तेव्हा नाना लहान मुलासारखे रडले. नाना इतके हळवे पण आहेत, हे गौरीला त्या दिवशी कळलं. मुलींच्या बाबतीत त्यांची मत जुनीच होती. गौरीला या काळातही खूप बंधनं होती. आधुनिक कपडे घालायची गौरीला परवानगी नव्हती. शाळा, कॉलेजदेखील महिलांचेच होते. मात्र, पोस्ट ग्रॅज्युएशनला गौरीला पर्याय नव्हता. एरवी क्वचित कधीतरी कुठल्या मुलाशी बोललेली गौरी या कॉलेजमध्ये, तेव्हा जरा बावरली होती. तिचा सायकॉलॉजी हा अतिशय आवडीचा विषय होता. तिला कौन्सिलिंगमध्ये करिअर करायचं होतं. नानांना मनासारखं शिकता आलं नाही, पण त्यांनी गौरीला तिच्या शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन दिलं.

    0000

    कॉलेजच्या पहिल्या दिवशी मुलांच्या घोळक्यात मुलींना मोकळेपणाने गप्पा मारताना बघून गौरीला कुतूहल वाटलं. आठवडाभरात ती देखील कॉलेजमध्ये छान रुळली.

    दुसऱ्या दिवशी देखील आदिनाथ क्लासमध्ये गौरीच्याच बाजूला बसला. गौरीचं लेक्चरमध्ये अजिबात लक्ष लागत नव्हतं. कसलीतरी भीती वाटत होती. कॉलेज संपल्यावर गौरी घरी जाताना आदिनाथने तिला मेन गेटजवळ गाठलं, “गौरी थांब!”

    मला गौरी म्हणण्याइतकी याची मजल गेलीच कशी? गौरीने रागाने त्याच्याकडे बघितलं.

    “सॉरी, तुला बहुतेक आवडलेलं दिसत नाही. पण मला प्रत्येकाला नावाने हाक मारायला आवडतं. एक छान नातं तयार होतं. मोकळं, संवादयुक्त! परकेपणा सगळा निघून जातो. तुझं नाव गौरी आहे, हे मला कळणं फारसं अवघड नाही. तुला जरा वेळ आहे?”

    “काय काम होतं?”

    “काही काम असेल तरच आपण बोलायचं का?” आदिनाथ हसत म्हणाला.

    “तसं नाही पण मला घरी जायचं आहे.”

    “घरी तर मला देखील जायचं आहे. आपण कॉलेज कँटीनमध्ये बसूया का थोडा वेळ?”

    गौरीने आदिनाथकडे बघितलं. त्याच्या पिंगट डोळ्यातलं आर्जव तिला त्याच्याकडे खेचत होतं. तिने नकळत मान डोलावली. कँटीनमध्ये आदिनाथ बोलत होता आणि गौरी फक्त ऐकत होती. त्याचा सावळा रंग, त्याचे सरळ केस, त्याची देहयष्टी, त्याचे पिंगट डोळे एका तरुण मुलीला भुरळ पाडेल असेच होते.

    “गौरी, मीच बोलतोय. तू बोल न काहीतरी!”

    “आयुष्यात पहिल्यांदा हॉटेलमध्ये एका तरुण मुलाबरोबर आले आहे. सुचत नाहीये, काय बोलावं!”

    आदिनाथला गौरीचं हे साधं रूपच खूप आवडलं होतं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी क्लासमध्ये इतक्या सुंदर मुली असताना, त्याला गौरीच्याच शेजारी बसावंस वाटलं होतं.

    “ओके, आपण उद्या बोलू. नो प्रॉब्लेम!”

    “आदिनाथ, एकच विचारायचं होतं.”

    “मग विचार की!”

    “तुझं नाव आदिनाथ जोसेफ! जरा वेगळं वाटलं.”

    “माझी ममा मराठी आणि डॅड ख्रिश्चन! शेजारी राहायचे. एकमेकांवर जीव जडला, लग्न केलं. दोघांनीही आपल्या धर्माचा आदर केला. माझं आडनाव जोसेफ हे असणार म्हटल्यावर डॅड ममाला म्हणाले, नाव तुझ्या आवडीचं मराठी ठेव. आमच्या घरी आम्ही दिवाळी आणि ख्रिसमस दोन्हीही साजरे करतो. पुण्यातच जन्म, शिक्षण झाल्यामुळे डॅड उत्तम मराठी बोलतात.”

    “दोघांच्या घरून विरोध नाही झाला का?”

    “झाला की! पण ममा आणि डॅड त्यांच्या निर्णयावर ठाम होते. रजिस्टर लग्न केलं आणि संसार यशस्वी करून दाखवला.”

    आदिनाथचं बोलणं गौरी मनात साठवून घेत होती. लहानपणापासून जुन्या वातावरणात वाढलेल्या गौरीला हे सगळं नवल वाटत होतं. आदिनाथबरोबर गप्पांमध्ये ती इतकी रंगली की, वेळेचं भानच राहिलं नाही. त्याच्याशी खूप वर्षांची ओळख आहे असं वाटलं.

    रोज कॉलेज सुटल्यावर गौरी थांबून आदिनाथशी बोलायला लागली. तिला तो आवडायला लागला होता. तारुण्यसुलभ भावना अनावर होत होत्या. त्याच्या सहवासात सतत राहावंसं वाटू लागलं. एक दिवस आदिनाथ त्याच्या घरी गौरीला घेऊन गेला. त्याच्या घरचं मोकळं वातावरण बघून तिला नानांचा स्वभाव आठवला. सतत दडपणाखाली असलेलं घरचं वातावरण आठवलं.

