रोज सकाळी 40 ते 45 मिनिटे फिरणे यासारखा सुंदर आणि सोपा व्यायाम नाही. फिरताना छोटीशी पथ्य पाळायची असतात… ती म्हणजे, फिरताना हातात मोबाइल नाही आणि घरगुती गप्पा नाहीत. फिरताना भेटणाऱ्यांना ‘हाय’ ‘हॅलो’ करत चालत राहिलो, तर चेहेरा आनंदित राहतो, आणि मन पण प्रसन्न राहते… आणि एखादी वेगळी सकाळ अशी पण असते –
खरंतर सकाळ ही रोजच वेगळी असते, पण आजची सकाळ जरा हटके, म्हणजे वेगळ्यातली वेगळी होती! आम्ही सकाळी साधारण 7 – 7:15 वाजता बाहेर पडतो. ही वेळ ऑफिसची असल्यामुळे, रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी कंपन्यांच्या बसचे पिक-अप पॉइंट्स आहेत. काही ठिकाणी कॅबचे पिक-अप पॉइंट्स आहेत. त्यामुळे फिरण्याच्या पूर्ण रस्त्यावर, या वेळेला फुटपाथवर थोड्या थोड्या अंतरावर मुले-मुली, स्त्री-पुरुष ग्रुपने गाडीची वाट बघत उभे असतात.
काही ठिकाणी दोन-तीन जण असतात, तर काही ठिकाणी सहा-सात जण असतात. रोजचे दृश्य म्हणजे, प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो… एकतर ही मंडळी फोनवर बोलत असतात किंवा चॅट करत असतात… काहींच्या कानाला मशीन लावलेले असतात… सकाळी सकाळी भेटतो, तर एकमेकांना ‘हाय’ ‘हॅलो’ करणे, एकमेकांची विचारपूस करणे, काही गप्पा मारणे हा प्रकार कधीच बघायला मिळत नाही!
हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!
आज बायकोला सकाळी एका लग्नाला जायचे होते, म्हणून मी नेहेमीच्या वेळेलाच, पण एकटाच फिरायला बाहेर पडलो. मृत्युंजय मंदिराच्या जवळच, एका स्टॉपजवळ, दोन मुली उभ्या होत्या आणि चक्क मोठमोठ्यांनी हसत गप्पा मारत होत्या! एकीच्याही हातात मोबाइल नव्हता!! दोघींच्या हातात बाजूच्या चहाच्या स्टॉलवरून घेतलेल्या चहाचे ग्लास होते. मुलींनाच असे नाही, पण कुणालाही असे मनमोकळं हसताना बघितलं की, प्रसन्न वाटतं, मस्त वाटतं.
रस्त्याने जाताना, असं काही वेगळं दिसलं की, आपोआपच आपली पावलं तिथे थांबतात. माझं पण असंच झालं. या रस्त्याने मी इतके दिवस फिरतो आहे, पण हाती मोबाइल नसणारी आणि एकमेकांशी बोलणारी माणसं, मी पहिल्यांदाच बघत होतो… आणि ती पण विथ स्माइलिंग फेस! काय कारण असेल? ही माझी जिज्ञासा जागी झाली.
कारण समजण्याकरिता, त्यांनाच विचारणे, हा एकच पर्याय होता.
मी : मॅडम, एक विचारू का?
(त्यांची नावे समजेपर्यंत आपण त्यांना मेघना आणि मनवा म्हणूया.)
मेघना : विचारा काका, काहीही विचारा, आम्ही आज एकदम खूश आहोत.
मी माझी शंका त्यांना विचारली.
मनवा : काका, तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. आज आम्ही एकमेकींना मोबाइलशिवाय बघतो, तेव्हा आम्हाला पण आश्चर्य वाटतं.
मेघना : काका, आज ड्राय-डे आहे.
मी : महाराष्ट्रात ड्राय-डे कुठे पाळतात? आणि आता तर सकाळ आहे!
मेघना : आमच्या ड्राय-डेचा दारूशी काहीही संबंध नाही. ड्राय-डेला दारू नसते, आमच्या ड्राय-डेला मोबाइल नसतो. मृत्युंजय मंदिराजवळ आमचा स्टॉप आहे, श्री शंकराचा वार सोमवार, म्हणून सोमवारी आमचा ड्राय-डे असतो. आज मोबाइलची जागा, हातात नसून आमच्या पर्समध्ये असते आणि वापर फक्त आलेला फोन घेण्याकरिता किंवा काही फोन करण्यापुरताच!
मी : वा! काय मस्त आयडिया आहे! तुम्हाला ही कल्पना सुचली कशी?
