रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार बनविताना या टिप्स वापरून पाहा.
- ऐनवेळी आमटी थोडी वाढवायची असेल, किंवा जास्त पातळ झाली असेल तर, थोडे बेसन गोडे तेलात चांगले तांबूस रंग येईपर्यंत भाजून उकळत्या आमटीत ओता. आमटी दाट होते आणि चवदार लागते.
- शिळ्या भाताचा चविष्ट उपमा – शिळा भात मिक्सरमधून भरडसर काढावा. नंतर फोडणीत कांदा, उडीदडाळ, कढीलिंब, मिरची घालून परतावा. उत्तम उपमा तयार होतो. मुलांना फोडणीच्या भातापेक्षा नक्की आवडेल.
हेही वाचा – Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर…
- सांबार करताना त्यामध्ये डाळ शिजावयास ठेवतानाच त्यात सालीसकट लाल भोपळा किसून घालणे. त्यामुळे सांबार दाट होते आणि डाळीची बचत होऊन जीवनसत्त्वेही मिळतात.
- सांबारांस रंग येण्यासाठी थोडासा (आंब्याच्या) लोणच्याचा मसाला फोडणीत घालावा.
- डाळीचा जाडसर रवा काढून आणावा आणि जेवढी वाटलीडाळ करायची असेल तेवढा रवा घेऊन त्याला पाण्याचा हात लावून भांडे कुकरमध्ये ठेवून द्यावे. डाळ- भाताबरोबर डाळीचा रवा वाफळून निघतो आणि झटपट वाटलीडाळ करण्यास सोपे जाते. वेळ वाचतो.
- उसळीसाठी आपण कडधान्ये भिजत घालून मोड आणतो. त्यासाठी कडधान्य आदल्या दिवशी भिजत घालून सकाळी चाळणीत उपसून घ्यावे. नंतर कॅसेरॉलमध्ये ठेवून त्यावर छोटा रुमाल ठेवून झाकण लावून ठेवावे. संध्याकाळपर्यंत कडधान्याला चांगले मोड येतात आणि भिजत घातलेल्या कडधान्याचा घरात उग्र वासही येत नाही.
- मसालेभात करताना मिरच्या, कढीलिंब आणि आले, आवडत असेल तर कांदा-लसूण तुकडे करून न टाकता मिक्सरमध्ये वाटून फोडणीत चांगले परतावे. मग तांदूळ परतावे. त्यामुळे तुकडे वाया जात नाहीत. कमी लागतात. चवही वेगळी लागते. तसेच टोमॅटोचा रस करून घालावा. प्रेशर कुकरमध्ये दोन शिट्ट्यांत भात होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना…
- मसालेभात करतानाच जर भरल्या वांग्याची भाजी करायची असेल, तर भात होत आल्यावर त्यावरच वांग्यांत मसाला भरून ती भातावर ठेवून वाफ आणल्यास भाताला वास छान लागतोच; शिवाय वांगीही छान शिजतात. नंतर थोड्या तेलावर फोडणी करून भाजी करता येते. तेल आणि वेळ वाचतो.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


