बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका कार्यातली. त्या काळी साधारणपणे अशीच असायची सगळी कार्य… तेव्हा बँक्वेट्स (Banquets) नव्हती, साधीसुधी कार्यालयं असायची पुण्यात… लग्न लागलं होतं. दुपार टळली होती. खाशी पंगत पण उठली होती आणि कार्यालयातल्या पाहुण्यांवर श्रीखंडाच्या सुस्तीची दाट साय पसरलेली दिसत होती. जांभयांची आवर्तनं सुरू होती. खुर्च्यांची रिंगणं करून गप्पांचे फड जमले होते.
काकवा, मावश्या, माम्या, वहिन्या यांच्या गुजगोष्टी सुरू होत्या. ‘तुला सांगते शांते, परवा किनई कहर केला बाई यांनी…’ असे संवाद ऐकू येत होते.
जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळत होता. संध्याकाळच्या वरातीला अजून बराच अवकाश असल्याने सगळा थंडा कारभार… काही जण बसल्याजागी पेंगत, वेळ घालवण्याचा प्रयत्न करीत होते. काही जण जागा मिळेल तिथे आडवे झाले होते. सकाळची, चुरगळलेली वर्तमानपत्र वारा घेण्यासाठी कामास येत होती.
स्टेजवर वधू वरांच्या सिंहासनांवर आणि त्याच्या परिसरात चाललेला पोरांचा धिंगाणा आवरू म्हणता आवरत नव्हता आणि धपाटे घालून आणि त्यांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या आया नुसत्या मेटाकुटीस आल्या होत्या! आतल्या खोलीत एक आज्जी राखण करत आणि लाडू, चिवड्याच्या पुड्या वाटत बसल्या होत्या. त्यांच्या आजूबाजूला तान्ही पोरं किरकिरत होती.
सनई चौघडे वाले चंबूगबाळे आवरून निघायच्या तयारीत होते. बत्तीवाले, बॅन्डवाले, त्यांच्या लाल, निळ्या किनखापांनसह दाखल होत होते. सजवलेल्या बग्गीचे घोडे पाय मोडून उभे होते, फुरफुरत…
सुस्तावलेल्या हॉलच्या एका कडेला आमचे बरेचसे मामा, मावश्यांचे यजमान आणि इतर पुरुष मंडळी यांची वेगळीच मैफल जमली होती. राजकारण आणि क्रिकेट हे अशा मैफलींचे मुख्य विषय! सुनील गावस्कर, विश्वनाथ, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, भुट्टो असे वेगवेगळे महात्मे चर्चेत डोकावून जात होते. अमेरिका आणि रशियाने काय करायला हवे आणि काय नको, असे जागतिक महत्वाचे मुद्दे सुद्धा हिरीरीने चघळले जात होते!
आमच्या एका मावशीचे यजमान, विडयाचे प्रचंड शौकीन आणि दर्दी. कधीही, कुठेही गेले तरी पानाची चंची कायम सोबत बाळगणारे. अशा गप्पांच्या फडामध्ये, मागेल त्याला अगदी निगुतीने पान लावून देणे, हा त्यांचा अगदी आवडीचा शौक. गप्पांना रंग चढण्यात या विड्याच्या पानांचा पण महत्वाचा वाटा असायचा, हे नक्की!
यावेळी पण त्यांनी चंची सोडली आणि प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीचे पान लावण्यात ते गुंग झाले. माझा एक मामा, सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसलेला, आज या गप्पांच्या फडात सामील होता.
हेही वाचा – आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…
“सुरेशराव, माझ्यासाठीही एक फक्कड पान जमवा आज. मजा आली पाहिजे… मी आलोच मोकळा होऊन, तोवर लावून ठेवा पान…” असं सांगून महाशय डुलतडुलत, मोकळे होण्यासाठी गेले.
ते येईपर्यंत, लवंग खोचून ठेवलेला विडा तयार होता. तो हिरवागार विडा पाहून मामाची तबियत खूश झाली आणि मोठ्या आनंदाने त्याने तो विडा सरकवला तोंडात.
“कसा झालाय विडा?”
तोबरा भरलेल्या मामाने अंगठा आणि तर्जनी जुळवून, ‘मस्त’ची खूण केली.
