भाग – 23
आरू रडत होती, सगळ्यांना दिसत होतं… रामने जवळ घेण्याची ती वाट पाहत होती आणि राम तिच्याकडे पाठ फिरवून उभा होता! आरूला रडताना पाहून शिवला रामचा रागच आला.
“राम काय चाललंय? आरू रडतेय, बघा ना तिच्याकडे…” सिया रामला ऐकू जाईल अशा आवाजात त्याच्या जवळ जात म्हणाली.
“दादा, सोड ना तुझा राग आता… थांबव ना तिला!” पवन पण त्याला समजावत म्हणाला.
“ए पोरी बास कर की आता! आसं किती येळ रडणार हाईस… पोरी एक ना एक दिस सगळ्याच पोरींना सासरी जायलाच लागतं, रीतच हाय ती. त्यातून कोन बी नाय सुटलं. आता तुझं लगीन झालंय तर तुझं हे लहान लेकरागत वागणं सोडून दि… आता लई झालं… डोळं पुस ते!” कलावती तिच्या गालावरून हात फिरवत भरल्या डोळ्यांनी तिला समजावत म्हणाल्या.
आता लेक आपल्यासाठी परकी होणार… जन्मल्यापासून, अगदी पोटात एक अंकूर निर्माण होतोय ही जाणीव जेव्हा होते ना, तेव्हापासून एका आईचं त्या बाळासोबत सगळ्यात पवित्र आणि अनमोल असं नातं निर्माण झालेल असते.
एका आईसाठी मुलगा, मुलगी दोन्ही सारखेच असतात… असं आपण कितीही म्हणत असलो तरी, ही गोष्ट नाकारू शकत नाही – मुलगी झाली हे कळल्यापासूनच या गोष्टीची जाणीव झालेली असते की, एक दिवस ती पाखरासरखी उडून जाणार आहे… फरक तर असतोच!
…आणि जेव्हा ती वेळ आलेली असते, त्यावेळी त्या आई आणि मुलासाठी ती वेळ खरंच कठीण असते. सध्या कलावती यांना आपल्या लेकीचे गुण आठवून आज राग येत नव्हता, रडू येत होतं… यापुढे ती त्यांना रोज उठल्यापासून झोपेपर्यंत त्रास देणार नव्हती… प्रत्येक गोष्टीवर त्यांच्यासोबत वाद घालणार नव्हती… सोबत काळजीही होती! तिने आता जबादारीने वागावं, म्हणून तिला समज देत होत्या…
हेही वाचा – शिवने रामकडे काय कबुली दिली?
इकडे सुधा यांचीही वेगळी अवस्था नव्हती. सिया सुधाजवळ जाऊन त्यांना बिलगून रडत होती. आपल्या लेकीच्या आयुष्यात आता तरी सुख आणि सुखच असावं, अशी मनोमन देवाला प्रार्थना करत होत्या.
आरूचं मात्र अजूनही रामकडे पाहून रडणं सुरू होतं.
“आई, लग्न झालं म्हणून माझ्यात काही फरक पडणार नाही… मी जशी आहे तशीच राहणार!” रडत रडत आरू आईला म्हणाली… आणि हे दाखवून दिलं – मी तुझ्यासोबत वाद घालणं काही सोडणार नाही!
तिचं बोलणं ऐकून कलावती रडता रडताच खुदकन हसल्या आणि तिला मिठीत घेतलं. सखाराम भाऊ सुद्धा डोळे पुसत त्यांच्याजवळ आले… ते काही म्हणणार तोच लीला आजी कडक आवाजात म्हणाल्या, “पुरे आता, खूप झालं… आराधना, तू आता सरपोतदार घराण्याची सून आहेस. तर, हे असं मोठमोठ्याने रडणं शोभत नाही. इथून पुढे घराण्याचा मान राखणं तुझी जबादारी आहे…”
“…आणि आता पाठवणीची तयारी करा, सांजवेळेला नवीन सुनेचा गृहप्रवेश झाला पाहिजे.”
आरूने लीला आजीचे धारधार शब्द ऐकून रडणं तर बंद केलं… आणि तिला याचीही जाणीव झालं की, तिचं लग्न झाल आहे आणि ती कितीही म्हणाली की, तिच्यात काही बदल होणार नाही. पण लग्नानंतर बदल तर होतोच ..
रामने आपली नाराजी सोडलीच नाही… त्याने ना तिला जवळ घेतलं, ना तिच्याकडे पाहिलं… असं सगळ्यांना वाटत असलं तरी तसं नव्हतं… तो तिला दूर जाताना पाहूच शकत नव्हता. त्याच्यासाठी सगळं काही बदलणार होतं… लहानपणापासून ‘दादा दादा’ करत त्याच्या मागे फिरणारी… आई रागावली तर, तिच्यासोबत भांडून भांडून थकून, मग त्याच्या कुशीत शिरून स्फूंदत राहणारी… अंगणात इकडून तिकड बागडणारी… प्रत्येक गोष्टीची भूणभूण त्याच्या कानाशी येऊन करणारी… त्याची लहानगी आरू आता कधीतरीच त्याला भेटणार होती… उठलं की तिचा चेहरा आणि आवाज त्याला ऐकायला, पाहायला मिळणार नव्हता!
