मनोज जोशी
फेरीवाले आणि पाऊस यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘असून अडचण, नसून खोळंबा’! मे महिन्यात उत्तरोत्तर उन्हाची काहिली वाढू लागल्यावर आपण सारेच जून महिना सुरू होऊन ‘पाऊस कधी येणार?’ याची वाट पाहू लागतो. पण पावसाला सुरुवात होऊन दोन महिने झाल्यावर तिसऱ्या महिन्यातच ‘पाऊस कधी जाणार?’ असं होतं. कारण, एकतर रोज छत्री घेऊन जाणं हे एक ओझंच होऊन जातं, त्यात सर्वकडे चिखल आणि सणावारातील हौसेवर ‘पाणी’ पडू नये, असंच सर्वांना वाटत असतं.
फेरीवाल्यांच्या बाबतीतही असंच काहीसं असतं. जेव्हा फेरीवालाविरोधी सूर लागतो, तेव्हा ते कसे रस्ता अडवून बसलेले असतात, जाताना-येताना अडचण…, इथपासून ते कशी अडवणूक करतात… इथपर्यंत सर्व विषय चघळले जातात. पण कधी ना कधी तरी, ‘घरी येता-येता सर्व खरेदी उरकली…’ ‘दुकानात ही वस्तू मला अमुक एक रुपयांना सांगितली होती, पण रस्त्यावर तीच वस्तू मला एवढ्या किमतीत पडली…’ असंही कौतुकानं सांगितलं जातं. काही जण हे फेरीवाले उठवल्यामुळे ‘भाजी वगैरे खरेदी करायला आम्हाला आता तिथं लांब मार्केटमध्ये जावं लागतं,’ असा तक्रारीचा सूरही लावतात.
एकूणच, असून अडचण अन् नसून खोळंबा..
पण या फेरीवाल्यांची दुनिया वेगळीच आहे. साधारणपणे दहा वर्षांपूर्वी ‘लोकमत’ला असताना दादरमध्ये एका फेरीवाल्याशी माझी मैत्री झाली होती. त्याच्यामुळे मला त्या परिसरातील अनेक फेरीवाले ओळखू लागले होते. त्यांची गणितं, त्यांचे आडाखे हे वाखाणण्यासारखे आहेत. हा मित्र दिवाळीत विविध प्रकारची दिव्यांची तोरणं विकायचा. एरवी मोबाइल कव्हर, इअरफोन वगैरे Accessoriesचा स्टॉल होता. याशिवाय गॉगलचाही एक स्टॉल होता. उन्हाळा सुरू होताच, गॉगलची मागणी वाढते, मग मार्चच्या मध्यावरच बऱ्यापैकी माल भरला जातो. याचं कारण म्हणजे, ऐन उन्हाळ्यात होलसेल मार्केटमध्येही भाव वाढतात. त्यामुळे कमी भाव असताना सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. त्यातही कोणती वस्तू सर्वात जास्त ‘उचलली’ जाईल, याचाही अंदाज घेऊन तेवढा स्टॉक आणि स्टॉलवर मांडणी केली जाते.
हेही वाचा – थिंक पॉझिटिव्ह
त्याचं सर्व विचारपूर्वक चालायचं. त्याला विचारलं, धुळवडीला पिचकारी आणि रंगाचा स्टॉल का लावत नाही. तो म्हणाला, प्रॉब्लेम असा आहे की, यातला माल उरला तर, तो वर्षभरासाठी गोणीत भरून ठेवावा लागतो. त्यामुळे जागाही अडते आणि चायना माल असल्याने त्याची टिकण्याची गॅरंटीही नसते. पावसाळ्यातल्या जॅकेटचंही तेच. छत्र्या गुंडाळून कुठं तरी माळ्यावर टाकता येतात. पण जॅकेटचं तसं नाही. त्याचं बंडल मोठं होतं आणि परिणामी जास्त जागा लागते.
स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी त्याचे वागणं वेगवेगळं असायचे. समोरची व्यक्ती खरोखरच अमुक एक वस्तू घेणार आहे का, याचा अंदाज घेऊनच तो त्याच्याशी बोलत असे. भावात घासाघीस करून पुढे गेलेली कोणती व्यक्ती मागे वळणार, हेही त्याला कळायचं. तो आधी मला तसं सांगायचाही. त्याला एवढे बारकावे माहीत झाले होते.
