दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 03 एप्रिल 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 13 चैत्र शके 1948; तिथि : प्रतिपदा 08:42; नक्षत्र : चित्रा 19:24;
- योग : व्याघात 14:07; करण : तैतिल 21:22;
- सूर्य : मीन; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:52;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
जयपूर घराण्याच्या गायिका किशोरी आमोणकर
टीम अवांतर
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या एक श्रेष्ठ, प्रतिभासंपन्न गायिका किशोरी आमोणकर यांच्या जन्म 10 एप्रिल 1931 रोजी, मुंबई येथे झाला. जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर आणि माधवदास भाटिया यांच्या त्या ज्येष्ठ कन्या.
मोगूबाईंनी आपल्या कन्येस जयपूर घराण्याची शिस्तशीर तालीम दिली. मोगूबाईंशिवाय बाळकृष्ण पर्वतकर, आग्रा घराण्याचे अन्वर हुसेन खाँ, जयपूर घराण्याचे मोहनराव पालेकर, भेंडीबाजारवाले (इंदूर घराणे) अंजनीबाई मालपेकर आणि अल्पकाळासाठी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, शरदचंद्र आरोलकर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडूनही त्या काही बंदिशी शिकल्या. किशोरीताईंनी अल्पवयातच रागगायनात आणि ख्याल, ठुमरी, भजन अशा गानप्रकारात प्राविण्य मिळवले. संत साहित्याचे – विशेषत: संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचे – त्यांनी वाचन-मनन केले.
हेही वाचा – Ayurveda : वसंत ऋतूत आळस आणि जडपणा
किशोरीताईंनी त्यांच्या गायकीच्या ढाच्यास त्यांना अपेक्षित असलेली अभिव्यक्ती करणाऱ्या अनेक भावपूर्ण बंदिशींची सौष्ठवयुक्त रचना केली. उदाहरणार्थ, भूप, यम, बागेश्री, नंद, खंबावती, हंसध्वनी, ललितबिभास, अहिरभैरव तसेच आनंदमल्हार, सावनमल्हार यासारख्या रागांची त्यांनी निर्मिती केली.
‘गीत गाया पत्थरों ने या हिंदी चित्रपटासाठी किशोराताईंनी पार्श्वगायन केले. त्यांनी गायलेल्या ‘हे श्यामसुंदरा राजसा’ आणि ‘जाईन विचारित रानफुला’ या भावगीतांची एचएमव्हीने काढलेली ध्वनिमुद्रिका रसिकप्रिय झाली. रणजीत देसाई लिखित तुझी वाट वेगळी या मराठी नाटकासाठी त्यांनी संगीत दिले होते. याशिवाय गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘दृष्टी’ या हिंदी चित्रपटास त्यांनी संगीत दिले. तसेच त्यांनी स्वरबद्ध केलेली, गायलेली हिंदी भजने आणि मराठी अभंग यांच्या ध्वनिफितीही विशेष गाजल्या. त्यांच्या आवाजात व्यंकटेशसहस्रनाम, राघवेंद्रस्वामींची कानडी भजने ध्वनिमुद्रित झाली आहेत. त्यांनी स्वरबद्ध केलेल्या संत मीराबाईंच्या भजनांचा ‘मगन हुई मीरा चली’ तसेच संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारलेल्या अभंगांचा ‘तोचि नादु सुस्वरू झाला’ हे कार्यक्रमही त्यांनी सादर केले.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, सनातन संगीत सन्मान, गोदावरी गौरव, पद्मविभूषण, आयटीसी संगीत रिसर्च अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी अधिछात्रवृत्ती, पु. ल. देशपांडे बहुरूपी पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. तसेच ‘गानसरस्वती’, ‘संगीत सम्राज्ञी, भारत गानरत्न असे किताबही त्यांना देण्यात आले. 3 एप्रिल 2017 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात, पण मन एखाद्या गोष्टीबद्दल थोडे अस्वस्थ असू शकते. धीर धरा; हळूहळू गोष्टी तुमच्या बाजूने वळायला लागतील. विद्यार्थ्यांना थोडे अधिक कष्ट करावे लागतील. नोकरदार जातकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीत असलेल्यांची बदली होण्याची शक्यता अधिक आहे.