    गौरीला बघितल्यावर आदिनाथच्या डॅडने विचारलं, “आदि, नक्की मैत्रीणच ना? की अजून काही? तसं असेल तर स्पष्ट सांग. मला सून आवडली.”

    ते ऐकून गौरी कावरीबावरी झाली.

    “डॅड, तिची चेष्टा करू नका. ती घाबरट ससा आहे. उड्या मारत पळून जाईल.” आदिनाथ हसत म्हणाला.

    “तुम्ही दोघेही तिला त्रास देऊ नका. गौरी, तू आत ये. मी मस्त सँडविच केले आहेत, त्याबरोबर कॉफी घेऊ.” आदिनाथची ममा तिला किचनमध्ये घेऊन गेली. आदिनाथकडे तीन तास गौरी फक्त हसत होती. इतकं हलकं आजपर्यंत कधीच वाटलं नव्हतं.

    आदिनाथने गौरीला घरी सोडलं. तिने गेट उघडलं आणि आदिनाथने गौरीचा हात धरला. “गौरी, डॅडने आज तुझी गम्मत केली, ती तू मनावर घेतली नाहीस ना?”

    “नाही,” गौरी खाली मान घालून बोलली.

    “का नाही घेतली? मला तुझ्याशी लग्न करायचं आहे गौरी! आय लव्ह यु…”

    गौरी घाबरली. तिने आजूबाजूला कोणी आहे का, ते बघितलं.

    “आदि, मी जाते. माझ्या मनात तसं काहीही नाही,” गौरी धावतच घराकडे गेली. दार ठोठावले आणि आत आली तर नाना समोर उभे! “इतका वेळ कुठे होतीस? कॉलेज तर पाच वाजताच संपतं.”

    “मैत्रिणीकडे नोट्स काढत होते.”

    गौरी त्या दिवशी खोटं बोलली, पण आदिनाथचं आकर्षण तिला अस्वस्थ करत होतं. त्याच्याशी आपलं लग्न होणं अशक्य आहे, हे तिला ठाऊक होतं. पण ती स्वतःला आवरू शकत नव्हती.

    एक दिवस डोळ्यांत पाणी आणून ती आदिनाथला म्हणाली “आदि, आपल्या नात्याला काही अर्थ आहे का रे?”

    “का नाही? तू मला हवी आहेस, माझा सहवास तुला हवा आहे, आपलं नातं घट्ट असल्याशिवाय हे शक्य नाही गौरी!”

    “अरे पण हे अधांतरी वाटतंय. याचा शेवट काय होणार मला माहिती नाही.”

    “शेवट चांगलाच होणार.”

    हेही वाचा – एक थी बुलबुल…

    “तू नानांना ओळखत नाहीस. माझ्यासाठी हे इतकं सोपं नाहीये.”

    “गौरी, आपलं कुणावर तरी जीवापाड प्रेम आहे, त्या व्यक्तिशिवाय आयुष्य व्यर्थ वाटतं, ही भावनाच किती सुखद आहे… आणि खरं प्रेम असेल तर अडथळे पार करण्यात मजा आहे.”

    “माझं तुझ्यावर खरं प्रेम नाही, असं म्हणायचं आहे का तुला?”

    “त्याशिवाय का तू इथे आत्ता माझ्याजवळ आहेस?”

    गौरीने आदिनाथकडे बघितलं. त्याच्या नजरेतलं तिच्याबद्दलचं प्रेम, आकर्षण बघून ती विरघळून गेली. त्याच्या कुशीत शिरत म्हणाली,

    “भीती वाटतेय, तू माझा होशील की नाही?”

    “एका सायकॉलॉजीच्या विद्यार्थिनीने हे बोलावं? गौरी, तूच स्वतः भित्री असलीस तर तू लोकांची भीती कशी घालवशील? कौन्सिलिंग कसं करशील?”

    “मी नानांना फार घाबरते आदि!”

    “ही मनातली भीती दूर कर, ती आपल्या दोघांना एकत्र येऊ देणार नाही… आणि एक लक्षात ठेव, मी तुझाच आहे आणि तुझाच राहणार.” आदिनाथने गौरीच्या कपाळावर ओठ टेकले.

    क्रमश:
    Avatar photo
    मधुर सुनील कुलकर्णी

    M A (इंग्लिश) असून पुण्याला वास्तव्य आहे. पाच वर्षांपूर्वी कथालेखनास प्रारंभ केला. त्याआधी अनेक कविता केल्या आहेत. आत्तापर्यंत 60 कथांचे लेखन! 'सिद्धी' हा पहिला कथासंग्रह एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झाला. दुसरा कथासंग्रह 'भक्ती!' नोव्हेंबर 2025मध्ये प्रकाशित झाला आहे. 'सिद्धी' या कथासंग्रहास जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत एक आंतराष्ट्रीय द्वितीय पारितोषिक आणि तीन राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 'भक्ती' या कथासंग्रहास चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काही कथांना प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पुरस्कार लाभले आहेत. याबरोबरच गाण्याची आवड असून पुण्यात स्टेज शो करते. हौशी चित्रकार असून अनेक स्केचेस काढले आहेत.

    Related Posts

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026 ललित

    फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026 ललित

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    By स्नेहा सुतारApril 26, 2026

    भाग – 11 अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे उमलते ओले रान रान नव्हे मन…

    फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026

    Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें

    April 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 एप्रिल 2026

    April 26, 2026

    आजची तरुण पिढी…

    April 26, 2026

    एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!

    April 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 279
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 397
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 199
    • मैत्रीण 18
    • ललित 580
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026

    Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें

    April 26, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.