आराधना जोशी
शनिवारी जागतिक योग दिन साजरा केला जातोय. गेल्या काही वर्षांपासून आरोग्याबाबत बऱ्यापैकी जागृती झाली आहे. याबाबत तरुणाई देखील गंभीर असल्याचे दिसत आहे. विशेषत:, मुलांना सिक्स पॅक्स, बलदंड बायसेप्स यांचं आकर्षण तर मुलींना झीरो फिगरचं. वातानुकूलित जिममध्ये मशीनच्या सहाय्याने, सप्लिमेंटसच्या मदतीने शरीर संपदा कमावली तरी, मानसिक शांतता मात्र हरवलेलीच आहे. आयुष्यातील ताणतणावांना सामोरं जाताना लहान वयातच होणारा उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास, हृदयविकाराच्या झटक्याचा धोका यामुळे अस्थिरता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचा नातेसंबंधांवरही परिणाम होऊ लागला आहे. या सगळ्याचा आपल्या जीवनशैलीशी खूप जवळचा संबंध आहे, हे लक्षात आल्यावर तरुणवर्ग योगाभ्यासाकडे वळू लागला आहे.
दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. इंग्रजी उच्चाराप्रमाणे योगा म्हणून ओळखला जाणारा योगाभ्यास किंवा योग मुळात भारतातील. आधुनिक जगानं आज त्याला आपलंसं केलं आहे, याचं मुख्य कारण म्हणजे योगाभ्यासातून मिळणारी मानसिक शांतता. जागतिक योग दिनामुळे योगाभ्यासाकडे वळून मानसिक शांतता आणि आरोग्य यांची सांगड घालण्यात तरुण पिढी आघाडीवर आहे.
खरंतर योगसाधना किंवा योगाभ्यास म्हटलं की, अवघड आसने, प्राणायाम, ध्यानधारणा याच गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण काळानुरूप यातही अनेक बदल झाले आहेत. पारंपरिक योगसाधनेत आधुनिकता डोकावू लागली आहे. त्यामुळे आज जगभरातल्या फिटनेस ट्रेंडस् मध्ये योगाभ्यासाची प्रचंड क्रेझ आहे. अॅक्वा योगा, पॉवर योगा, बिक्रम योगा, अॅण्टी ग्रॅव्हिटी योगा, कार योगा यासारखे अनेक प्रकार आज जगभरात प्रसिद्ध झाले आहेत.
भारतातही युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी हे आधुनिक योगाभ्यास सुरू करणारे अनेक योगा स्टुडिओ सध्या कार्यरत आहेत. कॉर्पोरेट ऑफिसेसमध्येही सध्या याचे वारे वाहताना दिसत आहेत. पॉवर योगाचा अभ्यास करतानाचे अनेक सेलिब्रिटीजचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. तणावमुक्ती, रिलॅक्सेशन, फिटनेस यासाठी अनेक तरुण याकडे वळत आहेत.
हेही वाचा – संस्काररुपी वसा
पारंपरिक योगाभ्यासात श्वासावर लक्ष केंद्रीत करून संथ, शांतपणे निर्धारित आसन स्थिती गाठणे अपेक्षित असते. याउलट पॉवर योगामध्ये फिटनेसच्या दृष्टीने घाम गाळणे आवश्यक असते. त्यामुळेच यामध्ये शारीरिक हालचाली चपळतेने करण्यावर भर दिला जातो. 1990 सालापासून पॉवर योगा प्रचलित आहे. तज्ज्ञांच्या मते शहरी स्ट्रेसफुल लाइफस्टाईलमधील (धकाधकीचे जीवन) ताणतणाव दूर करण्यासाठी पॉवर योगाचा उपयोग होतो.
वॉकिंग योगा हा प्रकारही सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. इअरफोन्सवर गाणी ऐकत लेफ्ट-राइट करत जलद गतीने चालण्याच्या व्यायामापेक्षा वॉकिंग योगा थोडासा वेगळा आहे. ठराविक अंतर चालताना पूर्ण एकाग्र होऊन आपल्या श्वासाकडे, हालचालींवर लक्ष केंद्रीत करणे यामध्ये अपेक्षित आहे. यातून मनाची एकाग्रता वाढायला मदत होते. मनातले नकारात्मक विचार नाहीसे होतात. त्यामुळे आपोआपच मन रिलॅक्स होत जातं.
अॅक्वा योगा म्हणजे पाण्यात तरंगत करण्याचा योगाभ्यास. यात तरंगण्याच्या शक्तीबरोबरच दीर्घ श्वसन, ताणून ठेवण्याची क्षमता वाढविणे, शरीर मनाला विश्रांती देणे यासाठी हा अभ्यास उपयुक्त आहे. पर्वतासन, शलभासन, वज्रासन, ताडासन, पवनमुक्तासन, सूर्यनमस्कार, शवासन, पिरॅमिड पोझ यासारख्या आसनांचा अभ्यास पाण्यात तरंगत करणे यात अपेक्षित असते.
अँटी ग्रॅव्हिटी योग हा प्रकारही लोकप्रिय असून टांगत्या झोळीसारख्या उपकरणाच्या मदतीने यातील योगाभ्यास केला जातो. मात्र, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने केल्या जाणाऱ्या या अभ्यासासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. याशिवाय कार योगा या प्रकारालाही पंसती दिली जात आहे. कार चालवत असताना किंवा ट्रॅफिकमध्ये, सिग्नलवर गाडी थांबल्यानंतर दीड-दोन मिनिटांमध्ये करायचे श्वास नियंत्रण प्रकार यावेळी केला जातो. आधुनिक काळात मोबाइल, लॅपटॉप यासारख्या गॅजेट्च्या वापरामुळे हातांची बोटे, हात, मान, पाठ यावर येणारा ताण कमी करणे हे या कार योगाचा मुख्य हेतू असतो.
लहान मुलांसाठी म्हणून योगाभ्यासाला नृत्याची जोड देऊन ऱ्हिदमिक योगा हा प्रकार शाळांमधून लोकप्रिय झाला आहे. एका विशिष्ट प्रकारच्या संगीताच्या जोडीने, योगासने आणि नृत्याची सांगड घालत ऱ्हिदमिक योगाभ्यास केला जातो. यामुळे शरीराबरोबरच मनही प्रफुल्लित बनतं. याशिवाय अॅथलेटिक योगा, एक्रो योगा, आर्टिस्टिक योगा यासारख्या योगाभ्यासाला सध्या मागणी आहे. म्हणूनच अशा योगाभ्यासाचे योग्य प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनाही सध्या जगभरात डिमांड आहे. करिअरच्या दृष्टीने ही एक नवीन संधी तरुण वर्गासाठी उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा – पुल : व्यक्ती की आनंदयात्री?