मनवा : काका, नुकतेच आम्ही दोघी स्वीडनला गेलो होतो, तीन महिने. तिथे आम्हाला खूप शिकायला मिळाले. ही कल्पना पण त्यातूनच मिळाली. आमच्या ड्राय-डेबद्दल विचारणारे तुम्ही पहिलेच आहात. तुम्हाला ऐकायचे असेल तर, आमच्याबरोबर चहा घ्यावा लागेल. मी काही उत्तर द्यायच्या आत, तिने बाजूच्या चहावाल्याला खूण केली आणि माझ्या हातात चहाचा ग्लास आला.
मी : मॅडम, तुमची बस किती वाजता आहे? नाहीतर बोलण्याच्या नादात…
मेघना : कॅब आलेली आहे. ही काय आमची कार उभी आहे. आमचं फ्लेक्सी टायमिंग असतं, उशिरा गेलो, तर तेवढं नंतर थांबायचं! नो प्रॉब्लेम.
आता, ड्राय-डेची कल्पना कशी सुचली? त्याचं असं झालं –
स्वीडनमध्ये टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर चालवणारा एकही जण, आम्हाला मोबाइलवर बोलताना दिसला नाही. आम्हालाही तुमच्यासारखंच आश्चर्य वाटलं. दुसऱ्याच दिवशी, आम्ही तिथल्या एकाला गाठलं, जसं शंका विचारायला तुम्ही आम्हाला गाठलं… तिथे सगळ्यांनाच इंग्रजी येतं.
हेही वाचा – रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…
मी : मॅडम, थोडा फरक आहे. मी दोघींना गाठलं आणि तुम्ही दोघींनी एकाला गाठलं. त्यांनी पण तुम्हाला चहा ऑफर केला होता का? बरं, गाठल्यावर पुढे काय झालं?
त्या दोघी मला भूतकाळात घेऊन गेल्या…
मेघना : आम्ही त्यांना विचारलं की, इथे गाडी चालवताना कोणीच मोबाइलवर बोलताना दिसत नाही. पोलीस पकडतात का? दंड जास्त असतो का? लायसन्स जप्त करतात का?
परदेशी माणूस : अहो, गाडी चालवताना मोबाइल वापरणे, स्वतःकरिताच धोकादायक असते, हे आम्हाला समजत नाही का? ते पोलिसांनी कशाला सांगायला पाहिजे! उन्हाळ्यात आपण डोक्यावर टोपी घेतो, पावसाळ्यात छत्री घेतो. छत्री नाही घेतली, तर पोलिसांनी आपल्याला पकडायला पाहिजे का? मॅडम, पाऊस पडतोय, तुम्ही छत्री नाही घेतली – भिजल्यामुळे तुम्हाला ताप येईल, सर्दी होईल… द्या 10 युरो दंड.
मी टू-व्हीलर चालवताना हेल्मेट घातले नाही आणि काही कारणामुळे, रस्त्यावर गाडी घसरली आणि मी पडलो, तर माझं डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही, हे मला नक्कीच समजतं. त्यामुळे माझ्या सुरक्षिततेकरिता मी हेल्मेट घालतोच. याच्याकरिता नियम आणि पोलीस कशाला पाहिजेत? कार चालवताना आम्ही सीट बेल्ट लावतोच, त्याचं कारण हेच! अर्थात,, ज्याला मानेचा त्रास असेल, वयस्कर माणसांना हेल्मेटमुळे त्रास होत असेल, तर ते हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट हे वैयक्तिक सुरक्षिततेसाठीच आहे.
मनवा : अहो, पण कार चालवणारे मोबाइलवर का बोलत नाहीत? अपघात झाला तर त्यांना काहीच होणार नसते, चालणाऱ्याचे बारा वाजतात! मग, याकरिता काही नियम आहे का? दंड आहे का?
परदेशी माणूस : मॅडम, नियम आला की, बघायला यंत्रणा आली. दंड आला की, गैरव्यवहार आला… आणि मॅडम समजा, माझ्या कारने अ, ब, क, ड लोकांना धडक दिली, तर मला काहीच होणार नाही, हे बरोबर आहे. आता, इतर कुणी असेच चार-पाच लोकांना उडवले आणि त्या अ, ब, क, डमध्ये माझे आई-वडील असले तर? बायको असू शकते… मुले असू शकतात… मित्र असू शकतात… अशी दुसऱ्यांनी दिलेली धडक मला आवडेल का? नक्कीच नाही. मग, मी दिलेली धडक इतर कुणाला आवडेल का? तर नाही! ‘इस हाथ दे, उस हाथ ले!’ व्हेरी सिम्पल. म्हणून गाडी चालवताना ‘नो मोबाइल’.