अशा निरामय अवस्थेत दहा-पंधरा मिनिटे गेली आणि तेवढ्यात, ‘मामा पडले, मामा पडले’ अशी आरोळी उठली आणि लग्नाच्या हॉलमध्ये हलकल्लोळ माजला. पानपतावर विश्वासराव पडल्यावर झाली नसेल, तेवढी धावपळ सुरू झाली…
आडदांड देहाचा माझा मामा, ‘चक्कर येतेय, चक्कर येतेय’ म्हणत सपशेल उताणा पडला, डोळे फिरवू लागला आणि यजमानांच्या तोंडचं पाणी पळालं. ते धावा करू लागले भगवंताचा! ‘वंदे भारत’ आल्यावर जसं ‘पॅसेंजर गाडी’कडे कोणी ढुंकून बघत नाही, तद्वत आपसूकच लग्न सोहोळ्यावरून लक्ष हटून आकर्षण केंद्र मामाकडे सरकलं… पुलंच्या म्हशीसारखं!
“अरे कांदा आणा”, “वहाणा आणा”, “पाणी आणा”, “डॉक्टरांना बोलवा”… असे हाकारे सुरू झाले आणि सगळीकडे हलकल्लोळ माजला. आठ-दहा लोकांनी मामाला उचलून कसंबसं सोफ्यात निजवलं आणि वारा घालायचा कार्यक्रम सुरू झाला.
“गुरुजींना बोलवा मंत्र म्हणायला,” एकाने तेवढ्यात पुडी सोडून दिली आणि त्या अवस्थेत सुद्धा हास्याची लकेर उठली…
एकजण पुढे झाला आणि नाकापुढे सुत धरून गेला. एकदा खात्री केलेली बरी म्हणून!
अशा संभ्रमात आणि विविध उपायांच्या भडिमारात दहा मिनिटे गेली आणि मामाने हळूच डोळे किलकिले केले. थोडे आळोखेपिळोखे देत हालचाल केली आणि “आले, आले, शुद्धीवर आले”चे हाकारे पिटले गेले.
अवघ्या आसमंताने सुस्कारा सोडला. यजमान आणि त्यांची पत्नी यांचे चेहेरे उजळले. कार्यावरचं विघ्न टळलं होतं, विघ्नेश्वराच्या कृपेने…
या अरिष्टाचं कारण काय, हे कोणालाच उलगडेना!
मामा उठून बसला. तोंडात पान तसंच होतं त्याच्या. ते आधी थुंकलं त्यानी आणि म्हणाला, “मी ठीक होतो. हे शिंचं पान खाल्ल्यावर सगळा घोटाळा झाला.”
आता मोर्चा मावशीच्या याजमानांकडे वळला. त्यांनाही काही कळेना आणि मग अचानक त्यांच्या टाळक्यात प्रकाश पडला…
गुलकंद, कत्री सुपारी, टुटीफ्रूटी घातलेल्या पुना मसाला पानाच्या पुढे कधी न झेपावलेल्या मामाच्या विड्यात त्यांनी कडक सातारी जर्दा घातला होता, नेहेमीच्या सवयीप्रमाणे! सातारी मर्दासारखा तो जर्दा काही आमच्या मामाला सोसला नाही आणि त्याने घातलेली जबरदस्त धोबीपछाड मामाला चारी मुंड्या चीत करून गेली!
हेही वाचा – एका केरसुणीची कहाणी…
भला थोरला गडी, चिमूटभर तंबाखूने पार आडवा केला होता, पण फार काही धांदल न होता प्रकरण थोडक्यात निपटलं गेलं हे सगळ्यांचं नशीब.
पुढे नंतर अशाच कार्यात भेट झाल्यावर आणि असेच फड जमल्यावर, मावशीचे यजमान मामाला हमखास विचारायचे – “काय बंडोपंत, विडा लावू का फर्मास?”
दोन्ही कानांच्या पाळ्या चिमटीत धरून, मामा मग जीभ हातभर बाहेर काढून मोठ्ठा नकार देत असे आणि उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकत असे…
आज ते दोघेही हयात नाहीत, पण कुठल्याही कार्यात विड्याचा विषय निघाला की, हा किस्सा हमखास चघळला जातो, अजूनही… आता तशी कार्य पण गेली, ते गप्पांचे फडही गेले आणि विड्याची चंचीही कालबाह्य झाली. उरल्यात त्या फक्त हळव्या आठवणी, डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या…!


