सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
पैं गा समासांमाझारीं । द्वन्द्व तो मी अवधारीं । मशकालागोनि ब्रह्मावेरीं । ग्रासिता तो मी ॥270॥ मेरुमंदरादिकीं सर्वीं । सहित पृथ्वीतें विरवी । जो एकार्णवातेंही जिरवी । जेथिंचा तेथें ॥271॥ जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनातें गिळी किरीटी । आकाश जयाचिया पोटीं । सामावलें ॥272॥ ऐसा अपार जो कालु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु । मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ॥273॥
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् । कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥34॥
आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं । शेखीं सर्वांतें या संहारीं । तेव्हां मृत्युही मीचि ॥274॥ आतां स्त्रीगणांचां पैकीं । माझिया विभूती सात आणिकी । तिया ऐक कवतिकीं । सांगिजतील ॥275॥ तरी नीच नवी जे कीर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती । आणि औदार्येंसी जे संपत्ती । तेही मीचि जाणें ॥276॥ आणि ते गा मी वाचा । जे सुखासनीं न्यायाचां । आरूढोनि विवेकाचां । मार्गीं चाले ॥277॥ देखिलेनि पदार्थें । जे आठवूनि दे मातें । ते स्मृतिही पैं एथें । त्रिशुद्धी मी ॥278॥ पैं स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गा मी इये जनीं । धृती मी त्रिभुवनीं । क्षमा ते मी ॥279॥ एवं नारींमाझारीं । या सातही शक्ति मीचि अवधारीं । ऐसें संसारगजकेसरी । म्हणता जाहला ॥280॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जेणें देवांचा मानु गिंवसिला, धर्मासि जीर्णोद्धार केला…
अर्थ
अर्जुना, सर्व समासांमध्ये द्वंद्व नावाचा समास, ती माझी विभूती आहे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल, तो मी आहे. ॥270॥ मेरू, मंदार इत्यादी सर्व पर्वतासहित पृथ्वीला जो विरवितो आणि जो जलरूप झालेल्या जगालाही जेथेल्या तेथेच आटून टाकतो, ॥271॥ जो प्रलयकाळच्या तेजाला ग्रासून, अर्जुना, संपूर्ण वार्याला गिळून टाकतो आणि हे राहिलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते, ॥272॥ याप्रमाणे अमर्याद जो काळ, ती माझी विभूती आहे. असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाले. मग यानंतर पुन्हा सृष्टीचा जमाव उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव, ती माझी विभूती आहे. ॥273॥
सर्वांचा संहार करणारा मृत्यू मी आहे. (पुन्हा कल्पांती) उत्पत्ती पावणार्या प्राण्यांना उत्पन्न करणारा मी आहे स्त्रीलिंगवाचक वस्तूंमधे कीर्ति, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी, धृती आणि क्षमा (या सात) मी आहे. ॥34॥
आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. ऐक, या सर्वांना जीवन मीच आहे. शेवटी ज्या वेळेला मी या सर्वांचा नाश करतो, त्यावेळेला मृत्यूदेखील मीच आहे. ॥274॥ आता आणखी माझ्या सात विभूती स्त्रीवर्गापैकी आहेत. त्याही सहजच सांगितल्या जातील, तू ऐक. ॥275॥ तरी नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ति, अर्जुना, ती माझी विभूती आहे आणि औदार्याची जोड असलेली जी संपत्ती, ती देखील माझी विभूती आहे, असे समज. ॥276॥ आणि जी वाचा न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालते, ती वाचा मी आहे. ॥277॥ पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी अशी जी स्मृती, ती निश्चयेकरून येथे मी आहे. ॥278॥ स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धी, ती या लोकांमध्ये मी आहे आणि त्रैलोक्यात धैर्य आणि क्षमा मी आहे. ॥279॥ याप्रमाणे स्त्रीवर्गामध्ये या सातही शक्ती मीच आहे, असे समज; असे संसाररूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्णरूपी सिंह म्हणाला. ॥280॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : मी आघवियेचि सृष्टी, आदिमध्यांतीं किरीटी…