आम्ही रस्त्यावर नजर टाकली, तर, खरोखरच हेल्मेट, सीटबेल्ट वापरताना सगळेच दिसत होते. आम्ही दोघींनी एकमेकीला चिमटा काढून शुद्धीवर असल्याची खात्री करून घेतली.
मेघना : इथे चौकात कुठेच ट्रॅफिक पोलीस दिसत नाहीत. स्पीड लिमिट न पाळणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे, नो एंट्रीतून येणे वगैरे कोण बघतं? कोण पकडतो?
परदेशी माणूस : इथे सगळेच लोक सुशिक्षित आहेत, सगळ्यांना वाचता येतं. रस्त्यावर स्पीड लिमिटचे बोर्ड का लावले आहेत? रस्त्यावर लेन का मार्क केल्या आहेत? झेब्रा क्रॉसिंग का मार्क केले आहेत? याचा अर्थ सगळ्यांना समजतो. इथे फक्त वाहतूक आणि सुरक्षितता यांच्याशी संबंध असलेलेच बोर्ड रस्त्यावर लावता येतात.
मेघना : अहो, आमच्याकडे पण सगळ्यांना वाचता येतं, आमच्याकडे पण रस्त्यावर असे बोर्ड असतात. पण जास्त बोर्डचा भरणा वाढदिवसांचे बोर्ड आणि जाहिराती यांचा असतो. त्यामुळे सुरक्षिततेसंबंधीचे बोर्ड कुणालाच दिसत नाहीत आणि कुणी बघितले – तरी ते पाळत नाहीत. याला आम्ही, ‘कळतं पण वळत नाही’ असं म्हणतो.
मनवाने मेघनाला हळूच चिमटा काढला, “अगं, मराठी माणसांनाच ही सवय आहे, म्हणूनच ही म्हण फक्त मराठीत आहे. इंग्रजीत तू ‘अंडरस्टॅण्डिंग बट नॉट टर्निंग’ अशी म्हण कधी ऐकली आहेस का?”
मनवा : अहो, इथे स्पीड ब्रेकर दिसत नाहीत, जिथे फोर-व्हीलरला एंट्री नाही, तिथे खांब दिसत नाहीत, फुटपाथवर टू-व्हीलर नेऊ नये म्हणून तिथे खांब आहेत.
फुटपाथवर खांब हा काय प्रकार आहे, हे परदेशी माणसाला बम्पर गेले असावे, त्यामुळे तो, ‘व्हॉट, व्हॉट, व्हॉट इज दॅट?’ असं विचारायला लागला. आमच्या लक्षात आलं की, जे बोर्ड वाचून तसं वागत नाहीत, त्यांच्याकरिताच स्पीड ब्रेकर आणि खांब लागतात… आणि यांचा शोध आपल्याकडेच लागला असणार.
हेही वाचा – अवघ्या पंधरा दिवसांत 5 रुपयांचे झाले 500 रुपये!
हे सगळं ऐकल्यावर सगळ्यांच्याच मनात एक शंका नक्कीच येणार, तीच मनवाच्या पण मनात आली. विचारू का नको, असं करत, तिने विचारलंच –
मनवा : इथे सगळे लोक नियम पाळतात, त्यामुळे कुणालाच अडवायचे नाही, कुणाचं लायसन्स बघायचं नाही, कुणाच्या पावत्या फाडायच्या नाहीत, मग इथे ट्रॅफिक पोलीस असतात की नाही? आणि असले, तर ते करतात काय?
परदेशी माणूस : अहो, इथे पोलीस आहेत. ते सगळ्या ट्रॅफिकवर नजर ठेवून असतात. कुठल्याही कारणामुळे कुठेही काहीही अडचण असेल, तर ते लगेच मदतीला पोहोचतात. सगळे रस्ते, फुटपाथ यांची स्वच्छता, वेळच्या वेळी दुरुस्ती, रस्त्यावरचे मार्किंग – पट्टे या सगळ्या गोष्टी तेच पाहत असतात. इथे तुम्हाला रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, कचरा दिसणार नाही, एकही सिग्नल बंद दिसणार नाही.
मेघना : तुमचं हे सगळं ऐकून आणि बघून असं वाटतं, की, आम्ही एखाद्या काल्पनिक दुनियेत आहोत. अजूनही काही विचारलं तर चालेल का?
परदेशी माणूस : हो, पण छोट्याश्या ब्रेकनंतर –
परदेशी माणसाने बाजूच्या व्हेंडिंग मशीनमधून तीन कोक आणले आणि म्हणाला, चियर्स! एक एक घोट घ्या आणि विचारा.
