आपण पाहिले की, वसंत ऋतूत शरीरातील ‘कफ’ वितळून पचनशक्ती मंदावते आणि सर्दी-खोकल्यासारखे आजार वाढतात. या कफाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच पचन सुधारण्यासाठी आपला आहार कसा असावा, हे आज आपण पाहणार आहोत. आयुर्वेदानुसार, वसंत ऋतूत आहार पचायला हलका (लघु), कोरडा (रूक्ष) आणि उष्ण असावा. तसेच, कडू, तिखट आणि तुरट चवीच्या पदार्थांचा आहारात समावेश वाढवावा.
वसंत ऋतूत हे नक्की खा
- धान्य (Grains) : नवीन धान्य पचायला जड आणि कफ वाढवणारे असते. त्यामुळे या दिवसांत एक वर्ष जुने धान्य वापरावे. गहू आणि तांदळापेक्षा ज्वारी, बाजरी आणि बार्ली (यव) यांचा वापर भाकरीसाठी जास्तीत जास्त करावा.
- कडधान्ये आणि डाळी : मुगाची डाळ ही पचायला सर्वात हलकी आणि कफनाशक असते. त्यामुळे मुगाचे वरण, सूप किंवा मुगाची खिचडी खावी. तसेच, कुळीथ (Horse gram) उष्ण असल्याने या दिवसांत खूप फायदेशीर ठरते.
- भाज्या (Vegetables) : कारले, पडवळ, मुळा आणि पालेभाज्यांचा वापर वाढवावा. या कडू आणि तुरट चवीच्या भाज्या कफ कमी करण्यास मदत करतात.
- सुंठ आणि मसाले : स्वयंपाकात सुंठ, मिरे, पिंपळी, हळद, जिरे आणि लसूण यांचा वापर आवर्जून करावा. हे मसाले कफ वितळवून बाहेर काढतात आणि पचन सुधारतात.
- पाणी : दिवसभर कोमट पाणी प्यावे. पाण्यात थोडी सुंठ किंवा नागरमोथा उकळून प्यायल्यास दुप्पट फायदा होतो.
हेही वाचा – Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!
वसंताचे ‘अमृत’ – मध (Honey)
आयुर्वेदात मधाला ‘कफघ्न’ (कफ नष्ट करणारे) म्हटले आहे. रोज सकाळी एक चमचा शुद्ध मध सुंठीच्या पावडरसोबत किंवा कोमट पाण्यासोबत (खूप गरम पाण्यात मध टाकू नये) घेतल्यास संपूर्ण दिवसभर उत्साह राहतो आणि सर्दी-खोकला होत नाही.
पुढच्या लेखात काय पाहणार?
आपल्या नकळत अशा कोणत्या चुका होतात, ज्यामुळे कफ वाढून आपण आजारी पडतो? म्हणजेच ‘वसंत ऋतूत काय खाणे टाळावे?’ हे आपण पुढच्या गुरुवारच्या लेखामध्ये पाहूया!
तोपर्यंत हा ‘कफनाशक’ आहार सुरू करा!
हेही वाचा – कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
श्री समर्थ आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक
A 201, वृंदावन सावली, सावली धाब्यासमोर,
नांदेड फाटा, पुणे 68.
मोबाइल – 7798172713


