लेखक गो. नी. दांडेकर यांची ‘पडघवली’ कादंबरी खूप गाजलेली आहे. यावर आधारित एक हिंदी टीव्ही मालिका आली होती. कोकणातल्या एका गावावर लिहिलेले हे कथानक आहे. पडघवली गाव कसे वसले? मूळ पुरुष कोण? इथपासून कथानक सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समुद्रीचाचे किनारपट्टीवरच्या गावातल्या लोकांना त्रास द्यायचे, लूटमार करायचे, बायका-मुली उचलून न्यायचे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी शेणवीला खरमरीत पत्र लिहिले. त्याच्याकडे असलेल्या केशवभटाने युक्तीने त्यांना पकडले. केशव भटांनी इनामात एक घोंगडी जमीन मागितली. घोंगडी पूर्ण उसवून दोऱ्याचा बिंडा केला.एक खुंट जमिनीत रोवून त्याला दौऱ्याचे एक टोक बांधले आणि दुसरे हातात घेऊन चालत उलगडत गेला. जेवढी जमीन पायाखालून गेली तेवढी घेतली. तेच पडघवली आणि मूळ पुरुष केशवभट.
गाव वसले. ब्राह्मणांची वस्ती झाली. कुळवाडी आणि इतर होतेच. मुसलमानांची काही घरे होती. अंबू आठ वर्षांची मुलगी लग्न होऊन इथे येते… ती आपली कहाणी सांगते आहे. कोकणातली खेडी मुंबईतल्या औद्योगीकरणामुळे रिकामी होऊ लागल्याची ती सुरुवात होती. कोकणातली माणसे मुंबईत चाकरी करण्यासाठी जाऊ लागली आणि हळूहळू गावातली घरे म्हाताऱ्या-कोताऱ्यांसाठी राहिली. एक संस्कृती नष्ट व्हायला सुरुवात झाली, तो हा काळ… जो लेखकाने नेमकेपणाने टिपला आहे. ही कादंबरी वाचताना Gone with the wind या इंग्लिश कादंबरीची आठवण येते. त्यातही एक कालखंडातल्या संस्कृतीची नोंद झाली आहे. पडघवली कादंबरीत भौगोलिक परिस्थिती, प्राणी, पक्षी, चालीरीती, धर्म यांच्याबरोबर आपल्या भाषेचा वेगळा घाट दिसून येतो. कोकणात तेव्हा रूढ असलेले शब्द, म्हणी वाक्-प्रचार येतात. ‘करायची’ ऐवजी ‘कराच्ची’, ‘उत्सव’ ऐवजी ‘उच्चाव’, आलते-गेलते, केलिनी, सांगितलिनी… अनेक शब्द आता आपल्या वापरात नाहीत. उदाहरणार्थ, आगोतली, जौल, धोदाणा, कुपाटी.
हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
नव्या पिढीला अर्थही कळणार नाहीत. पण ते शब्द आपले वाटतात, इथले वाटतात, गोड वाटतात. त्यांचा अर्थ जसा आपल्याला कळतो, तसा तो इतर भाषांत अनुवाद केल्यावर कळणार नाही. विशेषत:, ओव्या. बायका डोहाळे जेवणासारख्या कार्यक्रमांना एकत्र जमल्या की, ओव्या म्हणत. ओव्या तिथल्या तिथे स्वत: रचत.
या गावाची दैवते गिऱ्होबा आणि सातमाय. गिऱ्होबाला नैवेद्य दाखविल्याशिवाय कार्य व्हायचे नाही. दुर्गेचे लग्न करायचे ठरते, त्यावेळी अख्खा गाव मदतीला उभा राहतो. खोताचे कुळ असलेला येसदा कुळवाडी राबतो आणि गर्भरेशमी लुगडे देऊन आहेर करतो. कुशात्या कार्य काढते, त्यावेळी तिला नवरा नसूनही आणि वेडा मुलगा असूनही गाव काही कमी पडू देत नाही. लग्नाचे वर्णन ऐकल्यावर आपण सध्या जे करतोय ते ‘wedding’ नावाचे ‘function’ आहे, हे समजते. घरी कोणी आल्यावर चहा द्यायची पद्धत सुरू व्हायची होती. गूळ दिला जायचा. पोहे आणि गूळ… हाच पाहुणचार. एका आंब्याच्या झाडाचे आंबे उतरवायचे नाहीत, कुळवाड्यांना असा नियम होता. तेच वारुळाचे! निसर्गाचे अस्तित्व मान्य करून, त्याच्या शक्तीचा सन्मान करून, त्याच्यावर सर्वांचा, अगदी प्राण्यांचा सुद्धा हक्क आहे, हे लक्षात ठेवून कसे जगता येते, ते ही कादंबरी वाचून कळते.