मेघना : आमच्याकडे लोक रस्त्यावर कचरा जाळतात, खूप धूर सोडणारे आणि कानठळ्या बसतील असा आवाज करणारे फटाके फोडतात. सण साजरे करण्याकरिता, मोठमोठया मिरवणूक काढतात, ट्रॅफिक जॅम होतो. कर्कश्श आवाजात गाणी लावलेली असतात. ही यादी खूप मोठी होईल. तुमच्याकडे असे प्रकार असतात का?
परदेशी माणूस : तुम्ही सांगता एवढी वाईट परिस्थिती इथे कधीच नव्हती. पण थोड्याफार प्रमाणात काही गोष्टी असायच्या. आता यातले काहीच इथे बघायला मिळणार नाही. इथल्या सामाजिक संस्था, लोकांच्या सभा घेऊन, वर्तमानपत्रांमधून, व इतर उपक्रमांमधून, असे केल्यामुळे होणारे दुष्परिणाम, लोकांना वेळोवेळी समजावून सांगतात. राजकीय विरोधी पक्ष पण, सरकारच्या सगळ्याच धोरणांना विरोध करत नाहीत. चांगले असेल त्याला सगळेच मनापासून पाठिंबा देतात. इथे लोकांना एकदा कळलं की, लगेच ते वळतं. ज्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडेल किंवा ज्यामुळे देशाच्या संपत्तीला हानी पोहोचेल, अशा गोष्टी इथे कुणीच करणार नाही. सगळेच राजकीय पक्ष याबाबतीत एकत्र काम करतात. विरोधी पक्ष म्हणून कायम विरोधीच भूमिका घ्यायची, हा प्रकार इथे नाही. लोकांचे हित, हेच सगळ्या पक्षांचे उद्दिष्ट असते.
मनवा : वा, तुमच्याकडून आज खूपच शिकायला मिळालं. आमच्याकडे असा बदल झाला तर काय मजा येईल!
(अशा ठिकाणी आता तीन महिने राहायला मिळणार, या कल्पनेनेच आम्ही सुखावलो). आम्ही परदेशी माणसाचे नाव विचारले, त्यांचे आभार मानले आणि त्यांना बाय – बाय केले…
मी : वा, म्हणजे तुम्ही तीन महिने प्रदूषणमुक्त हवा आणि पाणी यांचा आस्वाद घेतला. तिथले अन्नपदार्थ पण केमिकल विरहित आणि भेसळविरहित असणार! मस्तच! आपल्याकडे फक्त नारळ हाच एकमेव असेल की, ज्यात केमिकल नाहीत आणि भेसळ नाही.
मनवा आणि मेघना : काका, तिकडे अन्न आणि औषधे यात भेसळ करणाऱ्याला नक्कीच फाशी असणार. काका, तुम्ही आता ड्राय-डे कधी सुरू करताय?
मी : मॅडम, तुम्ही स्वीडनला जाऊन आला, आणि तुमचा स्टॉप शंकराच्या मंदिराजवळ आहे, म्हणून तुम्ही सोमवारी ड्राय-डे सुरू केला. मॅडम, मी दोनदा स्वीडनला जाऊन आलो आणि माझ्या रोजच्या फिरण्याच्या रस्त्यावर शंकर, देवी, दत्त, बालाजी, मारुती, नवग्रह अशी सगळीच देवळे आहेत, म्हणून मी रोजच ड्राय-डे पाळतो. फिरायला जाताना नो मोबाइल, गाडी चालवताना नो मोबाइल, लिफ्टमध्ये – जिने चढता-उतरताना नो मोबाइल, कुणाशी बोलताना – गप्पा मारताना नो मोबाइल, जेवताना नो मोबाइल!
मनवा : काका, ग्रेट. तुम्ही आमच्याही पुढे आहात.
मी : आज तुमचा स्वीडनचा अनुभव ऐकायला मिळाला, खूप मजा आली. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, जर आपण सगळ्यांनीच आचरणात आणल्या, म्हणजे कळत्याला वळते केले, तर सगळ्यांचच जगणं खूप खूप सुखकर होई, यात शंकाच नाही. अर्थात, हे कुत्र्याची शेपूट सरळ करण्यासारखे आहे.
मेघना : आपण सगळ्यांनीच जर नेपोलियनवर विश्वास ठेवला, तर अशक्य असं काहीच नाही, काका. शेपूट पण सरळ होईल…!
आम्ही आता निघतो. लेट अस् ऑल बी पॉझिटिव्ह अँड होप फॉर द बेस्ट.
मी : यस मॅडम, नक्कीच. माहिती आणि चहाबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. मी माझे नाव त्यांना सांगितले आणि त्यांची नावे विचारली.
त्या दोघी एकदम : एम फॉर मनवा आणि एम फॉर मेघना!