त्याच्यासाठी हा प्रसंगच खूप कठीण होता. त्याने जर तिच्याकडे पहिलं असतं तर, तो स्वतःला रोखूच शकला नसता आणि त्याला रडताना पाहून आरूने काय केलं असतं, ते कोणी सांगूच शकत नाही! “मी माझ्या दादाला सोडून येणार नाही,” असं म्हणून ती अडून बसली असती, याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्याला तिच्यासमोर रडायचं नव्हतं, कमजोर पडायचं नव्हतं.
मनात भावना उचंबळून आल्याने त्याचा कंठ दाटून आला होता… पण तो हाताच्या मुठी आवळून स्वतःला कंट्रोल करत होता.
ओटी भरण्यासाठी बायका आरू आणि सियाला आत घेऊन गेल्या. आता तिथे पवन आणि आकाश पाहुण्यांची जेवण वगैरे व्यवस्थित झाली की नाही, ते पाहायला गेले. शिवने आकाशला सांगितलं होतं की, रामने जरी लग्नाची सगळी जबादारी घेतली असली तरी, तूही त्यांना लागेल ती मदत कर. त्यामुळे त्याचा बॉस आहे, हे विसरुन तो पवनला मदत करत होता…
पवनला कसंतरीच वाटत होतं… ज्यांच्या हाताखाली आपण ऑफिसमध्ये काम करतो, त्यांना कसं काम सांगायच?
पण आकाशने आपल्या मोकळ्या स्वभावाने पवनला कम्फर्टेबल करत, मैत्रीचा हात पुढे केला. पवन तर आधी संकोचला, पण मग हसत हातात हात दिला… आणि आता दोघे खूप जुने मित्र असल्यासारखे वागत होते.
000
दिनकर राव एका ठिकाणी सोफ्यावर जाऊन बसले… सखाराम आणि आरूचे मामा बाकीची कामे बघायला गेली… आता तिथे फक्त राम आणि शिव उभे होते. राम त्याच्याच विचारात उभा होता, तोच त्याच्या खांद्यावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श जाणवला… तसं त्याने मागे वळून पाहिलं… तर, शिव त्याच्याकडे आश्वासक नजरेने पाहत होता… तो रामची अवस्था समजू शकत होता. खरंतर, सध्या दोघांचं दुःख एकच प्रकारचं होतं. दोघांचंही आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम होतं, त्यांच्यासाठी… त्यांच्या सुखासाठी काहीही करायची तयारी होती.
पण थोडा फरक होता, शिवला सियापासून दूर राहायची सवय होती, पण रामचं तसं नव्हतं! त्याने कधीच आरूला स्वतःपासून दूर केल नव्हतं! जेव्हा तो शिकायला पुण्याला होता, तेव्हाही तो आठ दिवसाला गावी जायचा आणि दिवसातून कितीतरी वेळा फोनवरून त्यांचं बोलण व्हायचं. तिला साधी सर्दी जरी झाली, तरी तो रात्र रात्र जागायचा तिच्या उशापाशी बसून असायचा… ” शिव,” राम त्याला बोलणारच होता की, शिवने रामला पुढे होऊन मिठी मारली आणि म्हणाला,
“आरूच्या डोळ्यांत इथून पुढे पाणी येणार नाही, असा शब्द देतो तुम्हाला जिजू!” रामला आश्वस्त करत, पाठीवर थोपटून म्हणाला.
रामनेही समाधानाने हासत, त्याच्या पाठीवर हात ठेवला…
“थँक्यू शिव… विश्वास ठेवतोय तुझ्यावर; तो विश्वास तुटू देऊ नकोस… आणि हो, तू जे केलंस त्याची भनक् सुद्धा आरूला लागू देऊ नकोस….” राम त्याला सावध करत म्हणाला.
रामचे शब्द ऐकून शिव झटक्यात बाजूला झाला आणि त्याच्याकडे पाहू लागला…
“काय झालं? असं का बघतोयस?” रामने डोळे बारीक करून विचारलं.
“जिजू… ते म्हणजे… आरुला माहीत आहे सगळं!” शिवने नजर न मिळवता अडखळत सांगितलं.
“काय! कसं कळलं तिला? नाही ते शक्य नाही… तुझा गैरसमज झाला असेल…” राम अविश्वासाने त्याच्याकडे पाहून म्हणाला.
“नाही… ते काल रात्री आपल बोलणं…” शिव बोलतच होता की, भावना आणि पूर्वी त्यांच्याजवळ आल्या.