या कादंबरीत अनेक पात्र येतात. अंबू (जिला सगळे अंबू वहिनी म्हणत) ही नायिका. महादेव तिचे पती, खोत. हे दुर्बळ शामळू व्यक्तिमत्व. त्याच्या या स्वभावामुळे संकट ओढवते. गुजा महादेवाचा मित्र. ताकदवान, भडक डोक्याचा… जो पुढे कोण्या बाबाची दीक्षा घेतो आणि न रागवण्याची शपथ घेतो. जिऊ आते ही बालविधवा अत्यंत प्रेमळ गुणी स्त्री. दुर्गा आणि गणू ही महादेवाची भावंडे, जीवाला जीव देणारी. गणू अविवाहित राहतो. गुजासुद्धा. व्यंकू हा दुष्ट, तल्लख; पण वाकड्या बुद्धीचा. याबरोबर गेंगण्या, आंधळा भिऊ आबा, त्याची सुंदर बायको शारदा, बनू, यादोनाना, येसा कुळवाडी, नबी, हैदर, हरी, जोशी आणि काही पात्र कथेला पूरक आहेत…
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. एका चिमुकल्या गावात इतक्या वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती आहेत. सुरुवातीलाच लेखक पुढे काय होणार आहे, याचे सूतोवाच करतात, त्यामुळे बारकाईने वाचायला हवे. सुखदुःखाची, पापपुण्याची वीण घट्ट आहे. सशक्त कथानक आहे. ‘एक धागा सुखाचा, एक धागा दुःखाचा… जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’ हे खरे.
भोळ्याभाबड्या श्रद्धा, अंधश्रद्धा घेऊन जगणारी ही माणसे केवळ अन्न-वस्त्र-निवारा एवढ्या माफक अपेक्षा ठेवत होती. ‘जगा आणि जगू द्या’ हेच तत्वज्ञान. पण यात दुष्ट प्रवृत्तीची विघ्नसंतोषी माणसे असतातच. अंबू बुद्धिमान कर्तृत्ववान सून असते. जिचे गुण घरातल्या मोठ्यांनी आणि गावकऱ्यांनी ओळखलेले असतात. त्यामुळे तिला सन्मान आहे आणि जबाबदारी सुद्धा. तिचे कर्तृत्व सिद्ध करणारे प्रसंग दिले आहेत आणि नवऱ्याविरुद्ध बोलण्याचे धैर्य ती दाखवते. कठोर निर्णय घेते.
हेही वाचा – थँक यू मि. ग्लाड… क्रूरकर्म्याची हतबलता
ती म्हणते, पडघवलीचे नुकसान दोघांनी केले. एकाची बुद्धी तल्लख पण तिरपी आणि दुसरा ताकदवान पण बुवाबाजी पाठी लागलेला… दोघांनी आपल्या गुणांचा वापर केला नाही.
पडघवली हे कोकणातल्या अनेक खेड्यांचं, गावांचं प्रतीक आहे. ग्रामव्यवस्था मोडकळीला आली आणि शहरांत अफाट गर्दी झाली. हेच थोड्याफार फरकाने सगळीकडे घडले. औद्योगिक क्रांतीमुळे समाज ढवळून निघाला होता, तो हा काळ. माणसे सगळीकडे सारखीच असतात. सज्जन, दुर्जन, प्रेमळ, कोत्या मनाची, स्वार्थी, दानी, चारित्र्यवान, चारित्र्यहीन, तडफदार, कर्तृत्ववान, दुर्बळ, अंधविश्वासू, अव्यवहारी, सर्व गुणविशेषांची! सशक्त कथानकात या सर्व गुणांचे दर्शन होतेच आणि प्रत्येक पात्र परिपूर्ण होते. कादंबरीची सुरवात ज्या व्यक्तींच्या वर्णनाने होते त्यांच्याच उल्लेखाने कादंबरीचा शेवट होतो आणि वर्तुळ पूर्ण होते.
बदल हा सृष्टीचा नियम आहे. नव्या संस्कृती जन्मतात आणि जुन्या संस्कृतींचे अवशेष शिल्लक राहतात आणि नव्या संस्कृतीत कुठेतरी ते डोकावतात. लहान असताना कोकणात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी आजोळी राहिले होते. या कादंबरीत वर्णन केलेले काही न काही मला पाहायला, अनुभवायला मिळाले. तिथले निसर्गसौंदर्य स्मृतीत कायम कोरले गेले आहे. तरीही मला भुरळ पडली आहे, ती भाषेची आणि अशा शब्दांची जे आता सयुक्तिक उरले नाहीत, विस्मृतीत गेले आहेत. संस्कृती लयाला जाताना किती गोष्टी उदरात घेते! साहित्यात मात्र ती अशा लेखनामुळे अमर होते. पडघवली म्हणूनच अमर साहित्यकृती आहे.