वृषभ – आज आत्मविश्वासाची कमी असेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कोणतेही मोठे नवीन प्रकल्प हाती घेऊ नका.. नवीन व्यवसायाची कल्पना करण्यापूर्वी थोडा वेळ थांबणे देखील उत्तम राहील. आज मन थोडे अस्वस्थ असेल. ध्यान धारणा करणे आवश्यक आहे. संवाद कौशल्य चांगले असल्यामुळे समाजातील तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.
मिथुन – आज मन आनंदी असेल, आत्मविश्वास उंचावलेला असेल. व्यवसायात असाल, तर नवीन योजनांसह पुढे जाऊ शकता; म्हणजेच वेळ तुमच्या बाजूने आहे. नोकरदार जातकांना नवी नोकरी किंवा जुन्या ठिकाणी बढती मिळू शकते. मेहनतीचे सकारात्मक फळ मिळण्याची दाट शक्यता आहे. आज पित्ताचा त्रास होऊ शकतो, काळजी घ्या.
कर्क – उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. सकारात्मक मानसिकतेने पुढे जाणे फायदेशीर ठरेल. एखाद्या नवीन व्यक्तीला भेटत असाल, तर तुमचे संभाषण संतुलित ठेवा. आज जोडीदाराकडून भक्कम पाठिंबा मिळेल. मित्राच्या मदतीने, तुम्हाला व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याची संधीसुद्धा मिळू शकते. आरोग्य सामान्य असेल.
सिंह – आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्कीच घ्या. एखादे काम किंवा प्रोजेक्ट हातातून निसटून जाईल, त्यामुळे थोडे निराश किंवा असमाधानी असाल, पण गोष्टी लवकरच बदलत जातील. संयम ठेवा, घाई करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी औषधे वेळेवर घेणे गरजेचे आहे.
कन्या – आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात चांगली कामगिरी होईल, अर्थात थोडी धावपळ होऊ शकते. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये नवीन तसेच फायदेशीर संधी निर्माण होऊ शकतात. मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे उन्हात फिरताना काळजी घ्या.
तुळ – कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, बढती किंवा नवीन पद मिळावे म्हणून वरिष्ठ तुमच्या नावाची शिफारस करतील. त्यामुळे वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा आणि कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. काळ तुमच्यासाठी अनुकूल संकेत देत आहे.
वृश्चिक – मनात प्रचंड उलट सुलट विचार येतील, अधूनमधून नकारात्मक विचारही मनात थैमान घालतील. मात्र, तुम्ही ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. आत्मविश्वास थोडा कमी होऊ शकतो, म्हणून स्वतःला सतत प्रेरणा देत रहा. धार्मिकतेकडे तुमचा कल वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. व्यवसायानिमित्त मित्रासोबत प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.
धनु – धनु राशीचे जातक आज नेहमीपेक्षा जरा थोडे व्यग्र असू शकतात. आपली महत्त्वाची कामे आणि जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, संयम बाळगा, छोट्या-छोट्या गोष्टी रंगवून सांगू नका. प्रेम आणि समजूतदारपणामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतील.
हेही वाचा – प्रियकराकडून चौकशी… पण कोरडीच!
मकर – मकर राशीच्या जातकांना नवीन व्यावसायिक प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. मित्र किंवा जवळील व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुमचे काम सोपे होईल. आरोग्याची काळजी घ्या, अतिरिक्त तणाव टाळा. आनंद देणाऱ्या चांगल्या बातम्या मिळवण्याचे संकेत आहेत. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.
कुंभ – आज शांत राहणे आवश्यक आहे. अनावश्यक राग आणि वाद टाळा. गुंतवणूक करण्यापूर्वी, बजेटचे काळजीपूर्वक नियोजन करा, निर्णय घेण्यापूर्वी सर्व पर्यायांचा सारासार विचार करा. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायाच्या वाढीसाठी आणि नफ्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. मानसिकदृष्ट्या फिट रहाण्यासाठी योगसाधना उपयोगी पडेल.
मीन – आज व्यावसायिक जीवनात काही चढ-उतार अनुभवायला मिळू शकतात. कुटुंबात किरकोळ मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शांत राहा आणि समंजसपणे बोला. ऑफिसमधील दिवस सामान्य असेल आणि कामाची प्रगती हळूहळू होत राहील. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, आहाराकडे लक्ष द्या. आरोग्य चांगले राहिल्यास, तुमचे कामही अधिक सुरळीतपणे होईल.