“जिजू, दादा तुम्हा दोघांना बोलावलंय चला पटकन…” दोघी सोबतच म्हणल्या आणि मग दोघी हसू लागल्या, राम आणि शिव पण हसले… आणि त्यांच्यासोबत गेले.
इकडे दोघींची ओटी भरून झाली होती… शिव आणि राम आले तसं दोन्ही जोड्यांचं गठबंधन केलं गेलं. शिवकडून जास्त कोणी पाहुणे उपस्थित नव्हते. त्यांच्याशी संबंधित लोकांपासून हे लग्न गुप्त ठेवलं गेलं होतं. तसेच सगळी पाहुणे गावी असल्यामुळे त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं. म्हणून आरूच्या चुलत वहिनीने दोन्ही जोड्यांच गठबंधन केलं. त्यानंतर त्यांनी लग्नमंडपात मांडलेल्या गणेशमूर्तीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.
हेही वाचा – शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….
आता सगळे बाहेर आले होते… बाहेर दोन गाड्या सजल्या होत्या… पवनने त्याच्या मित्रांची फोर-व्हीलर आणली होती, राम आणि सियासाठी!
सिया आणि आरू आपापल्या फॅमिलीजवळ गेल्या. सिया सुधाच्या समोर जात, त्यांना मिठी मरली. सुधाला पण आपल्या भावना रोखणं कठीण झाल होतं. वातावरण एकदम भावूक झाले होते.. सियाने आजी, समर पूर्वी यांच्या देखील गळ्यात पडून रडत होती… दुसऱ्यांदा तिची पाठवणी होत होती…
मागच्या वेळी मनात फक्त दुःख आणि दुःखच घेऊन आई-बाबांचं घर तिने सोडलं होतं… पण आजच्या या आई, वडील, बहीण, भाऊ यांना सोडून जाण्याच्या दुःखाबरोबरच रामची आयुष्यभरासाठी मिळालेली सोबतीचा आनंद होता. आज तिच्या डोळ्यातून आनंद आणि दुःखाचे अश्रू वाहात होते. ठरवूनही तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.
शिवने तिला पुढे होऊन मिठीत घेतलं, तसं तिला जास्तच भरून आलं. त्याच्यामुळेच आजचा हा दिवस – जो कधी येईल याची आशाच सोडून दिली होती तिने, ज्याची कधी आयुष्यात परत भेट होईल की, नाही त्याची शाश्वती नव्हती – आज तो तिच्यासोबत होता… तेही तिचा नवरा म्हणून! आजच त्यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती…
ती व्यक्ती आज फक्त आणि फक्त शिवमुळे तिच्या आयुष्यात आली होती… तिला सगळं आठवून जास्तच रडू येत होतं. आरू आता शांत झाली होती. रामने तिच्याकडे अजूनही पाहिलं नव्हतं… त्याची नजर आता सियावर होती, तिला रडताना पाहून त्यालाही वाईट वाटत होतं आणि ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
आरू त्याच्याकडेच पाहात होती आणि आता आपल्या दादाचा चेहरा पाहून तिलाही वाईट वाटू लागलं… वहिनी रडतेय म्हणूण दादाला त्रास होतोय ते पाहून तिने स्वतःचं रडणं आवरतं घेतलं आणि सियाजवळ आली. कारण, आता वहिनी रडायची थांबली तरच दादाचा चेहरा खुलेल, हे लक्षात आलं… कारण तीही दादाला असं पाहू शकत नव्हती, तो तिच्यावर नाराज आहे, हेही ती विसरुन गेली.
हेही वाच ा-
“ओ, काय चाललंय तुमचं? आमच्या वहिनीला रडवताना काहीचं कसं वाटत नाही तुम्हाला? लई झालं, व्हा बाजूला… वहिनी बास हां आता, अजिबात रडायचं नाही… तुम्हाला रडताना पाहून माझा दादा पण रडेल काही वेळाने!” आरू सियाचे डोळे पुसत हसत म्हणाली.
तिचं बोलणं ऐकून सिया खुदकन हसली… शिव भुवया उंचावून तिच्याकडे पाहात होता – जेव्हा ती त्याला बाजूला व्हा म्हणाली! आतापर्यंत ती त्याच्याकडे पाहायला देखील तयार नव्हती आणि आता इतक्या हक्काने त्याला बाजूला सारलं होतं… जणू काय सिया त्याची बहीण नसून फक्त तिची वहिनी आहे!! बाकीचे पण तिच्या या कृतीने अवाक् झाले होते आणि शिवकडे पाहून हसत होते… कारण त्याच्याशी अशा प्रकारे कोणीच बोललं नव्हतं आणि आरू सहज त्याला बोलून गेली… यापूर्वीही आरू त्याच्याशी अशा प्रकारे बोलली होती.
शिवने रामकडे पाहिलं तर भुवई उंचावून त्याने त्याला इशारा केला – “बघ ही अशी आहे!” तो डोळ्यांनीच सावध करत होता.