आपल्या व्यवहाराची गणितंही अशा प्रकारे सांगायचा की, मी अचंबितच होत असे. अगदी योग्य शब्दात सांगायचं झालं तर, कॅलक्युलेशन जबरदस्त होतं. एवढ्या लाखाचा माल आणला की, त्यातून आपल्याला एवढे मिळतील. इतर देणी-घेणी वगळता हाती एवढे राहतील, हे गणित तो सहजपणे सांगत असे. त्यावेळी मी अमुक गुणिले….मधेच अडकलेलो असायचो. पालिका, पोलिसांचे हप्ते, स्टॉलवर काम करणाऱ्या मुलाचा पगार, त्याचं दिवसभराचं चहापाणी, नाश्ता, दोन वेळचं जेवण आणि गावाकडून आलेला असल्यानं त्याच्या राहण्याची व्यवस्था हा सर्व खर्च जमेस धरायचा. याशिवाय, एकदम आणलेल्या वस्तूंमधील डिफेक्टीव्ह माल… ही सर्व गोळाबेरीज करून स्टॉलवरील वस्तूंची किंमत ठरवली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर, मोबाइल कव्हर मार्केटमधून 25 ते 30 रुपयांना खरेदी केलेलं असतं. पण विकताना तो 120 रुपयांना विकत होता.
बापट व्यवहार
दादरच्या फेरीवाल्यांमध्ये ‘बापट’चे व्यवहार होतात. फेरीवाल्यांची ती सांकेतिक भाषा आहे. एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी मी फेरीवाल्या मित्रासोबत दुसऱ्या स्टॉलवर गेल्यावर तसा व्यवहार केला जात होता. इतर ग्राहकांसमोर तो सांगतो, ‘300 बापट देना.’ याचाच अर्थ 300च्या निम्मे म्हणजेच 150 रुपये!
जागा कोणाची अन्…
अनेकदा परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात अचानक मोहीम सुरू होते. गम्मत म्हणजे, या परप्रांतीय’ फेरीवाल्यांकडून हप्ते घेणारे पालिका कर्मचारी आणि पोलीस हे मुख्यत्वे करून ‘मराठी माणसं’च आहेत. दादरच्या कबुतर खान्याहून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही फेरीवाले दादर पोलीस स्टेशन आणि शिवाजी पार्क पोलीस स्टेशन या दोघांनाही हप्ते देतात. कारण फुटपाथवर उभं राहिलं तर, दादर पोलीस स्टेशनची हद्द येते आणि फुटपाथवरून खाली उतरलं की शिवाजी पार्क पोलीस स्टेशन! (ही माझ्या मित्राकडूनच मिळालेली माहिती)
पालिकेची गाडी येणार असले की, हे हप्ते घेणारे आधी येऊन या फेरीवाल्यांना कल्पना देतात. पोलिसांचंही तसंच. हवालदार येऊन साहेब येणार असल्याचे सांगून जातात. त्यातही या दोन्ही छाप्यात फरक असा की, पालिकेची गाडी येणार म्हटल्यावर सर्व स्टॉल उचलून लपविले जातात. (दादरला प्रत्येकाची जागा ठरलेली आहे.) पण पोलीस अधिकारी येणार असला की, स्टॉल तसेच असतात, पण फेरीवाले दूर उभे राहतात. पण त्याआधी त्यातल्या त्यात महागाच्या वस्तू स्टॉलखाली लपविल्या जातात. कारण पोलीस स्टॉलला हात लावू शकत नाहीत. पण साहेबांबरोबर आलेले हवालदार स्टॉलवरून ईअरफोन किंवा तत्सम काहीतरी वस्तू उचलून घेऊन जातात. म्हणून तशी काळजी फेरीवाले घेतात.
हेही वाचा – 1993चा तणाव!
शिवाय हे परप्रांतीय फेरीवाले आपला स्टॉल लावण्यासाठी भाडंही भरतात अन् हे भाडं घेणारे ना पालिकेशी संबंधित आहेत, ना पोलिसांशी. कधी काळी त्या जागेवर स्टॉल टाकून ज्यांनी व्यवसाय सुरू केला होता, ती जागा या फेरीवाल्यांना देऊन त्याचं भाडं ही मंडळी वसूल करतात. जुन्या स्टॉलधारकांची जागा आताच्या जवळपास चार स्टॉल इतकी आहे. त्यामुळे त्या चार स्टॉलचं भाडं तो घेतो. महत्त्वाचं म्हणजे, हे भाडं घेणारेही बहुतांश ‘मराठी माणसं’च आहेत! अब क्या कहे?